Thursday, February 19, 2009

राजकन्येचा झगा

राजकन्येचा झगा

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एक छोटस गाव होतं. इन मीन तीन घरांच. गावाभोवती सुंदर नीळे डोंगर होते. खळाळणारी नदी होती. गर्द हिरवी झाडे होती छोटी छोटी तीन घर होती. घरांभोवती अंगण. अंगणात छान रांगोळी.

एका घरात एक छोटीशी काळ्याभोर डोळ्यांची, गोबरया गालांची गोंडस मुलगी रहात होती. ती रोज आपल्या अंगणात पक्षांशी खेळायची. फुलांना कुरवाळायची. अंगणाच्या सभोवार तीने झाड लावली होती, त्यांना पाणी घालायची.त्यांच्याशी गप्पा मारायची. एका झाडाशी तर तीची खास गट्टी होती. हिरवगार झाड आणि त्याची गर्द सावली तीला खूप आवडायची. छोट्या छोट्या पानटल्यांची मिळून बनलेली मोठी मोठी पान बघताना तीला मजा वाटायची. झाड सुद्धा तीची रोज वाट बघायच. तीच्या इवल्याशा हातांना पानांनी गुदगुल्या करायचं. सळसळ आवाज करत मोठ्यानी हसायच.

एकदा काय झालं, त्या देशाच्या राजकन्येला निळ्या डोंगरांवर जायच होत. आदल्या दिवशी गावात दवंडी पिटली,
"ऐका हो ऐका उद्या राजकन्या गावातून जाणार आहे. सगळ्यांनी राजकन्येच्या स्वागताला थांबा." तीनही घरासमोर छान रांगोळया काढल्या. फुलांनी घर सजवली. सगळेजण सकाळी उठून, तयारी करुन वेशीपाशी ऊभे राहीले. सकाळी सकाळी भालदार चोपादारांची एक मोठी तुकडी गावात आली. त्या चिमुकल्या गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फी उभी राहिली. मागाहून आल्या राजकन्येच्या दासदासी, त्यांनी रस्त्यावर पायघड्या टाकल्या. इतक्यात टपटप असा घोड्याच्या रथाचा आवाज झाला. सगळे आतुरतेने मान उंचावून बघायला लागले. पांढऱ्याशुभ्र असे सात घोडे लावलेल्या चांदीच्या रथाचे आगमन झाले. कमानदार रथ आणि त्यावर मोत्यांच्या झालरी. जणू काही चंद्राचाच रथ. आणि त्यात बसलेली परीसारखी सुंदर राजकन्या. गावातल्यांनी पहील्यांदाच अशी सुंदर राजकन्या बघितली होती. आपल्या देशाची राजकन्या म्हणून त्यांच्या डोळ्यातून कौतुक दिसत होते. छानशी, लांब केसांची आणि नाजुक राजकन्या. तीने सुंदर लाल रंगाचा पायघोळ झगा घातला होता. त्यावर पांढरी झालर अन माणकांची सुंदर नक्षी होती. ऊन्हात झगा छान चमकत होता. सगळ्यांनी राजकन्येचे मनापासून स्वागत केले, तीच्यावर फुले उधळली. असे छान स्वागत स्विकारत राजकन्या डोंगरावर निघून गेली.

इथे गावातल्या त्या छोट्याशा मुलीलाही राजकन्या खूप आवडली. पण त्याहीपेक्षा आवडला तो तीचा झगा. तिच्या ध्यानीमनी सारख राजकन्या आणि झगाच येऊ लागला. तीला वाटल आपल्याकडेही असा सुंदर झगा असता तर किती छान झाल असतं. काय कराव बर? तीने आई,बाबांजवळ हट्ट केला. पण ते तरी कसा देणार राजकन्येचा झगा. आई,बाबांपण समजूत काढून दामले. एवढी शहाणी गुणाची मुलगी तू, कशाला अशी रडतेस? आपण आपली साधी माणसं. आपलायाला असा झगाबिगा नाही मिळत. आईने परत समजावलं. आता आईबाबांना वाईट वाटेल म्हणून चिमुकलीने ओठावर हसू आणलं आणि बागेत पळाली. आणी आपल्या लाडक्या झाडाखाली जाऊन बसली. झाडाने सळसळ करून तिला खेळायला बोलावलं पण तीच काही आज लक्षच नव्हत. झाडाने खोदून खोदून विचारल्यावर मात्र तिने झग्याबद्दल सांगितल. आणि वर म्हणाली “जाउदे आपल्याला काही तसले कपडे कधी मिळणार नाही चे माहितेय मला, तरीसुद्धा जरा वाईट वाटतंय मला. उद्या नाही ह इतक वाटणार.”

हे ऐकून बघून झाडालापण खूप वाईट वाटल. झाड दुःखी झाल. अस झाड दुःखी झालं की वनराणीला लगेच खबर पोहोचते. झाडांवरचे पक्षी लगेच तीला निरोप देतात. अशी झाड, फुलं, पान यांच दुःख देवीला अजिबात बघवत नाही. त्या रात्रीच वनदेवी आली झाडाकडे त्याची विचारपूस करायला. मग झाडाने तीला त्याच्या लाडक्या छोट्याशा मैत्रिणीची गोष्ट सांगितली. म्हणाल, “ती किती शहाणी आहे, माझे कित्ती लाड करते, माझ्याशी खेळते. आत्तासुद्धा आईबाबांना वाईट वाटू नये म्हणून रडत नाहीये ती. मग मला वाटत आपण नाही का तीला असा सुंदर झगा देऊ शकत? कित्ती छान दिसेल ती."
वनदेवीला पण खरतर हि चिमुकली माहिती होती. तिच्या पक्षीदुतांकडून तिला नेहेमी हिच्या बद्दल कळायचं. सगळ्यांची लाडकी होतो ना ती. पण झगा देण वनदेवीच्या हि हातातलं नव्हतं. एरवी फुलं, फळ, पान काय मागाल ते देता आलं असतं तिला. मग ती म्हणाली "मी तुला झगा देऊ शकत नाही रे. तो फक्त राजाच देऊ शकतो. पण मी तशीच सुंदर फुल मात्र देउ शकते. ती तु तीला दे. चालेल का तुला?" झाड आनंदल, सळसळ करत हो म्हणालं. वनदेवीने आपल्या हातातल्या जादुई फुलाने झाडाला स्पर्श केला. सगळ झाड शितल प्रकाशाने क्षणभर उजळल. वनदेवी हसत हसत निघून गेली. आणि झाड गडद अंधारात झोपून गेले.
सकाळ झाली. छोटी नेहेमीप्रमाणे सकाळी झाडांना पाणी घालायला बाहेर आली. आणी बघते तर काय हे हिरवागार झाड हिरव राहीलच नव्हतं. त्याच्या अंगाखांद्यावार सुंदर फुलं उमलली होती. लालचुटूक रंगाची, पांढर्याब झालरीची , माणकांच्या ठिपक्यांची. सगळ झाड अशा फुलांनी डवरून गेलं होतं. ऊन्हात त्याचा रंग छान चमकत होता. गावातले सगळेच जमून ती फुल बघत राहीले. ती छोटी धावत धावत झाडाखाली आली, आणी झाडाने सळसळ करत तीच्या अंगावर फुल टाकली. गुलमोहोर अगदी आनंदून गेली. सगळ्यानी एकमतानी फुलांना गुलमोहोरची फुल अस नाव ठरवून टाकलं.