Monday, May 31, 2010

कुनीदेशातल्या हिमपऱ्या

एक छोटासा देश होता, कुनी नावाचा. कुनीदेशात मिचमिच्या डोळ्यांचे आणि चपट्या नाकाचे लोक रहात. त्यांच्या इवल्या इवल्या दुडूदुडू धावणाऱ्या मुलांचे गोबरे गाल नुसते सफरचंदासारखे लाल असायचे. यांची भाषा पण अगदीच मजेदार. आईला म्हणायचे “काका”. बाबांना म्हणायचे “तोतो”. आजोबांना म्हणायचे “जीजी” आणि आजीला म्हणायचे “बाबा”. इकडे या म्हणायचे तर म्हणे “कोको”. आई इथे ये म्हणायचं तर “काका कोको” मजाच कि नाही?

तर अशा या कुनीदेशात एकदा फार कडाक्याची थंडी पडली. तशी दर वर्षी पडायची पण यंदा जरा जास्तच होती. घरंदारं झाड सगळी गारठून गेली होती. सगळी मुलं, काका, तोतो, जीजी, बाबा एकत्र कोंडाळ करून घरातच चुलीभोवती शेकत बसले होते. आज म्हणे हिमपऱ्या जमिनीवर येणार होत्या. मुलांना भारीच उत्सुकता होती हिमपऱ्या बघायची. अधून मधून काका आणि तोतोची नजर चुकवून काही उनाड मुलं खिडकी किलकिली करून चोरून बघत. पण गडद राखी रंगाच्या आभाळाशिवाय काहीच दिसत नव्हत.

अचानक नाचत तरंगत एक हिमपरी जमिनीवर उतरली. गारठलेल्या जमिनीवर अलगद बसली. अगदी चिमुकली, अंगठ्याच्या पेराएवढीच. तिच्यामागुन गिरक्या घेत अजून दुसरी, तिसरी हिमपरी उतरली. आणि हळूहळू मात्र हिमपरयांचे थवेच्या थवे तरंगत गिरक्या घेत अलगद उतरू लागले. कधी जमिनीवर, कधी झाडावर, तर कधी कौलांवर. हिमपऱ्यांच्या शुभ्र झग्यांनी निळी निळी कौलं, जमीन, झाडे सगळच पांढरशुभ्र दिसायला लागल. होताहोता रात्र संपून दिवस उजाडला, खरतर उजाडला नाहीच कारण अजूनही सगळीकडे अंधारलेलच होत. हिमपऱ्यांचा मनमुक्त नाच आता मस्तीखोर मुलांचा दंगा वाटत होता. आणि त्यात जोराचा वाराही आला धिंगाणा घालायला. मग काय हिमपऱ्यांच्या अजूनच अंगात आलं. त्यांची मस्ती थांबेचना. असे खूप दिवस खूप रात्री गेल्या. कितीतरी झाडे उन्मळून पडली. कुनिदेशातली माणस, प्राणी घाबरले. पण करणार काय? शेवटी एका रात्री हिमपऱ्या दमल्या आणि झाडांवर बसल्या. वाराही मग कंटाळून दुसऱ्या देशात निघून गेला. हिमपऱ्या दमून भागून झाडांवर आपलेच पंख पांघरून झोपी गेल्या.

झाडांनी मग विचार केला, किती त्रास दिलाय यांनी सगळ्यांना. आता थोडे दिवस कोंडूनच ठेवूयात या पऱ्यांना. आणि त्यांनी आपले सालींचे अगणित हात पसरवून हिमपऱ्यांना मुठीत बंद करून टाकले.

दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला. छान स्वच्छ प्रकाश पडला. सगळे काका, तोतो, जीजी, बाबा बाहेर येऊन आपल्या आपल्या कामाला लागले. इवली इवली मुलं बर्फात बुटांचे ठसे उमटवायचे, घसरगुंडी करायचे खेळ खेळू लागली. झाडांच्या मुठीतल्या पऱ्या मात्र कोणालाच दिसल्या नाहीत.

इथे काय झाले, हिमपऱ्या झोपेतून जाग्या झाल्या. पण बघतात तर काय झाडांनी कोंडून ठेवलेलं. त्यांनी झाडांची खूप विनवणी केली. पण झाडांनी अजिबात त्यांचे काही ऐकलं नाही.
सगळ्यांना एवढा त्रास दिलातना, आता अजिबात सोडणारच नाही म्हणाली झाडं. मग हिमपऱ्या खूप खूप रडल्या. रडून रडून गुलाबी झाल्या असे पंधरा दिवस पंधरा रात्री गेल्या. रोज हिमपऱ्या खूप विनवणी करत, माफी मागत. पुन्हा असे करणार नाही म्हणत. शेवटी झाडांना दया आली आणि त्यांनी आपल्या मुठी अलगद उघडल्या. पऱ्या आनंदून गेल्या. पटापटा बाहेर येऊन उडायला गेल्या. पण बघतात तर काय इतके दिवस कोंडून राहिल्याने त्यांचे पाय झाडांना चिकटून गेले होते. पंखांच्या सुंदर पांढऱ्या पाकळ्या झाल्या होत्या. रडून रडून त्यांना हलकी गुलाबी झटा आली होती. पऱ्यांनाच आपले चे नवे रूप फार आवडले. हळूहळू कुजबुजत त्यांनी सगळ्या झोपाळू पऱ्यांना उठवायला सुरुवात केली. आणि सगळी झाडे नुसती पांढऱ्या गुलाबी फुलांनी भरून गेली. थंडीने निष्पर्ण झालेल्या झाडांना अनोखा गुलाबी साज चढला.

अचानक खेळणाऱ्या मुलांचे लक्ष झाडांकडे गेले. त्यांनी काका कोको. बाबा कोको म्हणून हाका मारून आपल्या आई आणि आज्जीला बोलावले. त्या सुद्धा या देखाव्याने चकित झाल्या. हळूहळू सगळी माणस गोळा होऊन बघू लागली. जिथे जाव तिथे हिच गुलाबी झाडं. पण अरेच्च्या हि तर चेरीची झाडं होती ना? चेरीला फुलं आली कि काय? मग सगळे बुत्सूदेवाच्या देवळात गेले आणि एवढी छान फुल फुलवल्याबद्दल त्याचे आभार मानले. अशी फुल नेहेमीच राहुदेत म्हणून प्रार्थना केली. चेरीच्या झाडांखाली बसून गाणी म्हटली. काका , बाबांनी केलेली पक्वान्न खाल्ली.

पऱ्यांना आता फार मजा वाटायला लागली होती. पण जसजसे उन तापू लागले तसे ते त्यांना सहन होईना. त्यांच्या एकएक पाकळ्या गळू लागल्या. शेवटी कितीझाल तरी हिमपऱ्याच ना. त्या पाकळ्या सुध्दा गळताना नाचत तरंगत गिरक्या घेत अलगद जमिनीवर विसावत होत्या. तरीहि पऱ्यां आनंदित होत्या. त्यांनी ठरवल होत अशी गंमत आता दरवर्षी करायची. मग अजूनसुध्दा दरवर्षी हिमपऱ्या दंगा करतात आणि झाडसुध्दा त्यांना मुद्दामच कोंडून ठेवून त्यांची फुलं करतात. कुनीदेशातली माणस मग चेरीच्या झाडांखाली बसून गाणी म्हणतात.