Monday, September 27, 2010

रंगीत लहानपण

मायबोली वरच्या कथाबीज साठी लिहिलेली ही कथा.

मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, आईस्क्रीम
****************************

"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.


"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."

भैरू बाजाराच्या दिवशी आपलं गाठोडं घेऊन जायचा कापडाचं दुकान लावायला.एरवी अशीच इकडची तिकडची, जमलच तर कुणाच्या शेताची कामं करायचा. पोराला बुकं शिकवून लई मोटा करायचं स्वप्न त्याचं. सम्या आता पारावरच्या शाळेत ३रीच्या वर्गात जायचा, पण सुट्टीच्या दिवशी बाबाबरोबर बाजाराला जायला लागायचंच त्याला. मग त्या दिवशी खेळायला मिळायचं नाही म्हणून त्याला अज्जिबात आवडायचं नाही. भैरुलाही ते माहीत होतं पण इलाज नव्हता. तेवढीच मदत होती हाताशी. आणि आजतर तालुक्याचा मोठा बाजार होता.

भराभरा चालत दोघे बाजाराच्या ठिकाणी पोचले तर चांगल्या जागा आधीच सगळ्या ठेल्यावाल्यांनी पटकावल्या होत्या. आता उरलेल्या जागेतली बऱ्यापैकी जागा निवडून भैरूने चादर पसरून कापडं नीट मांडून ठेवायला सुरुवात केली. अजून गिऱ्हाईकं यायला वेळ होता म्हणून सम्या इकडे तिकडे बघत बसला. आजची जागा नेहेमीची नसल्याने समोर सगळे नवीन गाठोडीवाले होते. त्यामुळे सम्याला लई मजा वाटत होती. तेवढ्यात सम्याच्या समोरची जागा एका मोठ्या हातगाडीवाल्याने घेतली. हातगाडीवरची आईसक्रीमची रंगीत चित्र बघून आणि 'थंडगार गारे गार' अशी पाटी वाचून सम्या मनातल्या मनात तो पदार्थ कसा लागतं असेल याचा विचार करायला लागला.


हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली आणि भैरुने सम्याला कामाला लावलं, सम्याचं काम म्हणजे ओरडून ओरडून बाबाच्या दुकानाची जाहिरात करायची. "कापडं घ्या, कापडं! लई भारी कापडं!!" सम्याने आपलं काम चालू केलं तरी त्याचा एक डोळा त्या हातगाडीवरच होता. आजूबाजूची पोरं आईबापा बरोबर येऊन आईसक्रिम खाताना बघून हे लहान मुलांनी खायचं काहीतरी छान आहे हे त्याला कळायला लागलं होतं. येणारा नवीन पोरगा कोणत्या रंगाचं आईसक्रीम खाणार याचा अंदाजही त्याच्या मनाने लावायला सुरुवात केली. "गार म्हंजी कसं आसल? झाडाच्या सावलीवाणी आसल का हिरीच्या पान्यावानी?" सम्याच्या नकळतच त्याचे मन तिथे जात होतं. मध्येच "कापडं घ्या, कापडं! गारे गार कापडं!!" अस ऐकल्यावर भैरुने झापलाच सम्याला.
"काय रं? काय इकतोयास? गारेगार कापडं आणली व्हय तुज्या बान?"
चमकून आपली चूक दुरुस्त करून सम्या परत एकदा ओरडायला लागला. दुपारी आयने बांधून दिलेली भाजीभाकर खातानाही त्याला ते "आईस्क्रीम भाकरीवानी थंड आसल का?" असा प्रश्न पडला होता जो भैरू पर्यंत पोचलाचं नाही.

संध्याकाळ व्हायला लागली तसं जत्रेतली लोकं कमी झाली आणि आपापली गाठोडी बांधून दुकानदारही घरच्या वाटेला लागायला लागले होते. भैरुनेपण आपली कापडं नीट घड्या घालुन गाठोडं बांधायला सुरुवात केली. आज फारसा धंदा झाला नव्हता. आता दुसऱ्या गावातला पुढचा मोठा बाजार महिन्याभराने होता आणि आजची कमाई जेमतेम वीस दिवस जातील एवढीचं होती म्हणून तो जरा चिंतेतच होता. आणि सम्या अजूनही त्या आईसक्रीमच्या गाडीकडेच बघत होता.

गाठोडं डोक्यावर घेऊन मागन भैरू आला तरी त्याला कळलंच नव्हत.
"काय रे सम्या, काय बगतोयास तिथं?"
लहान असला तरी 'आपल्याला असलं काही घेता येणार नाही' हे सम्या ला माहीत होतं म्हणून तो काहीच उत्तर न देता घराच्या दिशेन निघाला.
तसा भैरू खाली बसला आणि म्हणाला "ते थंडगार खायचं नव्हं तुला? सकाळधरनं बगून रायलोय म्या."
सम्या मात्र काहीच न बोलता जमिनीकडे बघत गुमान राहिला.
"चाल, इकडं ये" अस म्हणत भैरुने त्याचा हात धरून त्याला गाडीकडे आणले.
आता दोन रुपयाचं ते थंडगार विकत घेणाऱ्या आपल्या बाबा कडे सम्या अविश्वासाने आणि अभिमानाने बघतच राहिला.

तो छोटासा काडीला लावलेला थंडगार रंगीत गोळा बाबाच्या हातातून घेताना सम्या हरखून गेला होता.आणि तो थंड थंड गोळा चाटणारया आपल्या पोराच्या डोळ्यातला निरागस आनंद भैरूही भान हरपून बघत राहिला.
तेवढ्यात "बाबा तू बी खा कि थोडं. लई गार वाटतं बघ." अस म्हणत सम्याने तो थंडगार गोळा भैरूपुढे धरला.
आणि पुढच्या महिन्याभराच्या चिंता सोडून भैरूसुद्धा सम्या एवढा तिसरीतला पोरगा होऊन पुन्हा एकदा रंगीत लहानपण जगायला लागला.

Thursday, September 23, 2010

ओरिगामी गणेश

हा लेख मायबोली (http://www.maayboli.com/) वर गणेशोत्सवासाठी प्रकाशित झाला होता.
*****
ओरिगामी हि एक जपानी कला. कागदापासून वेगवेगळे आकार तायार करणारी. अगदी साध्या बोटी पासून अगदी कठीण अशा ड्रेगन पर्यंत सगळेच आकार बनवता येतात यात.   जपानी मुलांना अगदी दोन वर्षापासूनच कागद कसा नीट दुमडायचा याची ओळख करून दिली जाते. शाळेतही ओरिगामी हा विषय शिकवला जातो. कधी कधी मला वाटत जपान्यांच्या नीटनेटकेपणामागे, आणि नियम काटेकोर पाळण्यामध्ये या ओरिगामी शिक्षणाचा फार सहभाग असावा.   ओरिगामी मध्ये प्रत्येक घडी अगदी काटेकोर असली तरच शेवटचा आकार आपल्या मनाजोगता येतो.  आणि असेही म्हटले जाते कि  ओरिगामी मुळे गणिती संकल्पना खूप पक्क्या डोक्यात बसतात. अर्थात हि ऐकीव माहिती आहे. 
एवढ असूनही मी कधी ओरिगामी शिकायच्या फंदात पडले नव्हते. नाही म्हणायला दोन तीन पुस्तके आणून सुरुवातीची फुलं , बोट अस काहीबाही करून बघितलं पण तेवढच. अलीकडे अचानक मला वाटलं कि ओरिगामी मध्ये गणपती करता येत असेल का? आंतरजालावर शोधून बघितलं पण फारस काही सापडलं नाही. भारताच्या ओरिगामी मित्र वेबसाईटवर गणपती केला आहे अस कळलं पण तो कसा करायचा ते मात्र मिळाल नाही.  मग हिरमुसले होऊन ती गोष्ट तशीच राहिली. आपणच प्रयत्न करून बघू असाही वाटलं पण कसा जमणार म्हणून सोडून दिलं. तरी बहुधा मनाने सोडलं नसावा हा विचार. कारण फावल्या वेळात ओरीगामिच्या वेगवेगळ्या घड्या पहात होते कधी मधी. त्यानंतर परत एकदा असच कागद हातात घेऊन , बघू या जमतय का काही असा विचार करत करून बघायला लागले आणि काय आश्चर्य चक्क गणपतीचा आकार जमतोय असा वाटलं. मग थोडं अजून शोध घेऊन कागदाला वळण कस द्यायचं ते शोधाल आणि त्यामुळे गणपतीची सोंडहि छान झाली. मग बरेच कागद वापरून पुन्हा पुन्हा करून एक पद्धत नक्की केली. आता तयार झालेला गणपती बघून आनंद अगदी गगनात मावत नव्हता. अगदी कुणाला सांगू आणि कुणाला नको अस झालं. तुम्हा सगळ्यांसमोर   ओरिगामी गणपती करायची पद्धत  दाखवायला गणेशोत्सवासापेक्षा योग्य संधी कुठली असणार ना. बहुधा म्हणूनच गणपती बाप्पा अगदी योग्य वेळी  कागदातून अवतरले असावेत.    
चला तर मग एक कागद , कात्री  आणि  गोंद घेऊन बसा माझ्या बरोबर.
१. लागणारे साहित्य

२. तुमचं काम करायला एक चांगली जागा , टेबल ठरवा.  कागद मार्बल पेपर (घोटीव कागद ) किंवा त्याप्रकारचा घ्या. फक्त फार जाड नको, आणि अगदी पातळ सहज फाटणारा नको. 

३. कागदाची दोन टोके अशा प्रकारे जुळवा

४. आणि मध्ये कर्णावर (digonal) एक घडी घालून घ्या.

५. आता कागद परत उघडा

६.  मग एक बाजू कर्णावर जोडली जाईल अशी दुमडा.

७. दिसरी बाजूही तशीच दुमडा.

८  मग परत एकदा नवीन तयां झालेली बाजू कर्णावर दुमडा.

९. दुसरी बाजू पण याच पद्धतीने दुमडा.

१०. तुम्हाला अशाप्रकारचा कोनाकृती आकार झालेला दिसला पाहिजे.

११.  त्या कोनच टोक घेऊन विरुद्ध बाजुला टेकवा.

१२. आणि दाबून नीट घडी पाडून घ्या.

१३.  त्यानंतर या अर्ध्या भागाला परत एकदा दाखवल्याप्रमाणे दुमडा. 

१४. आणि हा वर आलेला छोटा भाग उलट्या बाजूने परत एकदा दुमडा.

१५.   या घड्या उलगडल्यावर असा दिसले पाहिजे.

१६. मग हि जी पहिली घडी  अशी दिसली पाहिजे. 

१७. हि पहिली घडी तिथे कात्रीने दाखवल्याप्रमाणे कापा. दोन्ही बाजूला असे कापून घ्या.

१८. कापलेला भाग उघडून एक छोटीशी घडी घालून दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या.

१९. दोन्ही बाजूला सारखेच दुमडून घ्या. हा होईल गणपतीच्या कानाचा भाग.

२०. या कानाचे खालचे कोपरे किंचितसे दुमडा म्हणजे मग समोरून छान कानाचा  आकार येईल.

२१. आता समोरून बघितल्यावर गणपती सारखा दिसायला लागलाय ना?

२२. परत एकदा मागच्या बाजूने सोंडेचा भाग असा घडी करा.

२३ व २४. त्यावर उरलेला सोंडेचा भागहि तश्याच पद्धतीने घडी घालत रहा.

२५. शेवटी अस झिगझाग सारख दिसलं पाहिजे.

२६.  हे अस स्प्रिंग सारख वाटला पाहिजे मग हा सोंडेचा भाग छान दिसतो. 

२७. हे झिगझाग आघाडा. पण सगळ्यात पहिली घडी (२२ मध्ये घातलेली ) मात्र उघडू नका हं.  उघडल्यावर असा दिसत. पुढच्या पायऱ्या करायच्या नसतील तर इथेच थांबून सुद्धा चालेल. हाही आकार गणपतीसारखा दिसतोच आहे. डोळे काढल्यावर आणि दात लावल्यावर अगदी छान गणपती दिसतो. पण वक्रतुंड गणेश हवा असेल तर मात्र पुढच्या पायऱ्या कडे वळाच.

२८. या पुढच्या घड्या थोड्या कठीण आहेत. कागद अशाप्रकारे मध्यावर दुमडून घ्या.

२९. सोंडेसाठी  आपण आधीच पाडलेल्या आडव्या  घड्या परत एकदा दाबून नीट दिसतील अशा करून घ्या.

३०. आता दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आडव्या घडीसाठी एक तिरकी घडी करा. हि तिरकी घडी करताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जितकी जास्त तिरकी तितकी जास्त वळलेली सोंड. म्हणून कमी तिरक्या करा. घडी करताना त्रिकोणाचे शीर कागदाच्या उघड्या बाजूकडे ठेवा. हे उलटे केलेत तर सोंड बाहेर वळण्या ऐवजी आतल्या बाजूला वळेल. 

३१. उघडल्यावर अस दिसलं पाहिजे. हि खूपच महत्वाची पायरी आहे.

३२. त्या घड्या अशा त्रिकोणाकार दिसल्या तरच पुढच्या घड्या   घालता येतील.

३३. आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आडव्या आणि तिरप्या रेघेवर असं दुमडा. त्यामुळे तिरकी घडी वर येऊन  आडवी घडी त्या तिरक्या घडीच्या खाली झाकली जाईल.

३४. वरची पायरी अजून तीन आडव्या घड्यांसाठी करा.

३५. शेवटच्या घडीत मात्र अगदी टोक दिसू नये म्हणून थोडं टोक मागच्या बाजूला दुमडून घ्या. आणि शेवटची घडी अशी त्या मध्यकर्णावरच  आतल्या बाजूला वळवा. 

३६. आता तुमच्या घड्या अशा दिसू लागल्या असतील.

३७. मधली कर्णावरची घडी उघडल्यावर छानसा गणेशाकार दिसू लागला असेल नाही?  त्याचा वरचा डोक्याचा टोकदार भाग मागच्या बाजूला दुमडून टाका आणि मग गणपतीचा चेहेरा बघा किती छान दिसतोय ते. 

३८. त्याला सुंदरसे डोळे काढा. गंध काढा. आणि अरे हो दात राहिलाय ना अजून.

३९. आता एक पांढरा २ सेमी x २ सेमीचा तुकडा घ्या.   
४०. त्याचा परत ३ ते ७  पायऱ्या वापरून एक कोन करा. 

४१. तो मध्यावर दुमडून टाका  आणि मग हा चिमुकला कोन दाताच्या जागी गोंदाने चिकटवून टाका. 

४२ व ४३ . आता या गणपतीचे काय करणार बर? बघा तुम्हाला याचं पॉपअप ग्रीटिंग कार्ड करता येईल. 
 

४४. मी हा गणेश असा सोनेरी कागदावर चिकटवून भिंतीवरच लावलाय. 

   
  काय मग आता शिकवणारना हा गणपती आपल्या मित्र मैत्रीणीना आणि आजुबाजूच्या बच्चे कंपनीला? तुम्हाला आणि इतरांनाही आवडला तर मला येऊन सांगायला विसरू मात्र नका. 


या इथे तुमच्यासाठी सगळ्या पायऱ्या एकत्र. 


       

Thursday, September 16, 2010

कापसाची म्हातारी

त्यादिवशी एक कापसाची म्हातारी मला आणि लेकीला दिसली. ती पकडे पर्यंत उडत उडत दुर गेली. आणि ती गेली म्हणुन लेकीने भोकाड पसरलं. ते आवरायला हि गोष्ट इंस्टंट्ली सुचली आणि तीला सांगितली. त्यानंतर परत संध्याकाळी एक म्हातारी दिसली तर तीने तीला उडून दुर जाउ दिलं !

---------------------
कापसाची म्हातारी

खूप खूप उन पडलं होतं. अंगणातली जमीन नुसती भाजून निघत होती. झाडांचा पक्षांचा जीव उन्हाने तल्लख होत होता. तेवेढ्यात कुठूनतरी वाऱ्याची एक गरम झुळूक आली आणि तिच्याबरोबर उडत आली एक कापसाची म्हातारी. म्हातारी कुठून उडत आली होती कोणास ठाऊक ? पण एवढ्या उन्हात सुद्धा ती अगदी मजेत उडत होती.
उडता उडता तिला भेटली एक चिमणी. चिमणीला म्हातारी बघून गंमतच वाटली. तिने विचारलं "अरे हां कुठला नवीनच बिनपंखाचा पक्षी?"
म्हातारी म्हणाली "अगं चिमणे, मी तर कापसाची म्हातारी."
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"

मग म्हातारी निघाली पुढे उडत उडत. उडता उडता म्हातारी एका बागेत पोचली. तिथल्या फुलांना वाटलं फुलपाखरूंच आलं. फुलं म्हणाली
"कित्ती छान फुलपाखरू आहेस रे तू! येरे ये फुलपाखरा मध पी , आराम कर आणि मग पुढे जा."
म्हातारी म्हणाली. "सुंदरशा फुलांनो धन्यवाद. पण मी काही फुलपाखरू नाही.मी आहे कापसाची म्हातारी. "
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"
फुलं म्हणाली "अरे वा छान छान. दूरच्या फुलांना पण आमचा थोडा वास दे."

म्हातारी परत आपली उडायला लागली. आता वाटेत दिसलं एक फुलपाखरू. ते त्याच फुलांवर बसायला चाललं होतं. म्हातारीला पाहून त्याला सुध्दा आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं "अरे तू चतुर आहेस कि काय?"
म्हातारी म्हाणाली "नाही रे बाबा. .मी तर कापसाची म्हातारी."
 "वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"

एवढ बोलून म्हातारी उडतेय तोच बागेत मुलं आली संध्याकाळची खेळायला. उडणारी म्हातारी मुलांना दिसली आणि मुलं तिच्या मागून तिला पकडायला धावायला लागली. जोरजोरात पळताना एका चिमुकल्या मुलीने पकडलंच शेवटी म्हातारीला.
म्हातारी कळवळून तिला म्हणाली " अगं अगं मुली. सोडना मला. मी आहे कापसाची म्हातारी"
 "वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"

चिमुकल्या मुलीला म्हातारीची दया आली आणि तिने म्हातारीला सोडून दिलं. म्हातारी मग आनंदाने उडत उडत दूर गेली. रात्र झाल्यावर वारा बंद झाला तशी म्हातारी जमिनीवर बसली. तिथे तिने बी जमिनीवर टाकून दिलं.
खूप दिवसांनी जेव्हा पावसाळा आला तेव्हा ते बी रुजलं आणि तिथे एक छान सावरीच रोप उगवलं.


----------------------------

हि गोष्ट सांगताना मुलांना, ते बी हवेत कसं उडतं आणि नविन रोपांची रुजवण कशी होते त्याबद्दल सांगता येईल.

Friday, September 10, 2010

गणपती बाप्पा मोरया!!

गणपती बाप्पा मोरया!!