Monday, May 14, 2012

ऑलिम्पिक - भारतासाठी ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव


ऑलिम्पिक -  भारतासाठी  ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव   


घरातले शेंडेफळ असणाऱ्या  खाशाबाला   लहानपणापासून खेळण्याची फार आवड होती.  पोहोणे, कुस्ती, कबड्डी, धावणे या सगळ्याच गोष्टी त्याला आवडत आणि त्यात तो पटाईतही होता.  कुस्तीचे सुरुवातीचे  धडे तर त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. थोड्याच काळात तो आसपासच्या परिसरात कुस्तीगिरीसाठी ओळखला जाऊ लागला.  आंतर कॉलेज स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवू लागला.  इतकेच नव्हे तर  देशभरातही त्याचे नाव व्हायला लागले. नंतर बळवडे आणि बेलापुरे गुरुजी यांनीही त्याला प्रशिक्षण दिले.  

खाशाबाची  १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी  देशातून निवड झाली.  या जाण्यायेण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करून पैसा गोळा करावा लागला होता.  mat वर खेळ करणे भारतात नवीनच होते त्याची तयारीही करावी लागली होती.   त्यावेळी तो फ्लायवेट विभागात खेळला होता आणि सहावे स्थान मिळवले होते. भारतासाठी हि फारच मोठी कामगिरी होती. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी हेलसिंकी ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत स्थान मिळवून पात्रताही मिळवली.  

आता हेलसिंकीच्या ऑलिम्पिक मध्ये प्रवेश तर मिळाला पण जायचा यायचा खर्च करण्याचा प्रश्न होताच. सरकारकडून  याही वेळी कुठलीच मदत मिळाली नव्हती.  त्यावेळी  कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल प्रा. खर्डेकर / शहाजी law कोलेजच्या प्रा. दाभोळकर # यांनी आपले घर गहाण ठेवून पैसे  गोळा केले. ते जाण्यायेण्याच्या खर्चासाठी वापरता आले. खाशाबाच्या कराडमधल्या  गावातल्या   दुकानदारांनी धान्य आणि इतर वस्तू पुरवल्या  आणि खाशाबाला हेलसिंकीला धाडले.    त्यावेळी तिथे पोहोचल्यावर रहाण्यासाठी, खाण्यासाठी खाशाबाला काय करावे लागले असेल आणि कसे केले असेल ते त्यालाच ठाऊक. प्रत्यक्ष स्पर्धेत कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, जपान * अशा  देशातल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून ताम्रपदक मिळवले. 

त्याकाळी   फोन सारखी संपर्क साधनेच नव्हती.  टीव्हीही नव्हता त्यामुळे श्री. खाशाबा दादासाहेब जाधव यांचे  परतल्यावर लहानसे स्वागत झाले मात्र कराड आणि त्यांच्या गावी खूप उत्साहाने स्वागत केले गेले. १०१ बैलगाड्यांची मिरवणुकाही काढण्यात आली. 
पुढे  त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्ष नोकरी केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना पेन्शन साठी सुद्धा प्रयत्न करावे लागले. 

के डी  जाधव यांनी ताम्रपदक मिळवल्यावर पुढचे वैयक्तिक पदक मिळवायला भारताला ५० वर्षे लागली ! 

त्यांच्या स्मरणार्थ  दिल्ली इथल्या कुस्ती स्टेडीयमला के डी  जाधव स्टेडीयम असे नाव देण्यात आले आहे. 
---------

आज विचार केला तर वाटत त्यावेळी कसे काय ते  स्वत:च्या हिम्मतीवर ऑलिम्पिक मध्ये गेले असतील आणि कसे काय पदक मिळवले असेल. दुर्दैवाने sponsor मिळवणे, प्रशिक्षक मिळवणे, प्रशिक्षणासाठी पैसा उभा करणे या गोष्टीमध्ये अजूनही फारसे बदल झाले नाहीत असे वाटते. खेळाडूला खेळण्यापेक्षा या गोष्टींची चिंताच करावी लागली तर त्याचा खेळावर परिणाम दिसणारच. शेवटी सगळेच काही खाशाबा जाधव यांच्यासारखे नसतात.      

--------- 
# दोन लिंक वर दोन वेगळी नाव आहेत. नक्की कोणी याचे संदर्भ मिळाले नाहीत 
* देशांची नावेही दोन लिंक वर वेगवेगळी आहेत. 
संदर्भ