Wednesday, February 26, 2014

कथाकथी - हातमोजे (अनुवाद) - (Marathi Audio Book)










Story - Niimi Nankichi

Translation - Swapnali Mathkar 
Narration - Adv. Madhavi Naik 
Background Music & Editing - Spruha Sahoo

कथा -  नीइमी नानकीची

अनुवाद - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू  


मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने जपानी बालसाहित्यातील एका गोड कथेचा मराठी अनुवाद सादर करीत आहे  

手袋を買いに
新美南吉
(published in 09/ 1943 )


हातमोजे


एका जंगलातल्या बिळात एक कोल्हीण आणि तिचं लहानसं पिल्लू रहात होतं. उत्तरेकडून येणारे बोचरे वारे या जंगलात देखील येऊन पोचले होते.  अशा कडक हिवाळ्यात एके दिवशी सकाळी पहिल्यांदाच कोल्ह्याच पिल्लू बिळातून हळुचकन बाहेर पडलं.     
"आई ग्गऽ " बाहेर आल्या आल्या डोळे गच्च बंद करत पिल्लाने तक्रार केली तशी कोल्हीण धावत पिल्लाजवळ गेली आणि पहायला लागली.  
"माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंऽ उं उंऽ. लवकर काढ ना." पिल्लू रडत रडत सांगायला लागले.   
कोल्हीणीने पिल्लाचे डोळे नीट पाहीले पण तीला काही दिसेना.  तितक्यात तिला लक्षात आले की हे पिल्लू पहिल्यांदाच बिळातून बाहेर पडलेय. तशी ती हसत हसत त्याला म्हणाली "अरे, हा तर बर्फावरून परावर्तित होणार प्रकाश आहे ! तू कधीच इतका प्रकाश पाहीला नसल्याने तुला डोळ्यात काहितरी गेलं असं वाटतंय"  

आईने समजूत घातल्यावर मात्र पिल्लू बाहेर खेळायला लागले.  बाहेर जिकडे पहावे तिकडे नुकताच पडुन गेलेला बर्फ होता. त्या बर्फाच्या कणांवरून चमकणारा प्रकाश पाहून पिल्लाला गंमत वाटत होती.  त्या पावडर सारख्या बर्फातून पिल्लू धपाधप उड्या मारत खेळायला लागले.  तितक्यात वरून काहितरी बर्फात पडल्याचा आवाज झाला.  थोडेसे घाबरून आणि थोडे उत्सुकतेने पिल्लाने पुढे जाऊन पाहीले तर बर्फाशिवाय काहीच दिसेना. मग त्याच्या लक्षात आले की झाडाच्या फांदीवरचा बर्फ उन्हाने खाली पडत होता. पुन्हा एकदा पिल्लू मजेत खेळायला लागले.  

बराच वेळ मनसोक्त खेळून झाल्यावर पिल्लू बिळात परतले तशी त्याच्या लक्षात आले की त्याचे हात खूपच गार पडले आहेत. 
"आईऽ,  बघ ना माझे हात कसे झालेत ते, आणि खूप दुखताहेत सुद्धा" कोल्हीणीला आपले थंडीने लाल झालेले आणि गार पडलेले दोन्ही हात  दाखवत पिल्लू म्हणाले. 
आईने पिल्लाच्या हातावर उबदार फुंकर मारली आणि आपल्या हातांनी त्याचे हात गरम करायला लागली. 
"आता थोडे दिवसात थंडी जाईल आणि बर्फही जाईल. मग छान उबदार वाटेल हं.  " असं आई म्हणाली खरं पण पिल्लाच्या नाजूक हातांना बर्फाने त्रास होईल अशी काळजी तिला भेडसवायला लागली. पिल्लाच्या चिमुकल्या हाताच्या मापाचे छोटेसे हातमोजे मिळाले तर किती बरं होईल असंही तीला वाटुन गेलं. 

खूप रात्र झाली तरी सगळीकडे बर्फच बर्फ असल्याने काळामिट्ट अंधार मात्र पडलाच नव्हता.  मग तशाच रात्री कोल्हीण बिळातून बाहेर पडली. तिच्या पाठून पिल्लूही बाहेर पडले आणि ते दोघे चालायला लागले.  पिल्लू  कोल्हीच्या पोटाखालून इकडेतिकडे बघत चालत होते. तितक्यात दूर कुठेतरी प्रकाश लुकलुकताना पिल्लाला दिसला. 
"आई, ती बघ चांदणी!"
"ती चांदणी नाहीये बाळा. ते जंगलाजवळच्या गावातले दिवे आहेत" कोल्हीणीने पिल्लाला सांगितलं.  ते दिवे बघताना कोल्हीणीला पूर्वी एका मित्राबरोबर घडलेला प्रसंग आठवला. तेव्हा तो कोल्हा त्या गावात शिरून त्याने एक पाळलेले बदक पळवायचा प्रयत्न केला होता. पण त्याच वेळी तिथल्या शेतकऱ्याच्या ते लक्षात आलं आणि त्याने कोल्ह्याला पळवून लावलं होतं. 
"आई, काय करतेयस? चल ना जाऊया आपण" पिल्लाने तिची तंद्री मोडली.  
तो प्रसंग आठवल्यानंतर पुन्हा त्या गावाकडे जायचा कोल्हीणीचा धीरच होत नव्हता. पण पिल्लासाठी मोजेतर हवे होते. दुसरा काही उपायही सुचत नव्हता. शेवटी हो ना करत तिने पिल्लाला एकट्यालाच गावात पाठवयाचे ठरवले. 
"तुझा हात पुढे कर बघू" असे म्हणत कोल्हीणीने पिल्लाचा हात हातात घेतला आणि हलकेच दाबला, तसे तो हात हुबेहूब एका छोट्या मुलाच्या हातासारखा दिसायला लागला !
पिल्लू आपल्या नवीन वेगळ्याच हाताकडे पहातच राहीलं.      
"हे काय आई?"
"तुझा हा हात आता एखाद्या लहान मुलाच्या हातासारखाच आहे. तिथे गावात जाशील तिथे खूप घरं दिसतील बरं का. त्यातलं दारावर गोल टोपी लावलेलं टोपीविक्याच घर शोध आणि त्याचा दरवाजा ठोठाव. एखादा माणुस दार हळुच किलकिलं करेल. त्या छोट्याश्या जागेतुनच हा तुझा माणसासारखा हात तू आत घाल आणि या मापाचे हातमोजे द्या अशी मागणी कर.  चुकूनही दुसरा हात बाहेर काढू नकोस हं का. " कोल्ही पिल्लाला गावात जाऊन काय करायचे ते सांगत होती 
"का?  " तितक्यात पिल्लाने विचारलेच. 
"माणसं ना, आपल्यासारख्या प्राण्यांना हातमोजे देणार नाहीत. उलट आपल्याला बघितलं तर पकडतील आणि पिंजऱ्यात ठेवतील.  माणसं अजिबात चांगली नसतात म्हणुन. कळलं? दुसरा हात अजिबात बाहेर काढायचा नाही. " कोल्हीने पिल्लाला समजावलं. 
हुं म्हणुन पिल्लू त्या अंधारात लुकलुकणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने जायला लागलं.  गावात पोचल्यावर पिल्लाला काचेची तावदानं असलेली घरं दिसली.  लाईटचे खांब दिसले, सायकलचे दुकान दिसले.हे सगळे बघत बघत टोपीविक्याचं घर तो शोधायला लागला. खरंतर पहिल्यांदाच गावात आलेल्या त्या पिल्लाला हे सगळं काय आहे तेच कळत नव्हतं. तितक्यात त्याला ते  टोपीविक्याच घर दिसलं, त्याच्या दारावरच एक मोठ्ठी काळी टोपी लावली होती. 
पिल्लाने हळुच दरवाजा वाजवला.  तसा एका माणसाने दरवाजा उघडला . 
"या हाताच्या मापाचे हातमोजे द्याल का?" अशी विचारणा करत पिल्लाने नेमका चुकीचा हातच पुढे केला. 
तसा दुकानदार थोडा दचकला  'अरेच्च्या हा तर कोल्ह्याच्या पिल्लाचा हात दिसतोय. आणि हा हातमोजे कसे विकत घेणार, झाडाची पान देऊन की काय?'
"आधी मला पैसे दे मग हातमोजे देतो" दुकानदार पिल्लाला म्हणाला. 
पिल्लाने आईने देऊन ठेवलेली नाणी दुकानदाराला दिली.  खणखण अशी नाणी वाजवून पाहिल्यावर ही नक्कीच नाणी आहेत याची दुकानदाराला खात्री झाली.  आणि त्याने लहान  मुलाच्या मापाचे हातमोजे पिल्लाला दिले. 

'आई आपल्याला उगीच घाबरवत होती. आतातर त्या माणसाने माझे हात बघूनही काही केले नाही'  असे म्हणत पिल्लू जंगलाकडे परत निघाले. तितक्यात त्याला कसलासा नाजूक आवाज आला म्हणुन त्याने काचेच्या खिडकीतून वाकून पाहिले.  
"गाई गाई आईच्या मांडीवर 
गाई गाई आईच्या कुशीत..."
एक आई आपल्या बाळाला अंगाई म्हणत झोपवत असताना दिसली. 
आपली आईसुद्धा आपल्याला झोपवताना असंच हळुवार गाणं म्हणते ते पिल्लाला आठवलं.  
"माणसाच्या आईचा आवाजसुद्धा माझ्या आईपेक्षा काही वेगळा नाहीये.  "   पिल्लू विचार करायला लागलं.  तितक्यात त्याला लहान मुलीचा आवाज ऐकू आला.  
"आई, अशा बर्फाच्या रात्री जंगलात रहाणारी कोल्ह्याची पिल्लं थंडी वाजते म्हणुन रडत असतील का गं ?"
"नाही गं.  छोटी छोटी कोल्हयाची पिल्लं सुद्धा त्यांच्या आईची अंगाई ऐकत बिळात गुडूप्प झोपली असतील आता.  ती शहाण्या बाळासारखी लवकर गाई गाई करतात माहितेय?  "

हे ऐकल्यावर पिल्लाला आईची आठवण आली आणि ते उड्या मारत, धावतच आईकडे पोचलं. कोल्ही पिल्लाची काळजी करत आता येईल , मग येईल म्हणत त्याचीच वाट बघत होती.  पिल्लू परत आल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेत ती जंगलाकडे चालायला लागली. 

आता चंद्र उगवला होता. त्या प्रकाशात कोल्हीचे केस चंदेरी दिसत होते.  त्यांचे पावलाचे ठसे निळ्याकाळ्या सावलीत बुडून जात होते. चालता चालता पिल्लू म्हणाले 
"आई, माणसं काही तितकी वाईट नाहीत गं ". 
"ते कसं काय?"
"अगं मी चुकून दुसराच हात पुढे केला होता. पण त्या दुकानदाराने मला न पकडता इतके छान मापाचे हातमोजे दिले" आपल्या हातमोजे हातलेल्या हातांनी टाळी वाजवत पिल्लू म्हणाले. 
"ओह.." असं म्हणत खरंच माणसं चांगली आहेत की काय असा विचार कोल्हीण पुन्हा चालायला लागली.