skip to main | skip to sidebar

गंमत गोष्टी

कुनिदेशात गोष्टी वाचण्याआधी लहान मुलं एक छान गाणं म्हणतात. याचा अर्थ आहे सगळे मिळून शांततेने मजेदार गोष्ट ऐकुयात. चला तर मग आपण पण गाणं म्हणून वाचायला सुरुवात करू.
कामीशिबाई कामीशिबाई
पाची पाची पाची पाची उरेशिई कामीशिबाई
श् श् श् श् ....शिझुकानी किकीमाश्यो.

Tuesday, April 14, 2020

कथाकथी - प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वारी (Marathi Audio Book)







Story - Swapnali Mathkar © 
Narration - Adv. Madhavi Naik 
Background Music & Editing - Spruha Sahoo

कथा -  स्वप्नाली मठकर
कथाकथन - अ‍ॅड. माधवी नाईक

पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू  




प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वारी 


चिंगु आणि पिंगू नावाचे दोन चतुर भाऊ बहिण होते.  दोघांचेही डोळे मोठ्ठे चकचकीत होते. पंख सुद्धा आईसारखेच सुंदर पारदर्शक होते. शेपुट मात्र अजून छोटुशीच होती. हो! अजून दोघे छोटेच होते ना. त्यामुळे त्यांची शेपटीही पिटुकलीच होती. कधी एकदा मोठे होऊ आणि  छान आईसारखी लांब शेपटी होईल याची दोघे वाट बघत असत.  

चिंगु होती निळ्याशार झळकदार रंगाची. उन्हात बसली कि तिचे अंग मोरपिसासारखे चमकायचे. काचेसारख्या चमकदार डोळ्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडल्यासारखे दिसायचे. 

पिंगू   होता लालबुंद ! संध्याकाळचे केशरी रंग याच्या अंगावर आणि डोळ्यांत उतरलेत की काय असेच वाटायचे.

तर  हे दोघे खूप खूप खेळायचे. दिवसभर नुसते भटकत असायचे. कधी गवताच्या तुऱ्यावर झोका घ्यायचे.  कधी कमळाच्या सुकलेल्या देठावर बसून टकमक सगळीकडे बघत राहायचे. कधी पाण्यावर हलकेच तरंगून आपले प्रतिबिंब पहायचे.  तर कधी आपल्या पायांनी  फुलांना गुदगुल्या करायचे. मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूच्या नवनवीन गोष्टी बघताना दोघे अगदी हरखून जायचे. 
असे   नेहेमीचे खेळ खेळत एक दिवस दोघे चुकून मोठ्या रस्त्यावर आले. 

"अरे हे बघ काय, इथे मधल्या जागेवर झाडच नाहीयेत! " रस्ता बघून  चिंगुला खूप आश्चर्य वाटलं. 

"अगं, हाच  रस्ता असेल मग. माणसं जातात ना तो रस्ता!! " पिंगुने आईकडून रस्त्याबद्दल ऐकले होते. 

दोघे जण असे बोलत असतानाच टूर्रऽ टूर्रऽऽ असा आवाज करत काहीतरी जोरात गेले. 

"हे काय आणि नवीनच? आणि कित्ती जोरात गेले ना!?"  पुन्हा एकदा चिंगुने विचारले. 

"ही ना बहुतेक स्कूटर असणार. आई नव्हती का सांगत आधी. "  पिंगू चिंगुला माहिती देत होता तेवढ्यात मागून पुन्हा एकदा तसाच आवाज झाला. दूर वरून अजून एक स्कूटर येत होती. यावेळी धीर करून चिंगु चक्क स्कूटर चालवणाऱ्याच्या टोपीवरच बसली. आणि काय आश्चर्य! त्या स्कूटर बरोबर चिंगुही जोरात पुढे जायला लागली. जोरात उडणाऱ्या  वाऱ्यावर  पंख सावरायची धावपळ झाली तरी चिंगुला मस्त मज्जा आली.  मधेच चिंगु उडाली आणि पुन्हा मागे पिंगू होता त्याठिकाणी परत आली.

इथे पिंगुची मात्र घाबरगुंडी उडाली होती. चिंगु परत आलेली पहाताच त्याला जरा बरं वाटलं.  मग चिंगुने आत्ता आलेली सगळी गम्मत पिंगुला सांगितली आणि त्यालाही पुढच्या वेळेसाठी तय्यार केलं.थोड्याच वेळात पुढची स्कूटर आली तशी चिंगुने पिंगुचे पंख धरत त्यालाही आपल्याबरोबर घेतलं आणि दोघे पटकन स्कूटरवाल्याच्या टोपीवर बसले. सुरुवातीला भीती वाटली तरी आता पिंगुला फार मज्जा यायला लागली. 

"याऽहुऽऽऽ!!! काय मज्जा येतेय. " 

"हो ना! जोरात उडाता येतंय आणि पंखही हलवायला लागत नाहीयेत! धम्मालच धम्माल!"

पायाने  टोपी घट्ट पकडून दोघेही मज्जा करत होते. स्कूटर थोडी दूर जाताच पुन्हा उडून परत आधीच्या जागी थांबत होते आणि नवीन स्कूटर ची वाट बघत होते.  दिवसभरात स्कुटरवरून जाणाऱ्या दोन टोप्यांवर, दोन   मोठ्ठ्या मुंडाश्यांवर , तीन गजर्‍यांवर, एका गवताच्या भाऱ्यावर, एका घोंगडीवर बसून त्यांची गम्मत जमत चालू होती.  

संध्याकाळ व्हायला लागली तशी दोघांची आईच त्यांना शोधत तिथपर्यंत आली. स्कूटरवर बसणाऱ्या माणसांच्या डोक्यावर बसणारी  आपली मुलं पाहून तिला खूपच  हसू आलं. आणि चक्क पुढच्या स्कूटरवर आई , चिंगु , पिंगू असे तिघेही बसले.   

घरी परत जाताना आज काय काय गम्मत केली  ते सांगताना पिल्लांचे डोळे  आणि ऐकताना आईचे डोळे कधी नव्हे तेवढे चमकत होते. दुसऱ्या दिवशी परत यायचे ठरवत रात्री चतुराची पिल्लं आईजवळ झोपी गेली.  




Posted by Swapnali Mathkar at 5:01 AM 3 comments
Labels: ऐका, ऑडियो, ऑडियो कथा, कथाकथन, कथाकथी, प्राणीकथा

Wednesday, April 8, 2020

सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग

सायुच्या गोष्टी :  सुट्टीतले स्केटींग

"हुर्रे!! उद्यापासुन शाळेला सुट्टी!!!"  शाळेच्या बसमधुन उतरताच सायु अाणि मित्रमंडळी नाचायलाच लागली. 
"ए,  उद्या सकाळपासुनच बागेत खेळूयात,"  चिनू म्हणाली.
"तू उद्यापासुन खेळणार? अाम्हीतर बाबा अात्तापासुनच खेळणार, " तिला चिडवत अादी म्हणाला.
"अाधी घरी जाऊन बॅग तर ठेवूयात,"  निहाने सांगितले. तशी नाईलाजाने सगळे अापापल्या घरी निघाले.
इतक्यात सायूला अाठवलं, "ए अाज संध्याकाळपासुन स्केटींगचा क्लास चालू होणार अाहे ना?  मला करायचंय स्केटींग. तुम्ही येणार अाहात ना?"
हो.  हो चा गलका करत सगळे पुन्हा दहा मिनीटे तिथेच गप्पा मारत राहीले.  बस जाऊन बराच वेळ झाला तरी यांच्या गप्पा काही संपेनात.   शेवटी मुलं अजून  कशी अाली नाहीत ते पहायला नीरुची अाज्जी अाली तेव्हा कुठे सगळेजण घरी गेले. 
संध्याकाळी स्केटींगरिंक जवळ सगळीजणं वेळेअाधीच हजर झाली.  तिथेच जवळ सोसायटीच्या बागेचं काम करणाऱ्या मावशींची मुलगी प्रणिताही खेळत होती. एरवी सायुची गॅंग खेळताना प्रणिताही  त्यांच्याबरोबर खेळायची. नेहमी सारखीच अाजही ती खेळायला अाली. पण अाज मात्र सगळेजण स्केट्स बांधण्यात गुंग होते.  प्रणिता मुलांच्या नविन स्केटस कडे कुतूहलाने पहात बसली. शिकवणारी दीपाताई अाल्यावर गॅंग रिंग मधे गेली आणि त्यांचं पडत, धडपडत शिकणे सुरू झाले. क्लास संपेपर्यंत प्रणिता तिथेच कठड्याला टेकून उभी राहुन अनिमिष नजरेने गोल गोल फिरणाऱ्या मुलांकडे पहात राहिली.  
नंतर स्केट्स काढताना मात्र सायुचे लक्ष प्रणिताकडे गेले.
"
चल प्रणिता, पकडापकडी खेळूयात आपण की लपाछपी खेळायची?"  सायुने विचारले.  तरी प्रणिता आपली सायुच्या स्केट्सकडेच टक लावून  पहात होती. 
"मी हात लावून पाहू? " प्रणिताने सायुला विचारले. 
"हो घालूनच पहा की ," म्हणत सायुने तिला स्केट्स घालायला सुरुवातही केली. 
प्रणिता एकदम खुशीत येऊन उभी रहायला लागली आणि पाय घसरून धप्पदिशी पडली,  तसे सगळेच हसायला लागले. 
"ए प्रणिता, तू पण शिक ना आमच्या बरोबर. मज्जा येते गोल गोल फिरायला, " सायु तिला  हात देत म्हणाली. 
क्षणभर प्रणिताचे डोळे एकदम आनंदाने लुकलुकले पण लगेचच भानावर येत ती म्हणाली,  "नाही गं. असे स्केट्स आणायला आणि ताईची फी द्यायला खूप पैसे पडतात. नाही जमणार मला."
सायु , निहा, नीरु सगळेच एकदम हिरमुसले.  प्रणिता त्यांच्या शाळेत नसली तरी त्यांची मैत्रिणच होती. नेहेमीच तर ते सगळे एकत्र खेळायचे . पण आता प्रणिता स्केटींग शिकू शकणार नाही म्हटल्यावर सगळ्यांचाच मुड गेला. 
"काहितरी करायलाच पाहिजे बाबा आपण," शेवटी न राहवून  आदी म्हणाला. 
"हो खरच. पण काहितरी म्हणजे काय? आपण पैसे कुठून आणणार स्केट्स साठी आणि फी साठी?"   चिनूने विचारले 
"आयडिया ! माझ्या दादाचे जुने स्केट्स आहेत. ते मी आणेन प्रणितासाठी"  निहा आपला चष्मा सावरत  आनंदाने म्हणाली,  तसं  सगळ्यांनाच जरा बरं वाटलं. 
"अरे पण फीचे काय?  दीपाताईंची फी तर द्यायला लागेल ना," आदीने पुन्हा एकदा प्रश्न वर काढला. 
इतका वेळ सायु नुसताच विचार करत होती. मात्र आता अचानक तिला एक कल्पना सुचली. 
"जर आपण काहितरी बिझनेस करून पैसे मिळवले तर?"
"वॉव. मस्त. " सगळेच एका सुरात ओरडले.  
"अरे! आधी कसला बिझनेस करणार ते तर ठरवा." 
"हम्म. काय करूयात? खरी कमाई सारखं घरी जाऊन लोकांची मदत करूयात? "  चिनूने एक प्रस्ताव ठेवला. 
"ए हा काय बिझनेस आहे का? आणि त्यात आपण किती पैसे कमावणार असे?" आदी वैतागला. 
"हो ना. दीपाताईंची फी हजार रुपये आहे. तेवढे आपण कसे कमावणार?" नीरु विचार करत म्हणाला. 
"लोकांना भाजी आणु देऊयात? "
"हम्म त्यात तरी काय कमाई होणार? एकदा भाजी आणुन दिली तर एक दोन रुपये मिळतील.  मला वाटतं आपण काहितरी बनवून विकुयात," शेवटी सायुने आपली कल्पना सांगितली. 
"वॉव सायु. भन्नाट आयडीया आहे. "   
ही कल्पना आदिला आणि एकुणच सगळ्यांना फार आवडली. आता काय बनवयचं हे मात्र ठरवायला हवं होत. दिवाळीचा कंदील केला असता पण दिवाळीला कितीतरी वेळ होता. मग कंदील कोणी विकत घेतलाच नसता. तसंच पणत्याही कोणी आत्तापासून घेणार नाहीत.  गणपतीच्या आजूबाजूला ठेवायला सजावट करावी तरी ती मे महिन्यात म्हणजे फारच लवकर होईल.   अश्या एक एक गोष्टी सुचून बारगळत होत्या. शेवटी शाळेत शिकवलेला पेन स्टँड किंवा  पुस्तकात ठेवायचे बुकमार्क या गोष्टी सुचल्या.  पण पेन स्टँड करायला फार वेळ लागला असता शिवाय कार्ड पेपर वगैरे साहित्य विकतही आणावे लागले असते. मग  हो ना करता पुस्तकात ठेवायचे बुकमार्क बनवून विकायचे असे सर्वानुमते ठरले. 
 "फी हजार रुपये   आहे आणि एका बुकमार्कची किंमत पंचवीस रुपये ठेवली तर  आपल्याला चाळीस  बुकमार्क बनवावे लागतील," निहाने  हिशोब केला. 
"हो आणि आपण आपल्या मागच्या वर्षीच्या जुन्या वह्यांचे पुठ्ठे त्यासाठी वापरू शकतो. त्यावर छान रंगीत कागद लावून, चित्र काढुन, एखादी कविता लिहून छान सजवुयात," सायु म्हणाली 
"रंगीत कागद सुद्धा घरात आहेतच आपल्याकडे  म्हणजे विकत काही आणायला नको"  चिनू  आनंदाने म्हणाली.
इतका वेळ हे सगळे ऐकत बसलेल्या ? प्रणिताला खूपच आनंद झाला. अर्थातच ती ही या बुकमार्क करण्याच्या उद्योगात  सहभागी होणार होती. 
दुसऱ्या दिवशी सकाळीच ही गँग आणि प्रणिताही सायुच्या घरी जमली. येताना प्रत्येकाने आठवणीने  आपापल्या घरातले जुन्या वह्यांचे पुठ्ठे,  रंगीत कागद, सजावटीचे साहित्य,कात्री, गोंद असे सगळे साहित्य आणले होते.   त्यांना घरी आलेले पाहूनच आज्जीआजोबांना कळले की आज गँग ऑफ फाईव्ह  चे काहितरी स्पेशल चालू आहे .  
 मुलांनी  व्यवस्थित पुठ्ठे कापून त्यांना  रंगीत कागद लावले. त्यावर सुंदर चित्र काढली.  सायुने रात्रीच आईकडून बालकवींच्या कवितांचे पुस्तक काढून घेतले होते. मग काही बुकमार्कवर मुलांनी पुस्तकातल्या कवितेच्या दोन दोन ओळीही लिहील्या.  या तयार बुकमार्कना भोक पाडून त्यात लाल सॅटिनची रिबन बांधली.   या कार्यक्रमात  गँग  इतकी गुंग झाली होती की जेवणाची वेळ झाली तरी कोणाचे लक्षच  नव्हते.     शेवटी आजोबांनी हाका मारल्या तेव्हा मुलं जेवायला उठली.  जेवणाच्या वेळेपर्यंत चक्क दहा बुकमार्क तयार होते.   
जेवून पुन्हा मुलं आपल्या कामाला लागली.  मुलं अजून घरी  आली नाहीत  म्हणून  सगळ्यांच्याच घरून फोन येऊन गेले पण गँग  काही आपले काम सोडायला तयार नव्हती.     संध्याकाळी सायुची आई येईपर्यंत अजून आठ दहा बुकमार्क तयार होते. आई घरी आल्यावर सुट्टी असूनही बाहेर न खेळता गँग घरात आहे हे पाहून तिला जरा आश्चर्यच वाटले. 
खुणेनेच आज्जीने 'सकाळपासून बसलेत' असे सांगितले. तशी सायुच्या आईला जरा काळजीच वाटली.  
"काय आज काय घरात राहून खेळ का? "  असे विचारत ती सरळ मुलांमध्येच जाऊन बसली. मुलांनी केलेले बुकमार्क पाहून मात्र तिला एकदम कौतुक वाटले.
"
काय इतके बुकमार्क तयार करून काय करणार आहात? "  
"
आई ,आम्ही किनई हे बुकमार्क विकणार आहोत. "
"अस्सं होय? पण कशासाठी?"
"अगं आई  बुकमार्क तयार झाले ना की सोसायटीत विकायला जाणार आहोत आम्ही. हे बुकमार्क विकून जे पैसे येतील ना ते आम्ही दीपाताईला देणार. मग ती प्रणिताला सुद्धा स्केटिंग शिकवेल.  निहाकडे तिच्या दादाचे जुने स्केट्स आहेत ते प्रणिताला वापरता येतील.  म्हणजे मग आम्ही सगळे नेहेमी सारखे एकत्र खेळू आणि स्केटिंग करू. "
हे ऐकून सायुच्या  आईला सगळ्याच मुलांचे फार कौतुक वाटले. पहिल्यांदाच मुलांनी इतक्या जबाबदारीने  असे काही काम करायला सुरुवात केलीये ते ही त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्याबरोबर स्केटींग करता यावं म्हणुन हे पाहून आईला खुपच अभिमान वाटला.    
थोड्यावेळाने खाऊनपिऊन गँग  स्केटींग रिंग जवळ जमली. दीपाताई आल्यावर मात्र सगळ्यांनी एकाच गलका केला. सगळ्यांना एकदमच दीपाताईला प्रणिताविषयी सांगायचे होते. शेवटी ताईनेच त्यांना थांबवले आणि  त्यांच्यापैकी एकालाच बोलायला सांगितले. तसे सायुने  तिला बुकमार्क बनवून विकायची कल्पना आणी  प्रणिताला शिकवण्याविषयी सांगितले.  आणि प्रणीताची फी बुकमार्क विकून झाले की  घ्यायची विनंती केली.  खरंतर मुलांची इतकी कळकळ पाहून  फी न देता सुद्धा तिने प्रणिताला शिकवलच असतं. पण  मुलांची बुकमार्क विकण्याची कल्पना ऐकून तिने  मुलांना त्यांच्या कामात प्रोत्साहन द्यायचे ठरवले. 
"वा! तुमची कल्पना मला फार आवडली. आणि सगळ्यात जास्त काय आवडलं तर ते हे की मोठ्यांकडून कसलीच मदत न घेता तुम्ही स्वत:च हा व्यवसाय  करायचे ठरवलेत. शिवाय त्यावर  लगेच कामही चालू केलेत. खरं सांगायच तर तुम्ही नुसतं मला बोलला असता तरी मी स्वत:हूनच  प्रणिताची फी घेतली नसती.  " 
हे ऐकून मुलं  हिरमुसली. तशी दीपाताई म्हणाली , "पण मला वाटतं तुमच्यासारख्या हुषार आणि जबाबदार मुलांना त्याची गरज नाही.  तुम्ही तुमच्या बळावरच सगळे करू शकता याची मला खात्री आहे.म्हणूनच तुम्ही एक काम करा. त्या हजार रुपया मधले फक्त शंभर रुपये मला फी म्हणुन द्या. आणि उरलेले पैसे या प्रणिताच्या आईकडे तिच्या शाळेसाठी म्हणून द्या. चालेल? " 
आता मात्र मुलांचे चेहरे खुलले. स्केट्स बांधुन सायु, नीरु, निहा, चिनू, आदी आणि प्रणिता सगळ्यांनीच पडत धडपड  स्केटींग करायला सुरुवात केली. आपल्यालाही स्केटींग शिकायला मिळतय हे पाहून प्रणिता हरखून गेली. 
उरलेल्या दोन दिवसात गँग ऑफ फाईवने बाकीचे बुकमार्कही बनवले  आणि  आठ दिवसातच  सगळे बुकमार्क  विकून मिळालेल्या पैशात दीपाताईची फी दिली. उरलेले पैसे प्रणिताच्या आईकडे दिले तेव्हा प्रणिता आणि तिची आई दोघींचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.    
 मैत्रिणीला मनापासून मदत करणाऱ्या आपल्या उद्योगी पण कर्तृत्ववान  मुलांकडे पाहून सगळ्यांच्याच आई बाबा, आजी आजोबाना अभिमान वाटत होता.  आणि मुलं मात्र सगळं विसरून आनंदात  स्केटींग रिंक मध्ये गोल गोल फेऱ्या मारत  होती.



Posted by Swapnali Mathkar at 8:40 AM 0 comments
Labels: सायुच्या गोष्टी
Older Posts

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

Labels

  • २०१० दिवाळी अंक (1)
  • ganapati (1)
  • Origami (2)
  • Origami ganesh (1)
  • poem (1)
  • potato (1)
  • world (1)
  • उराशिमा तारो (1)
  • ऐका (4)
  • ऑडियो (4)
  • ऑडियो कथा (4)
  • ऑडियो बुक (1)
  • ऑलिम्पिक (1)
  • ओरिगामी (2)
  • ओरिगामी गणेश (1)
  • कथा (2)
  • कथाकथन (4)
  • कथाकथी (4)
  • कागदाचा गणपती (1)
  • कागदी (1)
  • कुनीदेशातल्या कथा (2)
  • गणपती (1)
  • छान गोष्टी (12)
  • जपानी (1)
  • ढग (1)
  • थेंबाचा प्रवास (1)
  • निसर्गकथा (2)
  • पंचफलम् समर्पयामी (1)
  • पाऊस (2)
  • पाणी (1)
  • प्राणीकथा (1)
  • फळे (1)
  • फुलपाखरी आकाशकंदील (1)
  • फुलांच्या गोष्टी (2)
  • बटाटे (1)
  • बडबड कविता (4)
  • बालकथा (1)
  • भाषांतर (3)
  • मज्जाखेळ (1)
  • मराठी दिवस (1)
  • विज्ञान गोष्टी (4)
  • साकुरा (1)
  • सायुच्या गोष्टी (3)
  • हस्तकला (1)
  • हातमोजे (1)

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2020 (5)
    • ▼  April (3)
      • कथाकथी - प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वा...
      • सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग
      • कथाकथी - चिमण्या आणि डोंगर (Marathi Audio Book)
    • ►  March (2)
  • ►  2014 (2)
    • ►  July (1)
    • ►  February (1)
  • ►  2013 (3)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
  • ►  2012 (4)
    • ►  September (1)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
  • ►  2011 (2)
    • ►  June (2)
  • ►  2010 (19)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  September (4)
    • ►  August (1)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (1)
  • ►  2009 (1)
    • ►  February (1)

Followers

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments

Search This Blog

 
Copyright 2009 गंमत गोष्टी. Powered by Blogger.
Blogger Templates created by Deluxe Templates
WP Themes by Wpthemesfree