skip to main | skip to sidebar

गंमत गोष्टी

कुनिदेशात गोष्टी वाचण्याआधी लहान मुलं एक छान गाणं म्हणतात. याचा अर्थ आहे सगळे मिळून शांततेने मजेदार गोष्ट ऐकुयात. चला तर मग आपण पण गाणं म्हणून वाचायला सुरुवात करू.
कामीशिबाई कामीशिबाई
पाची पाची पाची पाची उरेशिई कामीशिबाई
श् श् श् श् ....शिझुकानी किकीमाश्यो.

Monday, May 14, 2012

ऑलिम्पिक - भारतासाठी ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव


ऑलिम्पिक -  भारतासाठी  ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव   


घरातले शेंडेफळ असणाऱ्या  खाशाबाला   लहानपणापासून खेळण्याची फार आवड होती.  पोहोणे, कुस्ती, कबड्डी, धावणे या सगळ्याच गोष्टी त्याला आवडत आणि त्यात तो पटाईतही होता.  कुस्तीचे सुरुवातीचे  धडे तर त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. थोड्याच काळात तो आसपासच्या परिसरात कुस्तीगिरीसाठी ओळखला जाऊ लागला.  आंतर कॉलेज स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवू लागला.  इतकेच नव्हे तर  देशभरातही त्याचे नाव व्हायला लागले. नंतर बळवडे आणि बेलापुरे गुरुजी यांनीही त्याला प्रशिक्षण दिले.  

खाशाबाची  १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी  देशातून निवड झाली.  या जाण्यायेण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करून पैसा गोळा करावा लागला होता.  mat वर खेळ करणे भारतात नवीनच होते त्याची तयारीही करावी लागली होती.   त्यावेळी तो फ्लायवेट विभागात खेळला होता आणि सहावे स्थान मिळवले होते. भारतासाठी हि फारच मोठी कामगिरी होती. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी हेलसिंकी ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत स्थान मिळवून पात्रताही मिळवली.  

आता हेलसिंकीच्या ऑलिम्पिक मध्ये प्रवेश तर मिळाला पण जायचा यायचा खर्च करण्याचा प्रश्न होताच. सरकारकडून  याही वेळी कुठलीच मदत मिळाली नव्हती.  त्यावेळी  कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल प्रा. खर्डेकर / शहाजी law कोलेजच्या प्रा. दाभोळकर # यांनी आपले घर गहाण ठेवून पैसे  गोळा केले. ते जाण्यायेण्याच्या खर्चासाठी वापरता आले. खाशाबाच्या कराडमधल्या  गावातल्या   दुकानदारांनी धान्य आणि इतर वस्तू पुरवल्या  आणि खाशाबाला हेलसिंकीला धाडले.    त्यावेळी तिथे पोहोचल्यावर रहाण्यासाठी, खाण्यासाठी खाशाबाला काय करावे लागले असेल आणि कसे केले असेल ते त्यालाच ठाऊक. प्रत्यक्ष स्पर्धेत कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, जपान * अशा  देशातल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून ताम्रपदक मिळवले. 

त्याकाळी   फोन सारखी संपर्क साधनेच नव्हती.  टीव्हीही नव्हता त्यामुळे श्री. खाशाबा दादासाहेब जाधव यांचे  परतल्यावर लहानसे स्वागत झाले मात्र कराड आणि त्यांच्या गावी खूप उत्साहाने स्वागत केले गेले. १०१ बैलगाड्यांची मिरवणुकाही काढण्यात आली. 
पुढे  त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्ष नोकरी केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना पेन्शन साठी सुद्धा प्रयत्न करावे लागले. 

के डी  जाधव यांनी ताम्रपदक मिळवल्यावर पुढचे वैयक्तिक पदक मिळवायला भारताला ५० वर्षे लागली ! 

त्यांच्या स्मरणार्थ  दिल्ली इथल्या कुस्ती स्टेडीयमला के डी  जाधव स्टेडीयम असे नाव देण्यात आले आहे. 
---------

आज विचार केला तर वाटत त्यावेळी कसे काय ते  स्वत:च्या हिम्मतीवर ऑलिम्पिक मध्ये गेले असतील आणि कसे काय पदक मिळवले असेल. दुर्दैवाने sponsor मिळवणे, प्रशिक्षक मिळवणे, प्रशिक्षणासाठी पैसा उभा करणे या गोष्टीमध्ये अजूनही फारसे बदल झाले नाहीत असे वाटते. खेळाडूला खेळण्यापेक्षा या गोष्टींची चिंताच करावी लागली तर त्याचा खेळावर परिणाम दिसणारच. शेवटी सगळेच काही खाशाबा जाधव यांच्यासारखे नसतात.      

--------- 
# दोन लिंक वर दोन वेगळी नाव आहेत. नक्की कोणी याचे संदर्भ मिळाले नाहीत 
* देशांची नावेही दोन लिंक वर वेगवेगळी आहेत. 
संदर्भ
http://en.wikipedia.org/wiki/Khashaba_Dadasaheb_Jadhav  
https://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=777
Posted by Swapnali Mathkar at 1:09 PM 0 comments
Labels: ऑलिम्पिक

Tuesday, April 10, 2012

उराशिमा तारो

मायबोलीवरच्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमा अंतर्गत केलेले  भाषांतर   



ही कथा वाचल्यावर मला नेहेमी रवैतक राजाची कथा आठवते. त्यामुळे ही जपानी कथा भाषांतरीत करावे असे वाटले.शिवाय मुलांसाठी असल्याने माझ्यासाठी भाषांतरीत करायला सोपी होती.
------
उराशिमा तारो
浦島太郎
Kusuyama, Masao 1884-11-04 /1950-11-26
http://www.aozora.gr.jp/cards/000329/files/3390_33153.html
लेखक: कुसुयामा मासाओ
भाषांतर : स्वप्नाली मठकर (सावली)
१.
फार फार वर्षापूर्वी समुद्राच्या काठी उराशिमा तारो नावाचा एक कोळी रहात होता. तो रोज सकाळी समुद्रावर जाऊन मासे पकडून आणून आपले आणि आई वडलांचे पोट भरायचा.
एकदा असाच समुद्रावरून मासे पकडून परत येताना त्याला पाच सहा मुलं घोळका करून उभी असलेली दिसली. "काय झालं असेल बरं?" असा विचार करून उराशिमा बघायला गेल्यावर त्याला मुलांनी एका कासवाला पकडलेलं दिसलं. मुलं त्या कासवाला काठीने ढोसत , दगडाने मारत होती. ते पाहून उराशिमाला फार वाईट वाटलं.
"अरे त्या कासवाला असा त्रास देऊ नका. तुम्ही सगळी चांगली मुलं ना!"
"तुम्ही उगाच काळजी करू नका. काही झालं नाहीय्ये. आम्ही खेळतोय." असं उद्धट उत्तर देऊन मुलं कासवाला छळतच राहिली.
उराशिमाला त्या कासवाची फारच दया आली म्हणून तो मुलांना म्हणाला "बरं, मग मी ते कासव विकत घेतो. मग तर झालं?"
हे ऐकताच एका सुरात "हो चालेल" असं म्हणून मुलं पैसे घेऊन आरडाओरडा करत निघून गेली.
इकडे "हं हं आता घाबरू नकोस बरं का." म्हणत पाठी खालून नुकतंच डोकं बाहेर काढलेल्या कासवाला थोपटत उराशिमा समुद्राजवळ घेऊन आला आणि कासवाला हळूच पाण्यात सोडलं. आनंदाने पाय हलवत पोहत कासव पाण्यात निघून गेलं.
असेच दोन तीन दिवस गेले. नेहेमीप्रमाणे उराशिमा सकाळी बोट घेऊन पुन्हा समुद्रात गेला. आज तो बोट वल्हवत वल्हवत समुद्राच्या बराच आत पर्यंत गेला. अचानक मासे पकडत असताना त्याला "उराशिमा , उराशिमा" अशी हाक ऐकू आली.
आपले वडील आहेत का काय असे वाटून उराशिमाने वळून इकडे तिकडे बघितले. पण त्याला कोणीच दिसले नाही. त्याच वेळी एक कासव मात्र बोटीच्या अगदी जवळ आलेलं त्याला दिसलं. आणि आश्चर्य म्हणजे ते कासव माणसाच्या आवाजात उराशिमाशी बोलायला लागलं.
"मला तू परवा त्या मुलांच्या तावडीतून सोडवलंस म्हणून तुझे खुप खुप आभार. आज त्याची परतफेड करायला मी आलोय."
उराशिमाला अजूनच आश्चर्य वाटलं. "असू दे रे. आणि खरच परतफेडीची काहीच गरज नाहीये."
"नाही नाही खरच तुझे खुप खुप उपकार आहेत माझ्यावर. बरं तू समुद्रामधला राजमहाल पाहीला आहेस का?" कासवाने मनापासून विचारलं.
"नाही. कधीच पाहिला नाहीये मी. पण हो लहानपणापासून त्याच्या गोष्टी मात्र खुप ऐकल्यात."
"मग मी तुला त्या राजमहालात घेऊन जाऊ शकतो. आवडेल का तुला तिथे यायला?"
"वा! काय मस्त कल्पना आहे. पण मी तिथे कसा काय येणार? तो तर समुद्रात खुप आतमध्ये आहे ना? आणि मला काही तिथपर्यंत पोहोता येणार नाही बाबा." उराशिमा म्हणाला.
"तू अज्जिबात काळजी करू नकोस. माझ्या पाठीवर बसवून मी तुला घेऊन जाईन." आपली पाठ दाखवत कासवाने सांगितलं.
धाकधूक करतच उराशिमा कासवाच्या पाठीवर बसला आणि कासव पांढऱ्याशुभ्र लाटांवर स्वार होऊन निघाले सुद्धा. थोड्याच वेळात लाटांचा सळसळ आवाज कमी होऊन समुद्राच्या तळाकडचं स्वप्नातल्या सारखं निळशार पाणी दिसायला लागलं. तेवढ्यातच सगळीकडे प्रकाश दिसायला लागला आणि पांढऱ्याशुभ्र वाळूचा एक रस्ताच समोर दिसायला लागला. रस्त्याच्या एका टोकाला एक मोठा सुंदरसा दरवाजा होता. त्याच्याही पलीकडे सोन्याचांदी सारखे चमचम करणारे उंच मनोरे होते.
"पोचलो बरं का आपण महालाजवळ. आता जरा वेळ थांब इथेच." कासवाने उराशिमाला पाठीवरून उतरवून दरवाजाने आत जात सांगितले.
२.
आत वर्दी देऊन कासव पुन्हा बाहेर आले आणि उराशिमाला घेऊन जायला लागले. वेगवेगळे सुंदरसे मासे बघत बघत आत जातानाच एक सुंदर तरुण राजकुमारी आपल्या दासींबरोबर येताना त्याला दिसली. तिच्याबरोबर महालात जाताना रत्नखचित छत , आणि पोवळे आणि रत्नांचे बनलेले खांब बघून उराशिमा अगदी दिपून गेला. तो महालाचा परिसर सुंदर सुवासाने आणि संगीताने भारून गेला होता. चालता चालता ते एका रत्नखचित चकाकणाऱ्या भिंती असणाऱ्या मोठ्या कक्षात आले.
"उराशिमा , त्यादिवशी कासवाला वाचवल्याबद्दल तुझे खुपखूप आभार. आमच्या या महालात तुला हवं तितका दिवस राहून आमचा पाहूणचार स्वीकार कर." असं म्हणत राजकन्येने त्याला आदराने प्रणाम केला. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे माश्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि वारुणी त्याला सादर करण्यात आली. दासी नृत्य आणि गायन करून त्याचं मन रिझवू लागल्या. उराशिमाला अजूनही हे सगळं स्वप्नवतच वाटत होते.
खाऊन पिऊन झाल्यावर राजकन्या उराशिमाला आपला महाल दाखवायला घेऊन गेली. कुठल्याही कक्षात बघाव तर सगळी कडे, रंगीत सुंदर रत्ने आणि पोवळी जडवलेली. सगळा महाल नुसता चकाकत होता. "आता आपण चार ऋतू बघायला जाऊयात" असं म्हणत राजकन्येने उराशिमाला एका मोठ्या दरवाजाकडे नेले.
"हा पूर्व दरवाजा. वसंत ऋतूचा!" असं म्हणत दरवाजा उघडला तर काय आश्चर्य सगळा देखावा एकदम बदलला. समोर गुलाबी बहराने फुलून गेलेली चेरीची झाडं चित्राप्रमाणे उभी होती. कोवळ्या पालवी फुटलेल्या फांद्या वाऱ्यावर हेलकावे घेत होत्या आणि चिमुकले पक्षी त्यावर गाणे गात झोके घेत होते. फुलपाखरे फुलाफुलांवरून उडत मध पीत होती.
तितक्यात "हा दक्षिणेचा दरवाजा, ग्रीष्माचा!" असं म्हणत राजकन्येने दुसरा दरवाजा उघडला आणि डोळ्यासमोर ऋतू बदलून सगळीकडे हिरवेगार झाले. पांढरी फुलं, तळ्यातली कमळे आणि त्यावर उडणारे चतुर असे उन्हाळ्याचे दृश्य समोर उभे राहिले.
हे बघून संपते न् संपतेच "आता हेमंताचा दरवाजा!" असं म्हणत राजकन्येने पश्चिमेचा दरवाजा उघडला. पुन्हा एकदा ऋतू बदलून सगळी झाडे सोनेरी पिवळ्या रंगाने न्हाली.
हा सोन पिवळा नजारा बघता बघताच राजकन्येने "हा शेवटचा, शिशिराचा दरवाजा!" म्हणत उत्तरेचा दरवाजा उघडला. आणि थंडीची एक लहरच आली. सगळे दृष्य आता पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकले गेले होते. डोंगर दऱ्या सगळेच बर्फाच्छादित दिसतं होते.
ही अभूतपूर्व कमाल उराशिमा शब्दहीन होऊन केवळ बघतच राहीला.
३.
रोज अशा अनेक नवनवीन गोष्टी अनुभवत तीन वर्षे कशी गेली ते उराशिमाला कळलं सुद्धा नाही. तिसऱ्यावर्षी वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी अचानक एखादं स्वप्न बघितल्यासारखे उराशिमाला आपले पूर्वायुष्य आठवायला लागले. ते समुद्राकाठचे घर, बोट, मासेमारी, आपले आईबाबा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर दिसायला लागल्या. आपले आईबाबा काय करत असतील, इतके दिवस कसे राहिले असतील या काळजीने तो व्याकुळ झाला. लवकरात लवकर घरी परतावं असं त्याला वाटायला लागलं.
त्याच्यामधला हा बदल राजकन्येने अचूक टिपत विचारलं. "तुला कसली काळजी लागलीये उराशिमा? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?"
"नाही तसं काही विशेष नाही. पण आता मला घरी परत जावसं वाटायला लागलं आहे." उराशिमाने आपल्या मनातले बोलून दाखवले.
हे ऐकून राजकन्येला खूप वाईट वाटले तरीहि उराशिमाला बरे वाटावे म्हणून तिने त्याला एकदा घरी जाऊन यायला सांगितले.
दु:खी होत राजकन्येने जातानाची भेट म्हणून एक रत्ने जडवलेला डबा त्याच्या हातात ठेवला.
"या डब्यात माणसांसाठी अतिशय महत्वाचा खजाना ठेवला आहे. तू तुझ्या घरी असताना हा डबा तुझ्याजवळ ठेव. पण एक लक्षात असुदेत, तूला परत यायचं असेल तर हा डबा कधीही, कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडू नकोस."
"हो, हो, मी नक्की लक्षात ठेवेन." असं म्हणत उराशिमाने राजकन्येचा निरोप घेतला.
पूर्वी आलेलं कासव पुन्हा त्याची वाट बघत होतंच. कासवाच्या पाठीवर चढून एका अनामिक ओढीने उराशिमा परतीच्या वाटेवर निघाला.
४
उराशिमाला कासवाने समुद्राच्या काठावर पोहोचवलं आणि ते पुन्हा पाण्यात निघून गेलं. उराशिमा एकटाच किनाऱ्यावर उभे राहून इकडे तिकडे बघत होता. ओळखीचे असे काही दिसतं नव्हते. दूरवरून कुठूनतरी कोळ्यांच्या गाण्याचे सूर कानावर पडत होते. तरीही स्वप्नात बघितलेल्यापेक्षा हे दृष्य फार काही वेगळे नव्हते. पण आजूबाजूला जाणारे कुणीच ओळखीचे वाटत नव्हते. उराशिमा तसाच कोणाशीही न बोलता घराच्या दिशेने चालत राहिला.
तीन वर्षात सगळं किती बदललं आहे हे वाटून उराशिमाला विचित्र आणि उदास वाटायला लागलं. तो घराच्या जागी पोहोचून बघतो तर काय त्याला तिथे घर दिसलेच नाही. घर बांधल्याच्या खुणाही कुठे दिसेनात. आपले आईबाबा कुठे गेले असतील या काळजीने तो अगदी ग्रासून गेला.
तितक्यात त्याला एक खूप म्हातारी आज्जी कमरेतून वाकून चालत येताना दिसली.
"आज्जी इथे उराशिमा तारोचे घर होते ते कुठे गेले?" मोठ्या आशेने त्याने त्या म्हातारीला विचारले.
"उराशिमा तारो? छे! असा कोणी माणूस मलातरी माहीत नाही बा."
"नाही नाही. नक्कीच इथे रहात होता तो. बघाना आठवून." उराशिमाने पुन्हा विनंती केली.
"हां हां. आठवतं खरं मला थोडसं या नावाबद्दल. पण ती किनई तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या लहानपणी मी हि गोष्ट ऐकलेली. एक उराशिमा तारो नावाचा कोळी समुद्रात बोट घेऊन गेला तो परत आलाच नाही कधी. लोकं म्हणायचे कि तो समुद्रमहालात गेलाय. पण खरं काय ते कोणालाच माहीत नाही." एवढ सांगून कमरेत वाकून चालत म्हातारी निघून गेली.
'तीनशे वर्षापूर्वी!! बापरे! मी जाऊन तर फक्त तीन वर्षे झालीत. असं तर नाही कि समुद्रातली ३ वर्ष म्हणजे इथली ३०० वर्ष!' उराशिमा विचार करत राहीला. अचानक खूप उदास वाटायला लागून तो समुद्रकिनारी परत आला. आणि समुद्राकडे बघत बसला. आता परत समुद्रामहालात राजकन्येकडे जावं असं त्याला वाटायला लागलं. पण आता पुन्हा जायचं तरी कसं या विचाराने तो परत दु:खी झाला.
तितक्यात त्याला राजकन्येने दिलेला तो रत्नजडीत डबा आठवला. तो डबा उघडला तर कदाचित आपल्याला परत जाता येईल या विचाराने तो राजकन्येने सांगितलेली गोष्ट विसरून गेला. घाई घाईत त्याने तो डबा बाहेर काढला आणि उघडून बघितला. उघडताच त्या डब्यातून जांभळ्या रंगाचा धूर बाहेर आला. आणि बघतो तर काय तो डबा रिकामाच होता. इतक्यात त्याला जाणीव झाली कि काहीतरी बदलतंय. त्याचे हात पाय सगळे सुरकुत्यांनी भरून गेले. पाण्यात आपले प्रतिबिंब पहातो तर काय केस , दाढी सगळे अगदी पांढरे शुभ्र झाले होते. चेहेऱ्यावर सुरुकुत्यांचे जाळे पसरून तो जख्ख म्हातारा झाला होता. क्षणभर त्याला काही कळेचना. पण नंतर त्याच्या लक्षात आले. राजकन्येने माणसासाठी सगळ्यात महत्वाचा खजिना यात आहे असे सांगितले होते. माणसाचं जीवन आणि तारुण्य हे माणसाला सगळ्यात प्रिय आहे. हा डबा उघडल्यावर म्हणूनच मी तीनशे वर्षाचा म्हातारा झालो.
आणि उराशिमा आपल्या गतायुष्याच्या आठवणी काढत समुद्राकडे बघत राहीला.
Posted by Swapnali Mathkar at 10:18 AM 1 comments
Labels: उराशिमा तारो, भाषांतर

झाडाचा बहरोत्सव


मायबोलीवरच्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमा अंतर्गत केलेले  भाषांतर   
गोष्ट: झाडाचा बहरोत्सव.
मूळ कथा : http://www.aozora.gr.jp/cards/000121/files/4724_13215.html
लेखिका: नीईमी नान्कीची (१९१३-०७-३० १९४३-०३-२२)
गोनगीत्सुने या नीईमी नान्कीची च्या परीकथा पुस्तकात प्रथम प्रकाशित
भाषांतर: स्वप्नाली मठकर (सावली)
木の祭り
新美南吉 (Niimi, Nankichi ) 1913-07-30 - 1943-03-22
मूळ कथा : http://www.aozora.gr.jp/cards/000121/files/4724_13215.html
------------
एका दाट जंगलात असलेल्या गवताच्या हिरव्यागार कुरणात मधोमध उभे असलेले एक साधेसे झाड होते. एरवी इतर झाडांसारखेच. पण आता बहराच्यादिवसात मात्र या झाडाला सुंदरशी पांढरीशुभ्र फुलं आली होती. झाडाची फांदी आणि फांदी फुलांनी नुसती डवरून गेली होती. स्वत:चे हे सुंदर रुपडे पाहून झाड तर हरखूनच गेले होते. या हिरव्या जंगलात हे एकमेव पांढरयाशुभ्र रंगाच्या फुलांचे झाड अगदी उठून दिसत होते. पण आता झाडाला एकटेपणाची जाणीव व्हायला लागली. आपले हे सुंदर रूप, आपला हा बहर कुणी बघितलाच नाही तर काय उपयोग? कुणीतरी यावं आणि आपल्या सौंदर्याचे गोडवे गावेत असं त्याला सारखं वाटायला लागलं. पण इतक्या आतमध्ये जंगलात येणार तरी कोण?
तेवढ्यात कुठूनशी वाऱ्याची एक झुळूक आली. त्या वाऱ्याच्या झुळूकीवर स्वार होऊन त्या फुलांचा स्वर्गीय गंधही भटकायला निघाला. वाऱ्याबरोबर वहात वहात तो गंधही छोटीशी नदी ओलांडून, गव्हाची शेते पार करून छोट्या टेकड्यांवरून घसरगुंडी करत दूरच्या बटाट्याच्या शेतांपर्यंत येऊन पोचला. बटाट्याच्या शेतात पुष्कळशी फुलपाखरे खेळत होती. त्यातल्या एका चिमण्या फुलपाखराच्या नाकात तो सुवास शिरला.
"कसला बरं इतका छान सुवास येतोय हा?" नाकाने हुंगत हुंगत छोट्या फुलपाखराने विचारलं.
"अप्रतिम गंध आहे ना! कुठेतरी नक्कीच सुंदरशी फुलं उमलली असणार." दुसऱ्या पानावर बसलेल्या फुलपाखरु अगदी हरखून म्हणालं. "ही नक्कीच त्या जंगलाच्या आतल्या कुरणामधल्या झाडाची फुलं असणार. इतका दिव्य सुवास त्याचाच आहे फक्त."
हळूहळू त्या शेतातल्या सगळ्याच फुलपाखरांना त्या सुवासाने मोहित केलं. हा सुवास सोडून इतर कुठेच जाऊ नये असं त्यांना वाटायला लागलं. शेवटी सगळ्या फुलपाखरांनी एकत्र विचार करून त्या झाडाजवळ जायचं असं ठरवलं. आणि अशा सुंदर वासाची फुलं देणाऱ्या त्या झाडासाठी बहरोत्सव साजरा करूयात या विचारावरही फुलपाखरांचं एकमत झालं.
मग पंखांवर सुंदरशी नक्षी असणारया मोठ्ठ्या फुलपाखराच्या मागे मागे रांगेत पांढऱ्या पिवळ्या ठिपक्यांचे, पानासारखी नक्षी असाणारे, छोट्याशा शिंपल्या सारखे पंख असणारे अशी वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची फुलपाखरे त्या गंधाचा मागोवा घेत निघाली. फुलपाखरांचा हा थवा उडत उडत बटाट्याच्या शेतावरून निघून, टेकडी वरून, गव्हाची शेते पार करत अगदी नदी ओलांडून जायला लागला. त्या सगळ्या मधले शिंपलीच्या आकारासारखे एक छोटेसे फुलपाखरू मात्र पंख छोटे असल्याने जरा दमले आणि नदीच्या काठी विसाव्यासाठी क्षणभर थांबले. एका पानावर बसले असतानाच जवळच्या एका पानावर त्याला झोपाळलेला एक नवीनच किडा दिसला. असा किडा शिंपली सारख्या फुलपाखराने कधी बघितलाच नव्हता. त्यामुळे फुलपाखराने उत्सुकतेने विचारलं.
"तू कोण आहेस रे? मी कधी तुला पाहिलंच नाहीये!"
"मी आहे काजवा!" डोळे उघडत काजव्याने उत्तर दिलं.
"जंगलातल्या कुरणामध्ये एका फुलांच्या झाडाजवळ आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. तू पण नक्की ये हं. मज्जा येईल." शिंपलीसारख्या फुलपाखराने काजव्याला अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले.
"खूप धन्यवाद हं. पण मी ना रात्री जागणारा किटक आहे. त्यामुळे कोणी मला खेळायला घेतलं नाही तर?" काजव्याने आपली काळजी बोलून दाखवली.
"असं काही नाही बरं. तू नक्की ये. आम्ही सगळे तुझ्याशी नक्की खेळू." असं म्हणत अनेक छान छान गोष्टी सांगत फुलपाखराने काजव्याला सुद्धा बरोबर आणलं.
आणि पोहोचल्यावर बघतात तर तिथे काय मस्त उत्सव चालू होता. सगळी फुलपाखरे झाडाभोवती फेर धरून नाचत गात होती. दमल्यावर झाडाच्याच पांढऱ्या फुलांवरबसून विश्राम करत होती. आणि भूक लागल्यावर त्या सुंदर फुलांमधला मध पोटभरून पीत होती.
मात्र हळुहळू सूर्य मावळतीला चालला होता आणि प्रकाश कमी कमी व्हायला लागला होता. आता रात्र झाल्यावर काही दिसणार नाही आणि खेळणं थांबवावं लागेल म्हणून फुलपाखरांना फारच वाईट वाटायला लागले.
"छे! उगीच रात्र होतेय. आता काळोखात काही सुद्धा दिसणार नाही. मग कसं काय खेळणार?" असं म्हणत फुलपाखरे दु:खी मनाने उसासे टाकायला लागली.
हे ऐकून काजवा पटकन उडत उडत नदीकाठी गेला. तिथे त्याचे इतर बरेच काजवे मित्र मैत्रिणी होते त्या सगळ्यांना घेऊन परत झाडाकडे आला. आल्यावर एक एक काजवा एका एका फुलावर जाऊन बसला. आणि काय आश्चर्य! अनेक छोटे छोटे इवलाले कंदील झाडावरच्या फुलांवर टांगले आहेत असे दिसायला लागले. त्या प्रकाशाने झाड नुसते भरून गेले. आणि या प्रकाशाच्या सुगंधी झाडाचा बहरोत्सव आता प्रकाशोत्सव बनून फुलपाखरांनी रात्री खूप उशिरा पर्यंत नाचत साजरा केला.
Posted by Swapnali Mathkar at 10:17 AM 0 comments
Labels: भाषांतर

Sunday, June 26, 2011

मज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप

साहित्यः
कोंब आलेला बटाटा, प्लास्टिकचा एक पारदर्शक मध्यम आकाराचा डबा ( शक्यतो कमी रुंदीचा असलेला बरा, शिवाय  माती दगड भरल्यावरही सहज उचलता आला पाहिजे), एक पाण्याची पेट बाटली. माती , दगड   



कृती:
१. मोठी सुई किंवा काहीतरी टोकदार गरम करून  प्लास्टिकच्या डब्याला तळाला पाच सहा भोके पाडा. भोके एकदम बारीक नको पण खूप मोठ्ठीहि नकोत.

२. डब्यात तळाला दगड घाला.

३. त्यावर माती घाला.

४. कोंब आलेला बटाटा  एका तुकड्यावर एक/दोन  कोंब येईल   असा कापून त्याचे  तीन चार तुकडे करून ठेवा.

५. आता हे तुकडे त्या माती वर ठेवून वरून पुन्हा थोडी माती टाका. बटाट्याच्या कोम्बाबर  थोडी वर येईल अशा प्रकारे टाका. तुकडे मातीवर ठेवताना डब्याच्या अगदी कडेला लावा. म्हणजे पारदर्शक डब्यातून मूळ आणि बटाटे दिसतील.

६. आता त्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणाला गरम सुईने तीन चार भोके पाडा. हि पाण्याची झारी तयार होईल.

मुलाला  रोज ठराविक वेळी पाणी झाडाला पाणी घालायला सांगायचे. त्याच वेळी झाडाचे निरीक्षण पण करायचे. जर मुलाला लिहिता येत असेल तर एका  वहीत तक्ता करून त्यात माहिती भरायला सांगायची. शक्य असेल तर  आकृत्याहि काढायला सांगायच्या.
दोन चार दिवसातच कोंब वर येतात. आणि मुळे  डब्याच्या कडेला दिसायला लागतात. त्या मुळांची  लांबी छोट्या पट्टीने मोजून रोज किती वाढतात ते बघता येते. काही दिवसात खूप वाढतात त्या नंतर मात्र मोजता येणार नाहीत.  बटाटे डब्याच्या कडेच्या मुळांना लागले तर ते कसे वाढतात तेही बघता येतील.  पण आमचे कडेला लागले नाहीत.
या मध्ये फार मोठे बटाटे येणार नाहीत कारण डबा छोटा आहे. पण प्रयोग म्हणून मजा येते.

मी घरी प्रयोग केला तेव्हा मीच तक्ता लिहिला कारण अजून लेकीला लिहिता येत नाही.   शिवाय मध्ये एक महिना आम्ही घरी नव्हतो तेव्हाच फुलं येऊन गेली. पाणी न घालताही बाहेरच्या मध्ये मध्ये पडणार्या पावसात झाडाने तग धरला होता.

१. नुकतेच लावलेले बटाटे १२-feb


२. दुसऱ्याच दिवशी कोंब थोडे वर आले.  १३-फेब

३.  सगळे कोंब वर आले १७-फेब

४. डब्यातून कडेला मूळ दिसायला लागले १७-फेब (फोटोवर चुकीची तारीख झालीये, मग बदलेन)
याच दिवसापासून मुळांची लांबी मोजून लिहायला सुरुवात केली. दिवसातून  साधारण   सहा तासांनी /  किंवा ठराविक तासांनी  मुळे मोजायची. सहा तासात सुद्धा दोन मिमी वगैरे वाढतात ते पाहून मज्जा वाटते.



 ५. मुळे दोन दिवसात इतकी मोठी झाली. एक दोन मुळे असल्याने  त्यांना मार्किंग आणि वेळ  लिहिली  आहे.  वरची रोपेही वाढली

 ६. देठाला बारीक केस आलेत. ते कसे हाताला  लागतात   ते बघायचे.

७. लावल्यापासून १२ दिवसात रोपे इतकी छान वाढली

८. मात्र आता मुळे मोजता येणार नाहीत इतकी वाढलीत

९. मध्ये एक महिना भारतात असल्याने फुलांचे वगरे फोटो नाहीत.  पण साधारण  मे महिन्याच्या सुरुवातीला   एक चिमुकला बटाटा वर दिसायला लागला होता.   त्याचाही फोटो नाही.


१०. बटाटे  वाढत नाहीत आणि वरचे रोप पिवळे व्हायला लागले म्हणून आणि हळुवारपणे रोप वर उचलले. सहज येणार नाही मुळे खूप वाढली असतील.    खुरपणी वगैरे काहीतरी घेऊन  हळूच वर उचलावे. म्हणजे मुळाना लागलेले बटाटे दिसतील . आमचे अगदी छोटे छोटे बटाटे तयार झाले होते.

११. ते तोडून घ्यावे. मुलांना तोडायला मज्जा येते.


१२. हे आमच्या रोपाला आलेले  चिमुकले  स्वच्छं धुतलेले बटाटे.    

Posted by Swapnali Mathkar at 5:11 PM 1 comments
Labels: potato, बटाटे, मज्जाखेळ

Saturday, June 18, 2011

भेट

हानाको आणि अकिको या दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी. रांगत्या असल्यापासून एकत्र खेळायच्या. एकमेकींच्या अंगणात मस्ती करायच्या. एकत्र खाऊ खायच्या, नाचायच्या. आणि पुढे एकत्र शाळेत जाऊन अभ्यासही एकत्र करायच्या. शाळेत तर त्यांना बहिणी बहिणीच समजत इतक्या त्या बरोबर असायच्या.

एकदा काय झालं. हानाकोच्या आईबाबांना कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार होतं. पुन्हा याच गावी परतून कधी येणार, किंवा येणार कि नाही हे ही माहीत नव्हतं. हे ऐकल्यावर हानाकोला आणि अकीकोला खूपच वाईट वाटलं. आता आपण पुन्हा कधी भेटू अशा विचारांनी दोघींना रडू यायला लागलं. तेव्हा काही फोन, इमेल अशा गोष्टी नव्हत्या त्यामुळे दूर गेल्यावर मैत्रिणीशी बोलता येणे शक्यच नव्हते. फार फार तर पत्र पाठवता आले असते. ते या दोघी करणारच होत्या. तरीही जायचा विचार करून दोघी अगदी दुःखी होत्या. त्यातल्या त्यात आईबाबांजवळ हट्ट करून हानाकोने अकीकोचा वाढदिवस साजरा करून मग जायचं असे ठरवून घेतले.

आता अकीकोच्या वाढदिवसाला काय बरं भेट द्यावी असा हानाको विचार करत होती. अशी भेट हवी होती कि जी अकिको कधीच विसरणार नाही आणि जी अकीकोला त्यांच्या मैत्रीची सतत आठवण करत राहील.
पुस्तक दिलं तरी ते फाटून जाईल. जुनं झाल्यावर किंवा अकिको मोठी झाल्यावर काही ते वाचणार नाही.
मग एखादं खेळण? नाहीच. तेही मोठं झाल्यावर थोडच खेळता येईल?
एखादं माऊच पिल्लू देऊयात का? हम्म पण पिल्लू पळून गेलं तर? शिवाय ते घरातलं दुध पिईल तेव्हा अकिको त्याला रागावेल सुद्धा.
एखादी वस्तू जी अकीकोला घरात ठेवता येईल. पण ती वस्तू नुसतीच घरात राहील त्यावर धूळ बसेल आणि अकिको विसरूनही जाईल त्याला.
हानाकोची स्वतःशीच चाललेली ही बडबड हानाकोची आई ऐकत होती. शेवटी आई म्हणाली मी तुला एक सुंदरशी भेट सुचवते. वाढदिवसाच्या दिवशी पहाटेच माझ्याबरोबर बाहेर ये. आपण जाऊन एक गंमत आणुयात.

आईच्या बोलण्याने हानाकोला खूप आनंद झाला. हानाकोची आणि घरातल्यांची निघण्याची तयारी सुरु होती. होता होता  जायचा दिवस आणि अकीकोचा वाढदिवस उद्यावर आला.रात्री झोपताना आईने हानाकोला सकाळी पहाटे उठायची आठवण करून दिली. अर्थात हानाको विसरली नव्हतीच.

दुसऱ्या दिवशी पहाटेच हानाको उठली. आई आणि ती दूर चालत चालत जंगलात गेल्या. आईने बरोबरच्या पिशवीत एक मोठी कात्री घेतली होती. मजल दरमजल करीत त्या दोघी जंगलात खूप आत पर्यंत पोचल्या. तिथे एका डोंगराच्या उतारावर सुंदर गुलाबी चेरीची फुले , साकुरा फुलला होता. सगळा डोंगर नुसता गुलाबी फुलांनी फुलून गेला होता. हानाको तर हरखूनच गेली.  पण अजूनही तीला अजूनही काय भेट द्यायची ते कळलेच नव्हते. मग आईने कात्रीने साकुराच्या मोठ्या दोन फांद्या कापून घेतल्या आणि त्या परतीच्या वाटेला लागल्या. वाटेत येताना आईने हानाकोला अजून काही पांढरी आणि जांभळी फुले  गोळा करायला सांगतली. ही सगळी फुले परडीत ठेवून आणि त्या दोन मोठ्या फांद्या  हातात घेऊन दोघी परत घरी आल्या.

आतापर्यंत अकीकोला फुलं भेट द्यायची हे हानाकोला लक्षात आलं होतं. पण फुलं कायमची आठवण कशी ठेवणार हे काही लक्षात येत नव्हते. आईला विचारल्यावर आईने हानाकोच्या कानात ती गंमत सांगितली. तशी हानाको आनंदाने नाचायलाच लागली.घरी आल्यावर सगळी फुलं आणि त्या दोन फांद्याचा  दोघींनी मिळून एक सुंदरसा बुके तयार केला. त्याला गुलाबी आणि पांढरा कागद लावून छान सजवले. मग आई म्हणाली या छोट्याशा कार्डवर एक मजकूर लिही.
"प्रिय अकिको,

असेल गुलाबी सडा,
वर पक्षांचा थवा.
मी नसले तरी आठवणी माझ्या.

तुझीच हानाको.
" 
आईने सांगितला तसा मजकूर लिहून ते कार्ड त्या फुलांमध्ये ठेवलं आणि हानाको अकीकोच्या घरी आली. इथे अकिको वाटच बघत होती. हानाकोने आणलेली फुलं अकीकोला भेट दिली आणि कार्ड रात्री ती गेल्यावर वाचायला सांगितलं. तो दिवसभर त्या दोघी एकत्र खेळल्या , जेवल्या. संध्याकाळ झाली तशी हानाकोची जायची वेळ झाली. रडत रडतच  दोघींनी एकमेकींना निरोप दिला. पुन्हा केव्हातरी नक्की भेटू असं आश्वासन दिलं आणि हानाकोचा प्रवास चालू झाला.

इथे रात्री अकीकोने तो मजकूर वाचला. पण तीला त्याचा अर्थ कळेना. रात्रभर अकिको विचार करत राहिली. असे दोन दिवस गेले. आता हानाकोने दिलेली ती फुलं सुकणार अशा विचाराने अकीकोला खुपच वाईट वाटत होतं. अकीकोच्या आईचं मात्र अकोकोकडे लक्ष होतं. शेवटी नं रहावून आई म्हणाली तुला हानाकोने दिलेली भेट जपून ठेवायची आहे ना? मग ती फुलं घेऊन इथे ये माझ्याबरोबर. अंगणात गेल्यावर आईने तो बुके सोडवला त्यातल्या त्या दोन साकुराच्या फांद्या घेऊन जमिनीत व्यवस्थित खड्डा करून लावल्या. आता कुठे अकीकोला हानाकोच्या मजकुरातली गंमत कळली.

अकिको रोज त्या फांद्याना पाणी घालायला लागली आणि त्यांची काळजी घ्यायला लागली. काही दिवसांनी त्या फांद्या रुजल्या आणि त्याला पोपटी रंगाचे नाजून कोंब फुटले. ही साकुराची रोपं मोठी व्हायला लागली. त्यांच्याशी गप्पा मारताना अकीकोचा एकटेपणा केव्हाच पळून गेला. दरवर्षी  वसंत ऋतू आल्यावर या रोपांना फुलं यायची. सुरुवातीला अगदी थोडीच असायची पण  अशी दोनचार वर्ष उलटली आणि झाडं  चांगली मोठ्ठी झाली. या साकुराचा बहार अगदी भरभरून यायला लागला. या दिवसात सगळं अंगण आणि अकीकोच्या घराची कौलं अगदी गुलाबी दिसायची. आणि एका वर्षी चक्क साकुराला छोट्या छोट्या लाल चुट्टुक चेरी आल्या. या चेरी खायला खूप खूप पक्षीही आले. अकीकोला हे नवेच मित्र मिळाले. हानाकोच्या मजकुराचे कार्ड

अकीकोने अगदी जपून ठेवले होते. त्यातला साकुराचा गुलाबी सडा ,  आलेल्या चेरी आणि त्यावरचा पक्षांचा थवा सगळ्या गोष्टी घडून आल्या होत्या. आता अकीकोच्या या नवीन मित्रांनी चेरी खाऊन त्यांच्या बिया गावात सगळी कडे टाकल्या. त्यांची रोपं उगवली आणि पुढच्या काही वर्षात गावात सगळ्यांच्या अंगणात साकुराची फुललेली, फळलेली झाडं दिसायला लागली.

अनेक वर्षांनी  जेव्हा हानाको आपल्या मैत्रिणीला भेटायला गावात परत आली तेव्हा यायच्या रस्त्यातच फुललेला साकुरा बघून आपल्या मैत्रीचे झाडं अकीकोने योग्य प्रकारे फुलवल्याचे समाधान हानाकोला मिळाले.
Posted by Swapnali Mathkar at 7:22 PM 1 comments
Labels: कथा, छान गोष्टी, फुलांच्या गोष्टी, साकुरा

Thursday, December 2, 2010

सायुच्या गोष्टी: ...आणि गणपतीबाप्पा थांबले.

लोकसत्ता बालाविभागात १२-सप्टेम्बर-२०१० रोजी  प्रकाशित
------------------------

सायुरीच्या सोसायटीमध्ये नुसती धावपळ चालू होती. का म्हणून काय विचारता अहो गणपती येणार म्हणजे तयारी नको का करायला? सोसायटीमध्ये असलेल्या गणेश मंदिरासमोरच मोठा मंडप घातला होता. सगळे ताई आणि दादा गणपतीची आरास , मखर यात गुंतले होते. गणपतीची गाणी लावण्यासाठी स्पीकर , म्युझिक सिस्टीम आणून ठेवली. कुठली गाणी कधी लावायची यावरही जोरदार चर्चा व्हायला लागली होती.


पण या सगळ्यात सायुच्या बच्चेकंपनी ग्रुपला मात्र कोणी मध्ये घेत नव्हते फारसे. त्यामुळे ते आपले उगीचच इथेतिथे लुडबुड करायचे आणि कधीकधी एखाद्या दादा कडून रागावूनसुद्धा घायचे.

दुपारी असच खेळता खेळता सायु गणपतीच्या देवळात गेली. हात जोडून नमस्कार करतेय तितक्यात तिला गाभाऱ्याजवळ असलेल्या मागच्या दरवाज्याजवळ जरा हालचाल दिसली. कोण असेल तिथे अस म्हणून ती दबक्या पावलांनी दरवाज्याजवळ गेली. तर कुणीतरी अजूनच लगबगीने पुढे गेलं. तशी सायु पुन्हा एकदा पुढे गेली आणि तिने जोरात विचारलं "कोण आहे तिकडे?" ती व्यक्ती दचकून थांबली आणि वळून सायुकडे बघायला लागली.

आता मात्र आश्चर्याचा धक्का बसायची पाळी सायुची होती.काय गणपतीबाप्पा? चक्क इथे आपल्यासमोर ? तिला काही बोलायला सुचेचना. तेवढ्यात बाप्पाच म्हणाला "हळू बोल ना ग. कोणीतरी पाहिलं म्हणजे." आता सायुला गम्मतचं वाटली गणपती बाप्पा अस म्हणतोय म्हणजे काय!

तिनेही मग खुसुखुसू हसत त्याला हळूच विचारलं. "बाप्पा तू इथे काय रे करतोयस? देवळात छान नैवेद्य घेऊन येतील काकू आता. तिथेच थांबना."

"मी पुढच्या दहा दिवसांसाठी पळून जातोय, जंगलात." बाप्पाने सांगितले?

"तू पळून जाणारेसं? आणि उद्या संध्याकाळी आम्ही मूर्ती आणणार त्याचं काय? तुझी पूजा करणार त्याचं काय? सगळे छान छान प्रोग्राम करतील, गाणी लावतील , छान छान खाऊ देतील तुला आणि तू म्हणतोयस मी पळून जाणार?"

"मग करणार तरी काय ग? तू बघितल नाहीस का ते मोठमोठे स्पीकर आणून ठेवलेत सकाळीच. माझे कान इतके मोठे मोठे कारण सगळ्या भक्तांनी केलेली प्रार्थना ऐकू जायला हवी मला. मग मला सांग, ही मोठ्ठ्याने ढणाढणा लावलेली गाणी मला किती जोरात ऐकायला येत असतील बरं? कान दुखून जातात माझे अगदी. फुलं घालून बंद केले तरी सुध्दा गाणी ऐकू यायची थांबत नाहीत.आजकाल मात्र मी पळूनच जातो या दहा दिवसात. छान पैकी जंगलात शांतपणे राहतो. आणि मोदक काय एरवी संकष्टीला सुद्धा मिळतात."

गणपतीबाप्पाचं दुख्ख ऐकून सायुला पण खूप वाईट वाटलं. पण तरीही बाप्पा पळून जावे हे काही तिला आवडलं नाही. तिने बाप्पाला खूप विनवणी केली. "प्लीज ना बाप्पा तू नको ना रे जाउस. तू सांगत का नाहीस या लोकांना मग सरळ सरळ?"

"अग माझीच पूजा , मग मी कस सांगणार कशी करा आणि काय करू नका ते? अस चालत नाही मी सांगितलेलं. आई रागावेल मग मला."

"हम्म, मग अस करूयात. मीच सांगते सगळ्यांना गाणी बंद करायला. मग थांबशील का तू?"

"अग सायु पण तुझ कोणी ऐकल नाही तर?"

"बाप्पा मी प्रयत्न तरी करते ना. त्यानंतरही गाणी लावली तर तू जा मग जंगलात. चालेल?"

हा प्रस्ताव बाप्पाला पटला. आणि गणपतीबाप्पा परत देवळात जाऊन बसला.



सायु लगेच घरी आली. ती बाप्प्पाला म्हणाली होती खर कि गाणी बंद करायचं सांगून बघते पण तिला हेही माहीत होतं कि अस काही सांगितलं तर सगळे किती हसतील आणि वर्षभर चिडवत रहातील ते वेगेळेच. घरी जाऊन ती विचार करत बसली. तेवढ्यात सायुची मावसबहीण सानिका कॉलेजमधून घरी आली. ती कॉलेज जवळ पडतं म्हणून इथेचं मावशीकडेच राहायची. आणि ती इथे रहायला आल्यापासून सायुला घरात जरा जास्तच मस्ती करता यायची.

सानिताई आल्या आल्या सायु तिच्या मागेच लागली. आणि तिला घाईघाईत गणपती बाप्पाची गोष्ट सांगून टाकली. हे ऐकून ताई जोरजोरात हसायला लागली.

"काय ग ए सायटले! दिवसा पण स्वप्न बघतेस कि काय?"

"ए ताई मी खरच सांगतेय ग. जा तू. तुला बघ गणपती बाप्पा स्वप्नात येऊन सांगेल कि नाही ते."

मनोमन सायुने गणपतीची प्रार्थना करून त्याला ताईच्या स्वप्नात जायची विनवणी केली.

संध्याकाळभर ताईने सायुला खूप चिडवलं. आणि सायु नुसतीच फुरंगुटून बसली.



दुसऱ्या दिवशी सक्काळीच पहाटेचं ताई उठली ती द्चकुनच. तिला खरच स्वप्नात गणपती आला होता. आणि त्याने सायुने जे सांगितलं तेच परत सांगितलं. ताईने गदागदा हलवून सायुला उठवलं आणि स्वप्नाबद्दल सांगितलं.

आता मात्र एकदम विजयी मुद्रा करून सायु म्हणाली "बघ मी सांगितलं होतं कि नाही?"

"हो हो बाई. तूच खरी कि नाही. पण आता काय करायचं ते सांग." ताईने लगेच माघार घेतली.

"तू जाऊन सांग ना तुझ्या मित्र मैत्रिणींना."

"बरी आहेस कि. मला हसतील नाही का सगळे."

"ह्म्म् मग आता? गाणी लावली कि बिचारा गणूल्या जाईल ग पळून." हिरमुसली होऊन सायु म्हणाली.

ताई विचारात पडली आणि अचानक तिला काहीतरी सुचलं

"चल, चलं सायु,जास्त वेळ नाही आपल्याकडे. अजून सूर्य उगवला नाही तोवर जाऊन येऊया गुपचूप."

सायुला कुठे जायचं असा प्रश्न विचारायालाही वेळ न देता ताईने ड्रॉवर मधला एका स्क्र्यू ड्रायव्हर आणि कटर घेतलं आणि चप्पल घालून निघाली. तिच्या मागे सायुही धावत निघाली.

मग ताई हळूच स्पीकर ठेवलेल्या जागेकडे आली. अजून सूर्य न उगवल्याने निळसर अंधार होता सगळीकडे. इकडे तिकडे बघत तिने स्क्र्यू ड्रायव्हरने अलगद स्पीकरचा मागचा भाग उघडला. आतल्या वायर कापून टाकल्या आणि परत बंद करून ठेवला. सगळे स्पीकर असे बिघडवून ती सायुचा हात धरून धावत घरी परत आली.

"तू आता मला सांगणार आहेस का काय केलस ते? ते स्पीकर बंद करून काय उपयोग? तो दुकानदार लग्गेच दुरुस्त करेल."

"सायु, अग आता गणपतीच्या दिवसात दुकानदाराला खूप काम असणार, इथले स्पीकर दुरुस्त करायला नक्कीच लवकर येणार नाही तो. बघच तू."

सायु आपल्या ताईकडे अभिमानाने बघत राहिली. आणि तेवढ्यात आत आलेल्या आईला आज या दोघी इतक्या लवकर कशा काय उठल्या याचच आश्चर्य वाटलं.

संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे सगळेजण गणपतीची मूर्ती आणायला गेले.टाळ, झांज वाजवत गाजत मूर्ती येऊन गेट मध्ये आल्यावर मस्त पैकी जोरदार गाणे लावायचा बेत होता मुलांचा.

त्याप्रमाणे गाणे वचालू केले पण आवाज येईच ना. सगळ्या वायरी कनेक्शन नीट बघितलं तरी आवाज काही येईना. इकडे गणपतीवाले गेट मध्ये ताटकळत उभे. शेवटी ते असेच धमाकेबाज गाणी न लावता आत आले.

बाकीच्या पोरांनी त्या स्पीकर वाल्याला फोन केला तर त्याने ताईच्या अंदाजाप्रमाणे "इतक्यात यायला वेळ नाही, खूप काम आहे" असच सांगितलं. एकंदर दादा लोकांचा जरा मुड गेलाच पण इलाजचं नव्हता.

गणेश पूजनाची आदली रात्र एवढी शांततापूर्ण असल्याने सोसायटीमध्ये सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. बाजूच्या सोसायटीमधली दोन चार मुल तर विचारायला सुद्धा आली कि काय तुमच्या गणपतीला यंदा काहीच धमाका नाही. आता त्यांना घाईत काय उत्तर द्यावे हेचं कुणाला कळेना. खर सांगितलं तर टिंगल होणार हे ठरलेलंचं. तेवढ्यात सानिका म्हणाली "हो हो आमचा गणपती यावर्षी ध्वनीप्रदूषण मुक्त करण्याचे ठरवले होते आम्ही". तिच्या या उत्तरावर सगळे अगदी अवाकच झाले. पण एकदम झ्याक उत्तर दिल म्हणून लगेच ग्रुपमध्ये कौतुकही झालं.

दुसऱ्या दिवशीची पूजा सुद्धा अशीच शांततेने झाली आणि शेवटी सगळ्यांनी मस्तपैकी टाळ वाजवत आरत्या म्हटल्या.

आजोबांच्या ग्रुपने तर येऊन मुलांचे स्पेशल आभार मानले. म्हणाले "एवढा शांततापूर्ण कार्यक्रम बघून छान वाटलं बघा मुलांनो. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ठ गणपतीसाठी तुमच नाव नक्की सुचवणार बर आम्ही."

हे ऐकून तर मुलांचा आनंद अगदी गगनात मावेना. इकडे सायु आपल्या सानीताईला डोळा मारून कशी गंमत झाली अस खुणावत होती.

रात्री स्पीकरवाला स्पीकर दुरुस्त करायला आल्यावर तर सगळ्या मुलांनी अगदी एकमताने स्पीकर परत देऊन टाकले. हे बघून तर सायु एकदमच खुश झाली.

त्यादिवशी रात्री जेवायच्या वेळेला अचानक सायु धावत बाहेर गेली. आई हाक मारतेय पण ऐकेल तर ती सायु कसली! तशीच धावत ती गणपतीच्या देवळात गेली. तिथे बाप्पा तिची वाटच बघत होता. सायु आल्या आल्या बाप्पाने तिला छानपैकी थॅन्क्यु म्हटलं आणि आपल्या सोंडेने समोरच्या ताटातले दोन मोदक तिच्या हातात ठेवले.
Posted by Swapnali Mathkar at 7:07 PM 0 comments
Labels: छान गोष्टी, सायुच्या गोष्टी

Wednesday, December 1, 2010

सायुच्या गोष्टी: घरातलं इंद्रधनुष्य

सायुच्या गोष्टी: घरातलं इंद्रधनुष्य

"बाबा इंद्रधनुष्य करून दाखवा ना. प्लीज. मी कधी बघितलंच नाहीये. प्लीज ना बाबा." सायु सकाळपासून बाबांच्या मागेच लागली होती.

"अगं, इंद्रधनुष्य असं घरी कसं करणार?" आज्जीने मुद्दामून हसतच विचारलं.

"अग आज्जी काल आई धनुकल्याची गोष्ट सांगत होती ना, तेव्हा बाबा म्हणाले मी दाखवीन तुला इंद्रधनुष्य. आणि आत्ता दाखवायला सांगतेय तर बाबा लक्षच देत नाहीयेत." सायुने आज्जी कडे तक्रार केली.

इतक्यात बाबा आलेच आंघोळ करून बाहेर. "काय गं पिल्लू कशाला गाल फुगवून बसलीयेस?"

"हं तुम्ही लक्षच देत नाही बाबा. मला इंद्रधनुष्य करून दाखवा ना."

"हो गं नक्की दाखवणार आहे. पण आत्ता नाही तीन दिवसांनी शनिवार आहेना? तेव्हा मला सुट्टी असते त्या दिवशी दाखवतो. चालेल ना?"

आनंदाने सायु एकदम उड्याच मारायला लागली. "नक्की बरं का बाबा. मी श्रीया आणि सुरभीला पण बोलावणार आहे बघायला."

"बरं, बरं संध्याकाळी बोलाव त्यांना ५ वाजता."

श्रीया आणि सुरभी या सायुच्या बालवाडीतल्या मैत्रिणी . या दोघी बरोबर आणखीनही दोनचार जण येणार हे बाबा आणि आई दोघांनाही ठाऊक होतं.
त्यानंतर रोज सकाळी उठल्यावर सायुचा पहिला प्रश्न "आज कुठला वार?" आज शनिवार नाही अजून शनिवार यायला वेळ आहे अस ऐकलं कि जरा हिरमुसली होऊनच उठायची ती. खरतरं उठायचच नसायचं तिला. पण आई ऑफिसला जायच्या आधी तयारी करून आईबरोबर शाळेत जायला लागायचं. त्यामुळे लवकर न उठून चालायचं नाही.
शेवटी एकदाचा शनिवार आला. "आज शनिवार आहे हो" अस आज्जीने सांगितल्यावर सायु अगदी टुणकन उडी मारून उठली. आणि धावत बाबांच्या समोर जाऊन "आज शनिवार आज शनिवार" अस म्हणत नाचायला लागली.
आता कधी एकदा संध्याकाळ होते अस झालं होत तिला. दुपारचं  जेवणखाण अगदी शहाण्यासारख करून एक झोप सुद्धा काढली चक्क तिने.
चार वाजता श्रीया, सुरभी आल्याच पण बरोबर तन्मय निखिल आणि निरंजनीहि आले. आल्या आल्या सुरभी ने धावत घरात जाऊन कुठे इंद्रधनुष्य दिसतंय का ते बघून घेतलं. आईने मस्तपैकी इडल्या केल्या होत्या सगळ्यांसाठी. त्या भराभरा खाऊन मुलं सायुच्या बाबांची वाट बघत होती.
पण बाबा मात्र अजून तसेच  सगळ्यांबरोबर गप्पा मारत बसले होते.

"बाबा इंद्रधनुष्य?" सायुने आपली नाराजी दाखवलीच थोड्यावेळाने.

"हो गं सायु. ५ वाजता दाखवणार मी. त्या आधी दिसणार नाही ते."

आता मात्र मुलांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली. आई, आज्जी, आजोबा मात्र  खुसुखुसू हसतच होते.

५ वाजायला आले तसे बाबा उठले आणि गाडीच्या गॅरेजजवळ गेले. सायुच घर म्हणजे सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्याच्या कॉलनीमधला एक बंगला होता, त्यामुळे त्यांच स्वतंत्र गॅरेज होतं. तिथे संध्याकाळच्या सोनेरी उन्हात सगळ्यांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या होत्या. त्या सावल्यात खेळण्याचा खेळ मुलांनी सुरु केला.  इतक्यात बाबांनी गाडी धुवायचा पाईप काढून गाडी धुवायची तयारी सुरु केली.
अजूनही मुलांना काहीच कळत नव्हतं. सायुने नळ चालू केल्यावर मग पाईप मधून जोरात पाण्याचा फवारा उडायला लागला. आणि बघतात तर काय? त्या फवारयाच्या एकाबाजूला सुंदर सात रंगांची एक कमान दिसायला लागली होती.
"बाबा इंद्रधनुष्य!!!" अस म्हणून सायु नाचायलाच लागली. बाकीचे मित्र मैत्रिणी सुद्धा तिच्याबरोबर नाचत , मधेच सात रंगाच्या कमानीत हात घालून धमाल करायला लागले.
तेवढ्यात बाबा म्हणाले कळलं का तुम्हाला कस आलं इंद्रधनुष्य ते?
"पाण्यातून उन गेल्यामुळे ना काका?" निरंजनीने विचारले.
बरोब्बर! पाण्याच्या थेंबातून प्रकाश गेला कि पांढरा प्रकाश सात रंगात त्याचे डीफ्रॅक्शन होते आणि मग इंद्रधनुष्य दिसते. कुठले कुठले रंग आहेत पहा बरं.
तेवढ्यात सायुच्या आईने ता ना पि हि नी पा जा अशी रंगाच्या नावाची गम्मतसुद्धा सांगितली.  आता मुलांनी पण वेगवेगळया प्रकारे पाईपमधून पाणी उडवून कसे रंग दिसतात ते पाहिले, आणि सूर्यास्त होईपर्यंत तिथेच मस्त खेळत राहिले.
आणि दुसऱ्या दिवशी शाळेतल्या इतर मित्र मैत्रीणीना हि गम्मत कधी एकदा सांगतो असे सगळ्यांना झाले होते.
त्यादिवशी रात्री झोपायच्या वेळी जेव्हा बाबा सायुला थोपटत होते तेव्हा मात्र सायुने बाबांना एक गोड पापी दिली आणि थॅंक्यू म्हटले. मग झोपण्यासाठी डोळे मिटले तर तिला सारखे इंद्रधनुष्यच दिसत होते.
न रहावून डोळे उघडून तिने बाबांना विचारले "बाबा इंद्र धनुष्य विमानातून कसं दिसतं हो?"  
          
Posted by Swapnali Mathkar at 5:32 PM 0 comments
Labels: छान गोष्टी, विज्ञान गोष्टी, सायुच्या गोष्टी
Newer Posts Older Posts Home

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

Labels

  • २०१० दिवाळी अंक (1)
  • ganapati (1)
  • Origami (2)
  • Origami ganesh (1)
  • poem (1)
  • potato (1)
  • world (1)
  • उराशिमा तारो (1)
  • ऐका (4)
  • ऑडियो (4)
  • ऑडियो कथा (4)
  • ऑडियो बुक (1)
  • ऑलिम्पिक (1)
  • ओरिगामी (2)
  • ओरिगामी गणेश (1)
  • कथा (2)
  • कथाकथन (4)
  • कथाकथी (4)
  • कागदाचा गणपती (1)
  • कागदी (1)
  • कुनीदेशातल्या कथा (2)
  • गणपती (1)
  • छान गोष्टी (12)
  • जपानी (1)
  • ढग (1)
  • थेंबाचा प्रवास (1)
  • निसर्गकथा (2)
  • पंचफलम् समर्पयामी (1)
  • पाऊस (2)
  • पाणी (1)
  • प्राणीकथा (1)
  • फळे (1)
  • फुलपाखरी आकाशकंदील (1)
  • फुलांच्या गोष्टी (2)
  • बटाटे (1)
  • बडबड कविता (4)
  • बालकथा (1)
  • भाषांतर (3)
  • मज्जाखेळ (1)
  • मराठी दिवस (1)
  • विज्ञान गोष्टी (4)
  • साकुरा (1)
  • सायुच्या गोष्टी (3)
  • हस्तकला (1)
  • हातमोजे (1)

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2020 (5)
    • ▼  April (3)
      • कथाकथी - प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वा...
      • सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग
      • कथाकथी - चिमण्या आणि डोंगर (Marathi Audio Book)
    • ►  March (2)
  • ►  2014 (2)
    • ►  July (1)
    • ►  February (1)
  • ►  2013 (3)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
  • ►  2012 (4)
    • ►  September (1)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
  • ►  2011 (2)
    • ►  June (2)
  • ►  2010 (19)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  September (4)
    • ►  August (1)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (1)
  • ►  2009 (1)
    • ►  February (1)

Followers

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments

Search This Blog

 
Copyright 2009 गंमत गोष्टी. Powered by Blogger.
Blogger Templates created by Deluxe Templates
WP Themes by Wpthemesfree