skip to main | skip to sidebar

गंमत गोष्टी

कुनिदेशात गोष्टी वाचण्याआधी लहान मुलं एक छान गाणं म्हणतात. याचा अर्थ आहे सगळे मिळून शांततेने मजेदार गोष्ट ऐकुयात. चला तर मग आपण पण गाणं म्हणून वाचायला सुरुवात करू.
कामीशिबाई कामीशिबाई
पाची पाची पाची पाची उरेशिई कामीशिबाई
श् श् श् श् ....शिझुकानी किकीमाश्यो.

Thursday, June 17, 2010

निहारिकाचे स्वप्न

निहारिका घराच्या समोरच्या पायऱ्यावर बसून दोन्ही हाताच्या तळव्यात आपली हनुवटी टेकवून  आकाशातले तारे बघत होती. आई घरातले काम संपवून आलीच इतक्यात तिच्या बाजूला बसायला. आई आणि चिमुकली निहा नेहेमीच अस रात्री चांदण्यात बाबांची वाट बघत बसत. आईच्या मांडीवर डोकं ठेवून कितीतरी गोष्टी ऐकायला आणि चंद्र चांदण्या बघायला निहाला फार आवडायचे. निहाच्या आईला तर असंख्य गोष्टी सांगायची हौसच होती. या गोष्टीमध्ये आठवड्यातून एकतरी चंद्राची गोष्ट असायचीच. आजपण चंद्राची गोष्ट सांगून झाल्यावर निहा म्हणाली आई मी मोठी झाले ना कि परी होणार आणि चंद्रावर जाणार. हे निहाच २ वर्षाची होती तेव्हापासूनचे स्वप्न होतं. आईलापण मजा वाटायची ते ऐकून. पण आता ४ वर्षाच्या निहाला जरा खऱ्या गोष्टी पण सांगायला हव्या अस वाटून गेलं आईला. तिच्याकडे बघत आई म्हणाली निहा अग पऱ्या किनई फक्त गोष्टीमध्ये असतात. खऱ्या खऱ्या नसतातातच. निहा जरा विचारात पडली. आता ती काहीतरी नवीन प्रश्न विचारणार हे आईला कळलंच. निहाला खूप वाईट वाटेल कि काय असा आई विचार करतेय तोच प्रश्न आला "मग चंद्रावर कसं जायचं? पऱ्या नाही मग पंखही नाही, कसं उडणार मी?" म्हणजे पऱ्या खऱ्या नाही हे ऐकून हिला वाईट वाटलच नाही तर! आईने  मग तिला अवकाशयानातून (स्पेसशिप) चंद्रावर जाता येत. त्यासाठी अंतराळवीर (अ‍ॅस्ट्रॉनॉट) व्हावं लागतं अस सांगत दुसऱ्या दिवशीच्या गोष्टीच प्रॉमिस करून तिला झोपायला आत नेलं. झोपेत स्वप्नामध्ये  अ‍ॅत्रोनात येईल ना आई? अस विचारत निहा गादिवर झोपली खरी पण तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न होते. आत्ता आईला विचारले तर  झोपत नाही म्हणून आई रागावणार हेहि माहिती होतं मग तसेच डोळे बंद करून ती विचार करत करत केव्हा झोपली ते तिलाच कळल नाही.

सकाळी आईने हाक मारून उठवतानाच निहाचा पहिला प्रश्न होता "आई अ‍ॅत्रोनात ची गोष्ट?" त्या अ‍ॅत्रोनात च्या गोष्टीसाठी सकाळचे आंघोळ खाणे अगदी न कुरकुरता पार पडले. आणि स्वारी गोष्ट ऐकायच्या तयारीत आईजवळ जाऊन बसली.
माहितेय का निहा अगं  चंद्र आपल्या पासून खूप दूर असतो. चंद्रावर पण आपल्यासारखीच जमीन असते. सगळी कडे गोल गोल खड्डे असतात. आई सांगायला लागली.
आपल्या रस्त्यांसारखे खड्डे? निहाचे पण प्रश्न सुरु झालेच.
हो तसेच ग.याला विवरं म्हणतात. तिथे चंद्रावर एकाबाजूला ना खूप गरम होत असतं. आणि दुसऱ्या बाजूला खूप खूप थंड असतं.
फ्रीजसारख?
फ्रीजपेक्षापण खूप थंड. चंद्रावर मुळीच हवा पण नसते. पोहोताना नाकात पाणी गेलं कि कसं गुदमरायला होत कि नाही? ते श्वास घेता येत नाही म्हणूनच. चंद्रावर हवा नसते म्हणून श्वास पण घेता येत नाही.
मग आपण कसं रहाणार? निहाची अजून एक रास्त शंका.
होना म्हणूनच अस कोणालाही चंद्रावर जाता येत नाही.
अ‍ॅत्रोनात जातो. हो किनई?
हो चंद्रावर जाण्यासाठी अ‍ॅस्ट्रॉनॉट व्हावं लागतं. अ‍ॅस्ट्रॉनॉट ऑक्सिजन घेऊन जातात बरोबर म्हणून ते गुदमरत नाहीत.  एवढ सांगून आईने कॉम्प्युटर चालू केला आणि इंटरनेटवर अ‍ॅस्ट्रॉनॉट बद्दल माहिती शोधली. तिथे चित्रे होती  विचित्र कपडे घातलेल्या माणसाची. हा अंतराळवीर. इंग्लिशमध्ये म्हणायचं अ‍ॅस्ट्रॉनॉट. आणि हे त्याच अवकाशयान म्हणजे इंग्लिशमध्ये स्पेसशिप.
स्पेसशिपला खूप जोरात जातं.अ‍ॅस्ट्रॉनॉट स्पेसशिप मध्ये बसून  चंद्रावर किंवा आकाशात जातात.
मग तिथे जाऊन काय खेळतात?
खेळायला जात नाहीत काही. तिथे वेगवेगळे प्रयोग करायला जातात. आकाशात अजून काय काय आहे, चंद्रावरची माती कशी आहे अशा बऱ्याच गोष्टी बघायच्या असतात त्यांना.     
मी बागेत माती बघते तशी?
उं... थोडफार तसच बर. बर हा चंद्र आपल्या पृथ्वीभोवती गोल गोल फिरतो. म्हणून कधी कधी बारीक दिसतो आणि कधी कधी गोल दिसतो.
आता निहा इंटरनेटवरची चित्र आणि व्हिडीओ बघण्यात गुंग झाली होती. तसली छान छान चित्र पाहून आणि अ‍ॅस्ट्रॉनॉटचे कपडे बघून  तिच्या मनाने ठरवून टाकले कि आता  आपण अ‍ॅस्ट्रॉनॉटच व्हायचे , नाहीतर चंद्रावर जाता येणार नाही आपल्याला.
रात्री बाबा आल्यावर दरवाज्यातच त्याना गाठून मी परी होणारच नाहीये. मी ना अ‍ॅत्रोनात होणार आहे अशी घोषणा सुद्धा करून झाली.

आता या गोष्टीला २० वर्ष झालीत. तेव्हाची चिमुकली निहा आता खूप उंच झालीये. आणि खूपखूप अभ्यास करून  इस्रो (ISRO)मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतेय. आता भारताचे स्पेसशिप चंद्रावर जाणार आहे ना त्यात निहारिका सुद्धा असणार आहे. त्याची तयारी केव्हापासूनच सुरु झालीये इस्रोमध्ये.
निहाची आई आणि बाबा पण आपल्या चिमुकलीचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून आनंदात आहेत.
निहारिकाने तिचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले खूप अभ्यास केला, अजूनही करतेच आहे.
तुमची सुद्धा स्वतःची मनापासून इच्छा काही करायची असली आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न केलेत ना कि सगळ्या इच्छा  नक्की  पूर्ण होतात बर.
Posted by Swapnali Mathkar at 8:25 PM 4 comments
Labels: छान गोष्टी, विज्ञान गोष्टी

Tuesday, June 15, 2010

सुर्योबा

सुर्योबा तू कधी भिजलायस का?
पावसात माझ्यासारखा नाचालायस का?
पावसात लपून असा बसतोस काय?
चमचम विजेला घाबरतोस कि काय?
इंद्राचा पूल उतरून खाली ये एकदा
माझ्याबरोबर पावसात भिज बर जरासा.
रंगीत होड्या आणि पाण्यातल्या उड्या
माझ्याशी भरपूर खेळून घे.
पावसाची गंमत बघून घे.
Posted by Swapnali Mathkar at 9:44 PM 0 comments
Labels: बडबड कविता

गोगलगाय

गोल गोल गोगलगाय
पानावरून घसरत जाय.
शिंगं डोक्यावर  आणि डोळे शिंगावर
का ग तुझ घर पाठीवर?
हात मी लावला कि हरवून जातेस
सांगतरी पुन्हा कधी बाहेर येतेस?
सांग ना माझ्याशी खेळतेस काय?
गोल गोल गोगलगाय
Posted by Swapnali Mathkar at 5:46 PM 0 comments
Labels: बडबड कविता

लोणी

ताक करु ताक
घुसू घुसू घुसू
लोणी आलं लोणी
फुसु फुसु फुसू
खाल्लं कोणी?
आमच्या बाळाने
Posted by Swapnali Mathkar at 5:45 PM 0 comments
Labels: बडबड कविता

Saturday, June 12, 2010

आज्जी आजोबा

आज्जी ग आज्जी ग
कसली केलीस भाजी ग?
वरणभात कालवून दे
एक एक घास भारवून दे

                               आजोबा हो आजोबा
                               घोडा घोडा करताय ना?
                               पाठीवर तुमच्या बसेन मी
                               घरभर फिरेन मी

आज्जी ग आज्जी ग
कसलं चित्र काढू ग?
छानसे रंग आणून दे
एवढ चित्र रंगवून दे

                               आजोबा हो आजोबा
                               गोष्ट एक सांगताय ना?
                               आज्जीची गोधडी पांघरून बसेन
                               ऐकता ऐकता झोपून जाईन.
Posted by Swapnali Mathkar at 5:43 PM 0 comments
Labels: बडबड कविता

Monday, May 31, 2010

कुनीदेशातल्या हिमपऱ्या

एक छोटासा देश होता, कुनी नावाचा. कुनीदेशात मिचमिच्या डोळ्यांचे आणि चपट्या नाकाचे लोक रहात. त्यांच्या इवल्या इवल्या दुडूदुडू धावणाऱ्या मुलांचे गोबरे गाल नुसते सफरचंदासारखे लाल असायचे. यांची भाषा पण अगदीच मजेदार. आईला म्हणायचे “काका”. बाबांना म्हणायचे “तोतो”. आजोबांना म्हणायचे “जीजी” आणि आजीला म्हणायचे “बाबा”. इकडे या म्हणायचे तर म्हणे “कोको”. आई इथे ये म्हणायचं तर “काका कोको” मजाच कि नाही?

तर अशा या कुनीदेशात एकदा फार कडाक्याची थंडी पडली. तशी दर वर्षी पडायची पण यंदा जरा जास्तच होती. घरंदारं झाड सगळी गारठून गेली होती. सगळी मुलं, काका, तोतो, जीजी, बाबा एकत्र कोंडाळ करून घरातच चुलीभोवती शेकत बसले होते. आज म्हणे हिमपऱ्या जमिनीवर येणार होत्या. मुलांना भारीच उत्सुकता होती हिमपऱ्या बघायची. अधून मधून काका आणि तोतोची नजर चुकवून काही उनाड मुलं खिडकी किलकिली करून चोरून बघत. पण गडद राखी रंगाच्या आभाळाशिवाय काहीच दिसत नव्हत.

अचानक नाचत तरंगत एक हिमपरी जमिनीवर उतरली. गारठलेल्या जमिनीवर अलगद बसली. अगदी चिमुकली, अंगठ्याच्या पेराएवढीच. तिच्यामागुन गिरक्या घेत अजून दुसरी, तिसरी हिमपरी उतरली. आणि हळूहळू मात्र हिमपरयांचे थवेच्या थवे तरंगत गिरक्या घेत अलगद उतरू लागले. कधी जमिनीवर, कधी झाडावर, तर कधी कौलांवर. हिमपऱ्यांच्या शुभ्र झग्यांनी निळी निळी कौलं, जमीन, झाडे सगळच पांढरशुभ्र दिसायला लागल. होताहोता रात्र संपून दिवस उजाडला, खरतर उजाडला नाहीच कारण अजूनही सगळीकडे अंधारलेलच होत. हिमपऱ्यांचा मनमुक्त नाच आता मस्तीखोर मुलांचा दंगा वाटत होता. आणि त्यात जोराचा वाराही आला धिंगाणा घालायला. मग काय हिमपऱ्यांच्या अजूनच अंगात आलं. त्यांची मस्ती थांबेचना. असे खूप दिवस खूप रात्री गेल्या. कितीतरी झाडे उन्मळून पडली. कुनिदेशातली माणस, प्राणी घाबरले. पण करणार काय? शेवटी एका रात्री हिमपऱ्या दमल्या आणि झाडांवर बसल्या. वाराही मग कंटाळून दुसऱ्या देशात निघून गेला. हिमपऱ्या दमून भागून झाडांवर आपलेच पंख पांघरून झोपी गेल्या.

झाडांनी मग विचार केला, किती त्रास दिलाय यांनी सगळ्यांना. आता थोडे दिवस कोंडूनच ठेवूयात या पऱ्यांना. आणि त्यांनी आपले सालींचे अगणित हात पसरवून हिमपऱ्यांना मुठीत बंद करून टाकले.

दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला. छान स्वच्छ प्रकाश पडला. सगळे काका, तोतो, जीजी, बाबा बाहेर येऊन आपल्या आपल्या कामाला लागले. इवली इवली मुलं बर्फात बुटांचे ठसे उमटवायचे, घसरगुंडी करायचे खेळ खेळू लागली. झाडांच्या मुठीतल्या पऱ्या मात्र कोणालाच दिसल्या नाहीत.

इथे काय झाले, हिमपऱ्या झोपेतून जाग्या झाल्या. पण बघतात तर काय झाडांनी कोंडून ठेवलेलं. त्यांनी झाडांची खूप विनवणी केली. पण झाडांनी अजिबात त्यांचे काही ऐकलं नाही.
सगळ्यांना एवढा त्रास दिलातना, आता अजिबात सोडणारच नाही म्हणाली झाडं. मग हिमपऱ्या खूप खूप रडल्या. रडून रडून गुलाबी झाल्या असे पंधरा दिवस पंधरा रात्री गेल्या. रोज हिमपऱ्या खूप विनवणी करत, माफी मागत. पुन्हा असे करणार नाही म्हणत. शेवटी झाडांना दया आली आणि त्यांनी आपल्या मुठी अलगद उघडल्या. पऱ्या आनंदून गेल्या. पटापटा बाहेर येऊन उडायला गेल्या. पण बघतात तर काय इतके दिवस कोंडून राहिल्याने त्यांचे पाय झाडांना चिकटून गेले होते. पंखांच्या सुंदर पांढऱ्या पाकळ्या झाल्या होत्या. रडून रडून त्यांना हलकी गुलाबी झटा आली होती. पऱ्यांनाच आपले चे नवे रूप फार आवडले. हळूहळू कुजबुजत त्यांनी सगळ्या झोपाळू पऱ्यांना उठवायला सुरुवात केली. आणि सगळी झाडे नुसती पांढऱ्या गुलाबी फुलांनी भरून गेली. थंडीने निष्पर्ण झालेल्या झाडांना अनोखा गुलाबी साज चढला.

अचानक खेळणाऱ्या मुलांचे लक्ष झाडांकडे गेले. त्यांनी काका कोको. बाबा कोको म्हणून हाका मारून आपल्या आई आणि आज्जीला बोलावले. त्या सुद्धा या देखाव्याने चकित झाल्या. हळूहळू सगळी माणस गोळा होऊन बघू लागली. जिथे जाव तिथे हिच गुलाबी झाडं. पण अरेच्च्या हि तर चेरीची झाडं होती ना? चेरीला फुलं आली कि काय? मग सगळे बुत्सूदेवाच्या देवळात गेले आणि एवढी छान फुल फुलवल्याबद्दल त्याचे आभार मानले. अशी फुल नेहेमीच राहुदेत म्हणून प्रार्थना केली. चेरीच्या झाडांखाली बसून गाणी म्हटली. काका , बाबांनी केलेली पक्वान्न खाल्ली.

पऱ्यांना आता फार मजा वाटायला लागली होती. पण जसजसे उन तापू लागले तसे ते त्यांना सहन होईना. त्यांच्या एकएक पाकळ्या गळू लागल्या. शेवटी कितीझाल तरी हिमपऱ्याच ना. त्या पाकळ्या सुध्दा गळताना नाचत तरंगत गिरक्या घेत अलगद जमिनीवर विसावत होत्या. तरीहि पऱ्यां आनंदित होत्या. त्यांनी ठरवल होत अशी गंमत आता दरवर्षी करायची. मग अजूनसुध्दा दरवर्षी हिमपऱ्या दंगा करतात आणि झाडसुध्दा त्यांना मुद्दामच कोंडून ठेवून त्यांची फुलं करतात. कुनीदेशातली माणस मग चेरीच्या झाडांखाली बसून गाणी म्हणतात.
Posted by Swapnali Mathkar at 5:57 PM 0 comments
Labels: कुनीदेशातल्या कथा, छान गोष्टी

Thursday, February 19, 2009

राजकन्येचा झगा

राजकन्येचा झगा

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एक छोटस गाव होतं. इन मीन तीन घरांच. गावाभोवती सुंदर नीळे डोंगर होते. खळाळणारी नदी होती. गर्द हिरवी झाडे होती छोटी छोटी तीन घर होती. घरांभोवती अंगण. अंगणात छान रांगोळी.

एका घरात एक छोटीशी काळ्याभोर डोळ्यांची, गोबरया गालांची गोंडस मुलगी रहात होती. ती रोज आपल्या अंगणात पक्षांशी खेळायची. फुलांना कुरवाळायची. अंगणाच्या सभोवार तीने झाड लावली होती, त्यांना पाणी घालायची.त्यांच्याशी गप्पा मारायची. एका झाडाशी तर तीची खास गट्टी होती. हिरवगार झाड आणि त्याची गर्द सावली तीला खूप आवडायची. छोट्या छोट्या पानटल्यांची मिळून बनलेली मोठी मोठी पान बघताना तीला मजा वाटायची. झाड सुद्धा तीची रोज वाट बघायच. तीच्या इवल्याशा हातांना पानांनी गुदगुल्या करायचं. सळसळ आवाज करत मोठ्यानी हसायच.

एकदा काय झालं, त्या देशाच्या राजकन्येला निळ्या डोंगरांवर जायच होत. आदल्या दिवशी गावात दवंडी पिटली,
"ऐका हो ऐका उद्या राजकन्या गावातून जाणार आहे. सगळ्यांनी राजकन्येच्या स्वागताला थांबा." तीनही घरासमोर छान रांगोळया काढल्या. फुलांनी घर सजवली. सगळेजण सकाळी उठून, तयारी करुन वेशीपाशी ऊभे राहीले. सकाळी सकाळी भालदार चोपादारांची एक मोठी तुकडी गावात आली. त्या चिमुकल्या गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फी उभी राहिली. मागाहून आल्या राजकन्येच्या दासदासी, त्यांनी रस्त्यावर पायघड्या टाकल्या. इतक्यात टपटप असा घोड्याच्या रथाचा आवाज झाला. सगळे आतुरतेने मान उंचावून बघायला लागले. पांढऱ्याशुभ्र असे सात घोडे लावलेल्या चांदीच्या रथाचे आगमन झाले. कमानदार रथ आणि त्यावर मोत्यांच्या झालरी. जणू काही चंद्राचाच रथ. आणि त्यात बसलेली परीसारखी सुंदर राजकन्या. गावातल्यांनी पहील्यांदाच अशी सुंदर राजकन्या बघितली होती. आपल्या देशाची राजकन्या म्हणून त्यांच्या डोळ्यातून कौतुक दिसत होते. छानशी, लांब केसांची आणि नाजुक राजकन्या. तीने सुंदर लाल रंगाचा पायघोळ झगा घातला होता. त्यावर पांढरी झालर अन माणकांची सुंदर नक्षी होती. ऊन्हात झगा छान चमकत होता. सगळ्यांनी राजकन्येचे मनापासून स्वागत केले, तीच्यावर फुले उधळली. असे छान स्वागत स्विकारत राजकन्या डोंगरावर निघून गेली.

इथे गावातल्या त्या छोट्याशा मुलीलाही राजकन्या खूप आवडली. पण त्याहीपेक्षा आवडला तो तीचा झगा. तिच्या ध्यानीमनी सारख राजकन्या आणि झगाच येऊ लागला. तीला वाटल आपल्याकडेही असा सुंदर झगा असता तर किती छान झाल असतं. काय कराव बर? तीने आई,बाबांजवळ हट्ट केला. पण ते तरी कसा देणार राजकन्येचा झगा. आई,बाबांपण समजूत काढून दामले. एवढी शहाणी गुणाची मुलगी तू, कशाला अशी रडतेस? आपण आपली साधी माणसं. आपलायाला असा झगाबिगा नाही मिळत. आईने परत समजावलं. आता आईबाबांना वाईट वाटेल म्हणून चिमुकलीने ओठावर हसू आणलं आणि बागेत पळाली. आणी आपल्या लाडक्या झाडाखाली जाऊन बसली. झाडाने सळसळ करून तिला खेळायला बोलावलं पण तीच काही आज लक्षच नव्हत. झाडाने खोदून खोदून विचारल्यावर मात्र तिने झग्याबद्दल सांगितल. आणि वर म्हणाली “जाउदे आपल्याला काही तसले कपडे कधी मिळणार नाही चे माहितेय मला, तरीसुद्धा जरा वाईट वाटतंय मला. उद्या नाही ह इतक वाटणार.”

हे ऐकून बघून झाडालापण खूप वाईट वाटल. झाड दुःखी झाल. अस झाड दुःखी झालं की वनराणीला लगेच खबर पोहोचते. झाडांवरचे पक्षी लगेच तीला निरोप देतात. अशी झाड, फुलं, पान यांच दुःख देवीला अजिबात बघवत नाही. त्या रात्रीच वनदेवी आली झाडाकडे त्याची विचारपूस करायला. मग झाडाने तीला त्याच्या लाडक्या छोट्याशा मैत्रिणीची गोष्ट सांगितली. म्हणाल, “ती किती शहाणी आहे, माझे कित्ती लाड करते, माझ्याशी खेळते. आत्तासुद्धा आईबाबांना वाईट वाटू नये म्हणून रडत नाहीये ती. मग मला वाटत आपण नाही का तीला असा सुंदर झगा देऊ शकत? कित्ती छान दिसेल ती."
वनदेवीला पण खरतर हि चिमुकली माहिती होती. तिच्या पक्षीदुतांकडून तिला नेहेमी हिच्या बद्दल कळायचं. सगळ्यांची लाडकी होतो ना ती. पण झगा देण वनदेवीच्या हि हातातलं नव्हतं. एरवी फुलं, फळ, पान काय मागाल ते देता आलं असतं तिला. मग ती म्हणाली "मी तुला झगा देऊ शकत नाही रे. तो फक्त राजाच देऊ शकतो. पण मी तशीच सुंदर फुल मात्र देउ शकते. ती तु तीला दे. चालेल का तुला?" झाड आनंदल, सळसळ करत हो म्हणालं. वनदेवीने आपल्या हातातल्या जादुई फुलाने झाडाला स्पर्श केला. सगळ झाड शितल प्रकाशाने क्षणभर उजळल. वनदेवी हसत हसत निघून गेली. आणि झाड गडद अंधारात झोपून गेले.
सकाळ झाली. छोटी नेहेमीप्रमाणे सकाळी झाडांना पाणी घालायला बाहेर आली. आणी बघते तर काय हे हिरवागार झाड हिरव राहीलच नव्हतं. त्याच्या अंगाखांद्यावार सुंदर फुलं उमलली होती. लालचुटूक रंगाची, पांढर्याब झालरीची , माणकांच्या ठिपक्यांची. सगळ झाड अशा फुलांनी डवरून गेलं होतं. ऊन्हात त्याचा रंग छान चमकत होता. गावातले सगळेच जमून ती फुल बघत राहीले. ती छोटी धावत धावत झाडाखाली आली, आणी झाडाने सळसळ करत तीच्या अंगावर फुल टाकली. गुलमोहोर अगदी आनंदून गेली. सगळ्यानी एकमतानी फुलांना गुलमोहोरची फुल अस नाव ठरवून टाकलं.
Posted by Swapnali Mathkar at 6:47 PM 0 comments
Labels: छान गोष्टी, फुलांच्या गोष्टी
Newer Posts Home

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

Labels

  • २०१० दिवाळी अंक (1)
  • ganapati (1)
  • Origami (2)
  • Origami ganesh (1)
  • poem (1)
  • potato (1)
  • world (1)
  • उराशिमा तारो (1)
  • ऐका (4)
  • ऑडियो (4)
  • ऑडियो कथा (4)
  • ऑडियो बुक (1)
  • ऑलिम्पिक (1)
  • ओरिगामी (2)
  • ओरिगामी गणेश (1)
  • कथा (2)
  • कथाकथन (4)
  • कथाकथी (4)
  • कागदाचा गणपती (1)
  • कागदी (1)
  • कुनीदेशातल्या कथा (2)
  • गणपती (1)
  • छान गोष्टी (12)
  • जपानी (1)
  • ढग (1)
  • थेंबाचा प्रवास (1)
  • निसर्गकथा (2)
  • पंचफलम् समर्पयामी (1)
  • पाऊस (2)
  • पाणी (1)
  • प्राणीकथा (1)
  • फळे (1)
  • फुलपाखरी आकाशकंदील (1)
  • फुलांच्या गोष्टी (2)
  • बटाटे (1)
  • बडबड कविता (4)
  • बालकथा (1)
  • भाषांतर (3)
  • मज्जाखेळ (1)
  • मराठी दिवस (1)
  • विज्ञान गोष्टी (4)
  • साकुरा (1)
  • सायुच्या गोष्टी (3)
  • हस्तकला (1)
  • हातमोजे (1)

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2020 (5)
    • ▼  April (3)
      • कथाकथी - प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वा...
      • सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग
      • कथाकथी - चिमण्या आणि डोंगर (Marathi Audio Book)
    • ►  March (2)
  • ►  2014 (2)
    • ►  July (1)
    • ►  February (1)
  • ►  2013 (3)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
  • ►  2012 (4)
    • ►  September (1)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
  • ►  2011 (2)
    • ►  June (2)
  • ►  2010 (19)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  September (4)
    • ►  August (1)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (1)
  • ►  2009 (1)
    • ►  February (1)

Followers

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments

Search This Blog

 
Copyright 2009 गंमत गोष्टी. Powered by Blogger.
Blogger Templates created by Deluxe Templates
WP Themes by Wpthemesfree