Monday, July 26, 2010

तळ्यातले मित्र

मागे एकदा मुलीच्या डेकेअर मध्ये एका मुलाने तलावातून काही बेडकाची डीम्भ आणली होती. मग त्यांच्या शिक्षकेने आणि मुलांनी ती पाळली, अगदी बेडूक होऊन पळून जाई पर्यंत. बेडकाच्या वेगवेगळ्या अवस्था मुलाना आणि मला पण सहज बघायला मिळाल्या. त्यानाच इथे गोष्टीरूप दिलंय
*************

एक होत छोटस तळ. हिरव्यागार रंगाच्या पाण्याच , चहूबाजूला गर्द झाडी असणारं. त्या तळ्यात होती इवलाली लाल कमळे. आणि पाण्यात खालीसुध्दा खूपखूप पाण  वनस्पती होत्या.
अशाच एका पाण्यातल्या पानाला एक अगदी चिमुकलं अंड चिकटलं होत, पारदर्शक आणि आणि आत एक चिमुकला केशरी बिंदु. आणि त्याच्या जवळच्या दुसऱ्या पानाला अजून एक अंड होत, तेही पारदर्शक पण आतला बिंदु होता काळा.  आता बऱ्याच वेळ एकमेकांच्या बाजूला राहिल्याने त्या अंड्याच्या आतल्या केशरी बिंदु ने शेजाऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

"अरे तू कोण होणार आहेस रे अंड्यातून बाहेर आल्यावर?"
काळा बिंदु म्हणाला, "उम्म्म खरतर मला माहीतच नाहीये."

"मला वाटत तू पण माझ्या सारखा मासा होणार , काळा मासा. मी केशरी मासा तू काळा मासा आपण दोघ मिळून खूप खूप खेळू मग."  केशरी बिंदुने सांगितलेली कल्पना काळ्या बिंदुला पण अगदी पटली.

"आपण एकमेकाला काय हाक मारुयात रे?" काळ्या बिंदुने विचारलं

"ह्म्म्म मी तुला चिका म्हणू?" केशरी बिंदुने नाव सुचवले.

"बर, मग मी तुला म्हणणार पिका."
"मी चिका आणि तू पिका
दोघे मिळून करू खूप खूप मजा"
काळ्या बिंदुने लगेच कविता पण केली

थोडे दिवसांनी या चिमुकल्या अंड्यातून इवले इवले शेपटीवाले जीव बाहेर आले.
पिका म्हणाला "बघ, आपल्या दोघांना शेपटी आहे ना? म्हणजे आपण मासेच. कित्ती छान दिसेल ना काळा मासा केशरी मासा एकत्र पोहोताना?"
थोडे दिवस असेच मजेत गेले. चिका आणि पिका दोघे कमळाच्या पानाखाली खेळत चिखलातले किडे खात आणि कमळाच्याच मुळात झोपी जात.

एक दिवस सकाळी उठल्या उठल्या पिका आला आपले नुकतेच फुटलेले नविन कल्ले दाखवायला. आणि बघतो तर काय चिका ला चक्क दोन पाय फुटलेले!
चिकापण विचारात पडला होता. 'अस कस काय झालं बर?'
तेवढ्यात पिका म्हणाला "तू ना आता माणूस बनणार आहेस. बघ तुला कसे माणसासारखे पाय फुटलेत ते."
चिका पिकाच्या भोवती गोल गोल फिरत म्हणाला "नाहीच मुळी बघ मी कसा छान पोहोतोय ते. मी किनई पायवाला मासा होणारे."
पिकाला हि ते पटल आणि ते दोघे आपले नवीन पाय आणि कल्ले वापरून अजून जोरात पोहायला लागले.

परत काही दिवसांनी बघाव तर पिकाचे कल्ले आणि पर मोठ्ठे छान होत आले होते चीकाला मात्र चक्क दोन हात फुटले होते. पिका खुपच दुख्खी होऊन चिकाला म्हणाला.
"चिका तू खरच माणूस होणार का रे? बघ ना आता तुला त्याच्यासारखे हातपण आले. तू माणूस झालास कि मला पकडशील का? नको ना रे पकडूस. मला इथेच तळ्यात राहायचंय."

चिकालाही जरा शंका यायला लागली होती. पण तस काही न दाखवता चिका परत एकदा जोरजोरात गोल गोल फिरला आणि म्हणाला "छे रे माणूस कित्ती मोठा असतो. मी बघ कित्ती चिमुकला. मी कसा एवढा मोठ्ठा होईन? आणि अजून मला शेपटी आहे, अजूनही मी पाण्यातच राहतो जमिनीवर जायला कुठे येणार आहे मला? मी आपला हातपायवाला मासा."
आपल्या हातांनी पिकाच्या पंखाना टाळी देऊन दोघ आपल्या किडे खायच्या उद्योगाला निघून गेले.

अजून काही दिवस गेले आणि पिका सुंदर केशरी,पांढरे पट्टेवाला मोठे मोठे पंखवाला मासा झाला होता. आणि चिकाचा काळा रंग जाऊन तो चक्क ठिपकेदार हिरवा झाला होता. त्याच शेपूट सुध्दा गायब झालं होतं.
मग मात्र पिका म्हणाला  "चिका तू नक्कीच मासा नाहीयेस अस मला वाटत. तुला हात पाय आहेत. खरतर पाण्यात पोहायला हात पाय नसले तरी चालत. म्हणजे तुला कदाचित जमिनीवरपण चालता येईल. बघतोस का प्रयत्न करून? अगदी तळ्याच्या काठावर कर म्हणजे नाहीच जमल, किंवा गुदमरलास तर तुला लग्गेच परत पाण्यात येता येईल."

चिकाला पण आता मोठ्ठी उडी मारायची इच्छा होत होती. पिकाच सांगण ऐकून बघाव अस त्यानेहि ठरवलं.
झालं दुसऱ्या दिवशी दोघे तळ्याच्या काठाजवळ गेले. चिकाने जोर लावून उडी मारली आणि काय आश्चर्य चिका चक्क जमिनीवर बसला होता. त्याला आजिबात गुदमरल्यासारख झालं नाही.स्वच्छ हवा , उबदार उन पाहून मजाच वाटली.
इथे पिका पाण्यातून पहात होताच. चिका ठीक असल्याच पाहून पिकाला पण बर वाटलं.

तेवढ्यात तलावाजवळ दोन लहान मुल आली आणि चिकाला बघून म्हणाली "अरे तो बघ पिल्लू बेडूक."  त्याच्या त्या आवाजाने चिका दचकला आणि परत पाण्यात पळाला.
तिथे पिकाचा पंख पकडून गोल गोल नाचत म्हणाला "अरे! मी बेडूक आहे. मासा नाही. आणि मला किनई पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे रहाता येत."

मग तेव्हापासून चिका कधी कधी जमिनीवर येतो, आणि परत पाण्यात जाऊन पिकाला जमिनीवरच्या गमतीजमती सांगतो.  आणि दोघे मिळून त्यांच गाण सुद्धा गातात.

"मी चिका आणि तू पिका
दोघे मिळून करू खूप खूप मजा"

Tuesday, July 20, 2010

वार्‍या वार्‍या ये ये

हि माझी कविता नाही,मुलीने सुचवलेली आहे.

काल शाळेतून तिला घेऊन घरी येताना फारच गरम होत होत. तिला चालवत नव्हत म्हणून जरा गम्मत करावी अस वाटून तिच्याबरोबर म्हणून चिमणी चिमणी वारा घाल , कावळ्या कावळ्या पाणी दे अस गाण म्हणत होते. मग त्यात जरा बदल करून नुसतच "वार्‍या वार्‍या ये ये " अस म्हणायला लागले.
तर तिने त्यात अजून एक वाक्य स्वत:च जोडलं. "आमचा घाम सुकव रे"!
मग आमची दोन वाक्याची कविताकच झाली.

"वार्‍या वार्‍या ये ये
आमचा घाम सुकव रे"

त्याला जरा आणखी रूप देण्यासाठी मी काही वाक्य टाकली आणि आम्ही दोघी रस्त्यातून उन्हात चालताना हि कविता म्हणायला लागलो. उन जरा सुसह्य झालं.

ढगा ढगा ये य्रे
सुर्योबाला लपव रे
ढगा ढगा ऐक रे
थोडी सावली कर रे

वार्‍या वार्‍या ये ये
आमचा घाम सुकव रे
वार्‍या वार्‍या ऐक रे
आमची गरमी घालव रे


चिमणी चिमणी वारा घाल , कावळ्या कावळ्या पाणी दे च्या चालीवर म्हणून बघा बर तुमची गरमी सुसह्य होतेय का ते.

Sunday, July 11, 2010

सशांची पिकनिक

दूरदूर पसरलेली हिरवीगार कुरणे. बाजूने  खळाळणारी नदी आणि नदीकाठची दाट झाडी. झाडांच्या शेंड्याशी खेळणारी डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्यदेवाची हळदुली किरणं. अशी सुंदर सकाळ होती इथली. अशा या हिरव्या कुरणावर सगळीकडे पांढरे शुभ्र गुबगुबीत ससे टणाटण उड्या मारीत होते. मऊमऊ लुसलुशीत गवत चटाचटा खात होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाने गवत सुद्धा हळदुलं झाल होतं. आणि अशा गवतात आणखी काही चिमुकले पाय दुडदुडत होते.कोण बर हि लाल लाल गोबऱ्या गालांची? अरेच्च्या बरोब्बर. हि तर आपल्या कुनीदेशातली चिमुकली मुलं. गोबऱ्या गोबऱ्या सशांच्या मागे धावणारी गोबरी गोबरी मुलं. सशांशी पकडा पकडी खेळताना मधूनच एखादा ससा हातात आला कि त्याला कुरावाळायची. मग ससा सुद्धा आपल्या लालचुट्टुक डोळ्यांनी लुकलुकत बघायचा त्यांना. आपल्या मऊ ओलसर गुलाबी नाकाने हुंगायचा. मग आपल्या पुढच्या पायांनी हळूच गुदगुल्या केल्या कि मुल सशाला सोडून देऊन हसत बसायची. थोड्यावेळाने ससे नदीजवळ जायचे पाणी प्यायला आणि आंघोळ करायला. मग मुलंसुद्धा त्याच्यामागे जायची. नदीकाठच्या गर्द झाडामधुन गवतावर सांडणाऱ्या उन्हाशी सावलीचा खेळ खेळत बसायची. मध्येच काका , बाबा म्हणजे आई, आज्जीने हाक मारली कि धुम्म पळत घरी यायचे. आणि ससे मग झाडांच्या सावलीत बसून गाढ झोपायचे, अगदी ससाकासवाच्या गोष्टीसारखे.

त्यादिवशी मात्र सगळे ससे झोपलेच नाहीत दुपारी. दुपारभर त्यांची सभा चालू होती, विषय अगदी खासच होता तो म्हणजे उद्याची पौर्णिमा. त्या पौर्णिमेला आपण म्हणतो कोजागिरी पौर्णिमा. कुनिदेशात पण साजरी करतात बर हि नाकाआकी नावाने. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. कुनिदेशात तर तो इतका जवळ येतो कि यामापर्वतावरून उंच उडी मारली कि थेट चंद्रावरच पोचता येतं. हा यामा पर्वत म्हणजे कुनिदेशातला सगळ्यात उंच पर्वत बर का. तर हे सगळे ससे दरवर्षीप्रमाणे चंद्रावरच्या पिकनिकची चर्चा करत होते. कोणी काय करायचे, कुठे कुठे जायचे, कोणते खेळ खेळायचे हे सगळ ठरवत होते. तस चांदणंतलावाजवळ जायचं नक्कीच होतं म्हणा. या चांदणंतलावातल्या चंदेरी पाण्यात छानपैकी आंघोळ केली ना कि सशांचा पांढरा रंग उजळून जायचा. वर्षभरात कुठे काही डागबिग पडले असतील ते निघून ससे चांदीसारखे शुभ्र व्हायचे म्हणे. त्यामुळे तलावातून निघाल्यावर पुढे काय काय करायचं ते ठरवून झालं. पिकनिकला निघण्यासाठीची वेळ आणि ठिकाण पण ठरवून झालं.

दुसरा दिवस फारच धावपळीत गेला. सकाळी खेळायला आलेल्या मुलांशी खेळायला पण सशांना वेळच नव्हता. मुल आपली हिरमुसली होऊन निघून गेली. पण त्यांना सुद्धा माहीत होतं सशांच्या पिकनिकबद्दल. आणि असहि चंद्रावर जाणाऱ्या सशांना बघायला मुलपण यामापर्वताजवळ जाणारच होती.

जसजशी  संध्याकाळ व्हायला लागली तसतसे ससे हळूहळू यामापर्वताच्या पायथ्याशी जमू लागले. त्यांना बघायला सगळे लोकं पण जमले. सगळे ससे जमल्यावर मुख्य सशाने शिट्टी वाजवली आणि सगळे ससे भराभरा पर्वतावर चढायला लागले. एक पांढराशुभ्र प्रवाहच डोंगर चढतोय कि काय अस वाटायला लागलं. चंद्रोदय व्हायच्या आधी सशांना पर्वतशिखरावर पोहोचायच होतं त्यामुळे कोणाशीच न बोलता सगळे टणाटणा चढत होते. शिखरावर पोचल्यावर अतीव उत्साहाने सगळेजण चंद्राची वाट बघायला लागले. इथे खाली जमलेले लोकं सुद्धा कधी चंद्र उगवेतोय याचीच वाट बघत होते.  हळूहळू क्षितिजावर चंदेरी पिवळट प्रकाश पसरला. एक बारीकशी चंदेरी कडहि दिसू लागली. सशांचा आनंद गगनात मावेना. ते आगदी सरसावून बसले. होताहोता चान्दोबा आकाशात अर्धा उगवला.  मुलांनी  सशांना हात हलवून टाटा केलं ,   सशांनीहि मुलांना टाटा करून उंच उड्या मारायला सुरुवात केली. मोठे मोठे ससे एका उडीतच पोचले चंद्रावर, मग त्यांनी छोट्यांचे हात धरून त्यांनाही घेतले वर ओढून. हळू हळू सगळे ससे चंद्रावर पोचले आणि चंद्र आकाशात वरवर जायला लागला. हा अपूर्व सोहोळा कुनिदेशातली मुलं माणसे भान हरपून बघत होती. सगळे ससे पोचल्यावर इथे खाली माणसांच्या  उत्साहालापण उधाण आलं. सगळे नाकाअकी नाकाअकी त्सुकि त्सुकि असा घोष करून नाच गाण्यात मग्न झाले. आता रात्रभर ते चंद्र आणि सशांचीच गाणी म्हणणार होते.

इकडे सगळे ससे अगदी ठरल्याप्रमाणे  चांदणंतलावाजवळ आले. चांदणंदेवाची प्रार्थना करून आधी शॉवरने अंग स्वच्छ करून एकेकजण तलावात डुबकी घेऊ लागले. डुबकी घेऊन बाहेर आलेले ससे एका वेगळ्याच तेजाने चमकत होते. अशी सगळ्याची आंघोळ झाल्यावर मग सगळे ससे बागेतल्या खेळाकडे वळले. चंदेरी झाडावर लावलेले झोपाळे, चांदीच्या घसरगुंड्या बघून किती खेळू आणि किती नको अस झाल होतं सशांना. चमचमणाऱ्या झोपळ्यावरून आकाशात उंच उंच झोके घेण्याची मजा काही औरच होती. उनाड सशांनी आपली पाळी येईपर्यंत रांग न लावता मध्ये घुसाघुशी सुद्धा केली. मोठ्या सशांनी येऊन भांडण सोडवली म्हणून नाहीतर रडारडीच झाली असती. चांदीच्या मोठ्या मोठ्या गोलगोल वळणांच्या घसरगुंडीवरून जाताना छोट्यांची आधी अगदी घाबरगुंडीच उडाली होती. पण शेवटी धुप्प्कन पाण्यात पडताना आलेली मजा पाहून त्यांची भिती कुठ्ल्याकुठे पळून गेली. काही काही सशांनी तर चक्क बोटिंग पण केलं. वितळलेल्या चांदीसारख्या पाण्यात बोट वल्हवताना मस्त मजा करुन घेतली. आता एवढ खेळल्यावर पोटात भुकेच्या चिमण्या चिवाचीवायला लागल्या.               

आणि मग सगळ्यांनी चंदेरी लवलवणाऱ्या गवताच्या कुरणाकडे आपला मोर्चा वळवला. काहींनी गाजरांच्या बागेतच धाव घेतली. कुरकुरीत गोडगोड गाजरं, आणि मऊमऊ गवत चटाचटा पोटात जायला लागल. खाऊन पोट भरल्यावर तिथल्याच झाडांखाली सगळे ससे आळसावले. गप्पा मारत मारत पेंगुळले. काही पिल्लं मात्र परत आपली बागेत जाऊन खेळायला लागली. हळूहळू सकाळ व्हायला लागली होती. चंद्र मावळायचा वेळ जवळ यायला लागला.  खरतर चंद्र मावळायला येईल तेव्हा परत सगळ्यांना यामापर्वतावर उड्या मारायच्या होत्या. पण ससे अजून झोपाळलेलेच होते. आणी अचानक मुख्य सशाच्या लक्षात आल कि आता निघायलाच हव. तस मुख्य सशाने परत एकदा घाईघाईने शिट्टी वाजवून सगळ्यांना परत एकाजागी बोलावले. . तेवढ्यात चंद्र आलाच जवळ आलाच होता. पटापट सगळ्यांनी खाली उड्या मारल्या. काहीकाही ससे तर धुप्प्कन पडलेच खाली. काहीकाही अजून झोपेत असलेल्यांना खालीच ढकलून दिलं मोठ्या सशांनी. एवढ्या घाईत कोणाच्याच एक गोष्ट लक्षात आली नव्हती. ती म्हणजे अजून एक पिटुकली ससुली बागेत खेळता खेळता तिथेच झोपली होती. खाली उतरताना झालेल्या घाईत तिच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते. चंद्र आपला मावळून पण गेला. जमिनीवरची नाचणारी लोकं पण घरी गेली.

जमिनीवर परत आल्यावर सशांना कळली आपली चुक. पण आता फारच उशीर झाला होता. चंद्र मावळायाच्या आत जमिनीवर परतायचं हि चांदोबाची अट होती. आणि जर परत नाही आलं जमिनीवर तर चांदोबा त्या सशाला ठेवून घेणार होता खेळायला. अजिबात जमिनीवर जायला देणार नव्हता. फक्त एक मात्र होतं, जर राहिलेला ससा खुपच छोटा असेल तर त्याच्या आई बाबांना पण चंद्रावर जायला मिळणार होते. हि राहिलेली ससुली अगदीच पिटुकली होती. चंद्र मावळल्यावर थोड्याच वेळात ती जागी झाली आणि आजुबाजुला कोणीच नाही अस बघून रडायला लागली. मग चंद्राला वाईट वाटलं आणि लगेच त्याने चंद्रकिरणांची एक लांब दोरी सोडून ससुलीच्या आईबाबांना पण तिथे बोलवून घेतलं. मग तेव्हापासून ससुली आणि तिचे आईबाबा चंद्रावरच रहातात.

दुसऱ्यादिवशी जेव्हा चंद्र परत उगवला तेव्हा लोकांना चंद्रावर एक गम्मतच दिसली. पिटुकली ससुली हात दाखवून सगळ्याना टाटा करत होती.
तुम्हाला कधी केलाय का हो ससुलीने असा चंद्रावरून टाटा?

Thursday, July 1, 2010

सुर्योबाचा रुसवा

सुर्योबा रुसले आणि लपूनच बसले
ढगांच्या उशीत डोके खुपसून रडले
उशीचा कापूस भिजला फार
थांबेचना मग पावसाची धार

आवडतात तुम्हाला चांदोबाच्याच गोष्टी
चांदोबाच्या कविता आणि त्याचीच गाणी
मी रोज रोज येतो कधी हसता का?
मला हात हलवून हॅलो तरी म्हणता का?

म्हणाले आता येणारच नाही.
छान छान इंद्रधनु दाखवणारच नाही.
सोनेरी ढगपण दिसणारच नाहीत.
सूर्यास्त सुद्धा असणारच नाही.

नको रे सुर्योबा रागावू असा,
हा घे तुला खाऊ देते माझा.
आतातरी गट्टी करशील ना?
ढगातून बाहेर येशील ना?