Story - Swapnali Mathkar ©
Narration - Adv. Madhavi Naik
Background Music & Editing - Spruha Sahoo
कथा - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू
निसर्गकथा : स्पृहतारका
एक होतं घनदाट जंगल. गर्द हिरव्या दाट झाडांचं. जंगलातून जायला रस्ते सुद्धा नव्हते. सगळीकडे खूप झाडं, झुडपं आणि दाट गवत होतं.
अशा जंगलात एक छोटुकलं घर होतं. या घरात राहायची एक छोटी मुलगी 'किन्ना' आणि तिचे आईबाबा. बाबा जंगलातल्या एका छोट्या माळावर शेती करत. बाबा शेतीवर गेले आणि आई घरकामात असली की ही छोटी किन्ना आसपास हुंदडत राही. तिला मित्रमैत्रिणी नव्हतेच. मग ती आपली जंगलातले असे हरीण, पक्षी यांच्याशी गप्पा मारी. त्यांच्या बरोबरीने धावाधाव करी.
एकदा किन्नाच्या आईने किन्नाला सांगितलं "किन्ना, जंगलात जाऊन करवंद आणि बोरं मिळतात का बघून ये बरं जरा. "
जंगलात फिरायचं म्हणजे किन्नाचं आवडीचे काम. आई पुढे म्हणाली सुद्धा की "अगं नीट बघून जा. आणि उशीर करू नकोस बरं का."
पण हे ऐकायला किन्ना जाग्यावर असली तर ना! ती केव्हाच परडी घेऊन धावत निघाली होती.
पुढे जाताजाता किन्नाला करवंदाच्या जाळया दिसल्या. पण तिथली करवंद आधीच संपली होती. म्हणून मग करवंदाच्या शोधात किन्ना पुढे पुढे चालत राहिली.
असे चालता चालता संध्याकाळ झाली पण ते किन्नाच्या लक्षातच आले नाही. अगदी अंधार पडून दिसेनासे व्हायला लागले तेव्हा मात्र ती भानावर आली. पण आता पहावे तिथे मिट्ट अंधार. काही म्हणता काही दिसेना. किन्ना खरतर थोडी घाबरलीच. आता घरी कसं जाणार, आई किती वाट बघेल याची काळजी वाटायला लागली.
तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकायला येऊ लागला. किन्ना घाबरून झाडामागे दडून पहायला लागली. हळूहळू पावलांचा आवाज किन्नाच्या अगदी जवळ यायला लागला. बघते तर काय! एक काळा चांदण्याच्या टिकल्या टिकल्यांचा फ्रॉक घातलेली मुलगी झपाझप चालत येत होती. तिच्या खांद्यावर एक छोटे, फुलपाखरे पकडण्याचे जाळे होते.
मुलीला पाहून किन्नाला धीर आला आणि तिने धावत जाऊन मुलीला गाठलं. असं अचानक कुणीतरी समोर आलेलं पाहून ती काळा फ्रॉकवाली खूपच दचकली.
"कोण गं तू?, आणि इतक्या रात्री काय करतेयस इथे?" दचकून काळा फ्रॉकवालीने विचारलं.
तसे किन्नाने लगेच आपण कसे चुकून जंगलात राहिलो ते सांगितलं. आणि काळा फ्रॉकवालीला उलट प्रश्न केला "पण तू कोण आहेस? आणि इतक्या रात्री जाळं घेऊन कुठे जातेयस?"
तशी काळा फ्रॉकवाली गोड हसली "मी एक परी. तिथे पुढे डोंगराजवळ एक मोठ्ठा तलाव आहे ना, तिथे जातेय. "
किन्नाला गंमतच वाटली.
"परी!! आणि चक्क मला भेटतेय? वा! पण तू इतक्या रात्री कशाला जातेयस त्या तलावाजवळ? मलातर आईने सांगितलंय कि तिथे अज्जिबात जायचं नाही. "
किन्नाचा धीट पणा पाहून परी म्हणाली "चल माझ्याबरोबर. मी गम्मत दाखवते तुला. पण पटापट चल हां. आधीच तुझ्याशी बोलण्यात उशीर झालाय मला "
तशी किन्ना परीबरोबर पटापटा चालायला लागली. होता होता त्या तळ्याजवळ पोचल्या. तिथल्या एका दगडावर परी बसली. आणि आकाशाकडे बघत राहिली.
किन्नाला खरेतर कळेचना की परी करतेय काय! ती परीला काही विचारणार तोच आकाशातून एक चांदणी झुम्मकन आली आणि चक्क तळ्यातच पडली. त्याबरोबर परीने घाईने आपलं जाळं टाकल आणि चांदणीला बाहेर काढलं. ती इवल्या इवल्या पंखांची भिजलेली चांदणी परीचे आभार मानत एका झाडावर जाऊन बसली.
किन्नाला खूपच आश्चर्य वाटलं. पण पुन्हा एकदा ती काहीतरी विचारायला गेली आणि आधीसारखेच झाले. झालं! अजून एक चांदणी झाडावर बसली. थोड्याच वेळात झाडावर बऱ्याच चांदण्या गोळा झाल्या आणि झाड प्रकाशाने चमचमायला लागलं.
मध्ये थोडासा वेळ मिळाल्यावर परी म्हणाली 'अगं, या स्पृहतारका म्हणजे इच्छा चांदण्या! या इच्छा चांदण्या आकाशातून पडतात ना तेव्हा मागितलेल्या इच्छा नक्की पूर्ण होतात. म्हणुन या चांदण्या पडताना दिसल्या की जगातली मुलं मनातल्या मनात आपली इच्छा मागतात. या चांदण्या विझण्याआधी मुलांची इच्छा पूर्ण करतात. पण कधी कधी मात्र या स्पृहतारका अशा चुकून पाण्यात पडतात. त्यांना लगेच बाहेर काढावे लागते. म्हणुन माझ्या सारख्या पऱ्या रोज रात्री इथे बसून पडणाऱ्या स्पृहतारकांना बाहेर काढतात. आता त्या थोड्यावेळ स्पृहतारका वृक्षावर आराम करतील आणि त्यांच्याकडे मागितलेल्या इच्छा पूर्ण करून मग विझून जातील. आता पुढच्या वेळी स्पृहतारका पडली ना, की तू तुला काय हवं ते माग बरं का! '
आपण काय बरं मागावं असा किन्ना विचार करत असतानाच आकाशातून एक स्पृहतारका खाली आली ती थेट पाण्यातच! तिच्याकडे बघता बघता किन्नाने मनोमन प्रार्थना केली की 'मला आत्ताच्या आत्ता घरी जाऊन आईच्या कुशीत झोपायचेय'. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे किन्नाला जाग आली ती थेट आईच्या कुशीतच!
#बालकथा
#गंमतगोष्टी
#कथाकथन
#कथाकथी
#ऐका
#कथाऐका
#ऑडियोकथा
#ऑडियोबुक
#ऑडियोब्लॉग
#marathiaudiobook
#marathikadha
#marathichildrenbook
#audioblog
#audiobook
#listenstories
#kathaaAika
#बालकथा
#गंमतगोष्टी
#कथाकथन
#कथाकथी
#ऐका
#कथाऐका
#ऑडियोकथा
#ऑडियोबुक
#ऑडियोब्लॉग
#marathiaudiobook
#marathikadha
#marathichildrenbook
#audioblog
#audiobook
#listenstories
#kathaaAika
12 comments:
व्वा खूप छान अगदी बालपणात घेऊन गेली हि गोष्ट आजच मी माझ्या नातवाला ऐकविली पण का जाणे कोणास ठाऊक तो यात रमला नाही आजचा आणि आपल्या काळात एवढा कसा फरक पडला हे समजेना ही आजची मुले कार्टून मधल्या आभासी जगातच रमताना दिसतात कालाय तस्मै नमः दूसरे काय असो पण ही गोष्ट सादर करून स्पृहा स्वप्नाली आणि माधवी ताई खुप छान आहे हे
खुपच छान.. परीच्या दुनियेत बालपण मस्तच गेल.. आता वरी हरी करी तर्री च्या दुनियेत पिचतयं.. छान प्रयत्न 👍🏼
वाह-वा स्वप्नाली/माधवी/स्पृहा/संजय.
खूपच छान प्रयास आहे. ऐकताना खूप छान वाटत होतं, व त्याच्या भरीला सोबत कथावाचन सुद्धा, म्हणजे खरंच अप्रतीम कल्पना आहे. मुलांना कथेचा आनंद घेता-घेता वाचनाची सुद्धा सवय व परिणामाने गोडी नक्कीच लागेल. तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, आणि हा प्रयास पुढे चालू ठेवून त्यातून पूर्ण टीमला यशोकीर्ती लाभोत हीच माझी सदीच्छा....<<>>
सुधीर धर्माधिकारी , धन्यवाद.
मुलांना नेहेमी ऐकायला, वाचायला मिळाल्या तर आवडतीलही या कथा. प्रयत्न करत रहायचं.
नितीन गर्गे , धन्यवाद.
रश्मिन् भागवत , धन्यवाद.
मुलांना अशा कथा वाचायला आणि ऐकायला मिळाव्या असा आमचाही प्रयत्न राहील.
अरे वाह👌👌 क्या बात है....मी आणि माझ्या मुलांनी enjoy केली गोष्ट. Narration खूपच छान केलंय. नेहमी ऐकायला आवडतील
खूप छान कथा आणि सादरीकरण .
खूप छान!हा अविष्कार असाच चालत राहावा.नवनवीन गोष्टी छोट्या मुलांसाठी आपल्याकडून येत राहाव्यात.
खूप च सुंदर कथा आणि सदारीकर आमच्या मुलांसाठी असेच कथा पाठवत राहा.सदिच्छा तुम्हाला🙏
खूपच छान.मी व माझ्या मूलीनी खूप enjoy केली गोष्ट.खूप छान अविष्कार आहे.असाच चालू राहू दे.narration खूपच छान आहे. खूप खूप सदिच्छा
स्नप्नालीॆ/माधवी,
खूपच छान..हार्दिक अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा..!
अरूण करमरकर
व्वा.....खूपच छान .
लेखन,आवाज, background music सगळं एकदम मस्त ...अगदी जिवंत दृश्य समोर उभे राहीले.
ग्रेट स्वप्नाली, माधवीताई, आणि स्पृहा.:)
Thank you Anjali Dhobale, Arun ji, Pravin, Dipali and everyone else.
Post a Comment