skip to main | skip to sidebar

गंमत गोष्टी

कुनिदेशात गोष्टी वाचण्याआधी लहान मुलं एक छान गाणं म्हणतात. याचा अर्थ आहे सगळे मिळून शांततेने मजेदार गोष्ट ऐकुयात. चला तर मग आपण पण गाणं म्हणून वाचायला सुरुवात करू.
कामीशिबाई कामीशिबाई
पाची पाची पाची पाची उरेशिई कामीशिबाई
श् श् श् श् ....शिझुकानी किकीमाश्यो.

Saturday, November 20, 2010

थेंबाचा प्रवास

 सगळ्या गोष्टीमध्ये असत ना तसच एक जंगल होत. पण हे जंगल मात्र अगदी खर खर होत बर का. छान छान उंच डोंगर , दाट हिरवी झाडे, झाडांवरेच पक्षी असा सगळ सगळ खर.


अशा डोंगरात होती एक गुहा. मोठ्ठी अंधारलेली दगडाची गुहा. आणि गुहेत अगदी काळामीटट अंधार होता आणि जमिनीखालच्या झऱ्यातून येणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांनी गुहेतले खड्डे सगळे पाण्याने भरून गेले होते. अचानक एक पिटुकला थेंब आला जमिनीतून वरती.आधी गुहेतला अंधार पाहून घाबरुनच गेला. गुहेतल्या थंडीने कुडकुडायला लागला. पण थोड्या वेळाने त्याला आजूबाजूला नीट दिसायला लागलं आणि त्याच्यासारखेच अजुन अनेक पाण्याचे थेंब सुद्धा दिसायला लागले. असे बरेच मित्र पाहून त्याला जरा हायस वाटलं.

असा खूप वेळ गेला आणि त्या थेंबटल्याला कंटाळा आला. कितीवेळ अस शांत बसून राहायचं ? मला खेळायचं , फिरायचं ना! थेंब जोरात ओरडला पण त्याचा आवाज कुणाला ऐकूच गेला नाही. पण हळू हळू थेंब असलेल्या खड्ड्यात पाणी वाढत होते. ते पाहूनही त्याला बारा वाटत होते. तेवढेच जास्त मित्र जवळपास.

इतक्यात तो खड्डा पूर्ण भरला आणि पाणी वाहायला लागले सगळे थेंब बाहेर आधी वाहून जायला मस्ती करायला लागले. हा थेंबटला पण लग्गेच बाहेर पडला. आणि पाण्याबरोबर वाहायला लागला. वॉव काय मजा येतेय ना खेळायला अस म्हणत मस्त इकडे तिकडे हुंदडायला लागला. वाहातं पाणी गुहेच्या बाहेर आलं आणि बाहेरच्या प्रकाशाने थेंबाचे डोळेच दिपले. केवढा हा प्रकाश! पण काय छान वाटतंय ना, कित्ती उबदार आहे इथे अस आपल्या मित्रांशी बोलत अजून मस्ती करायला लागला.

पण अरेच्च्या हे काय? आता गुहेतून बाहेर आलेल पाणी बाहेरच्या मोठ्ठ्या डोहात थांबले. थेंब जरासा हिरमुसला पण म्हणाला जाउदे इथे निदान प्रकाश आहे छान उबदार वाटतंय आणि बाहेर बघायला तर कित्ती काय काय आहे.

त्या डोहात पाय घालून बसल होत एक झाड. थेंब म्हणाला अरेच्या तुम्ही कोण बर? मी पाण्याचा थेंब, आत्ताच त्या गुहेतून बाहेर आलो. तुम्ही माझ्याशी गप्पा माराल का?
झाड म्हणाल हो तर. मला पण आवडेल गप्पा मारायला. आणि हो मला म्हणतात झाड , वडाच झाड.
थेंब एकदम खुशीत येऊन म्हणाला मी इथे डोहात आहेना त्यामुळे दूरच काही दिसत नाहीये . तुम्ही कित्ती वर आहात, मला छान छान गोष्टी सांगा ना.
झाडाने मग थेंबाला आकाशाच्या , डोंगराच्या गोष्टी सांगितल्या.
इतक्यात झाडावरून चिमुकलं रंगीत कोणीतरी उडालं. थेंब म्हणाला,कोण आहे ते छोटछोट? रंगीत?
चिमुकली चिमणी म्हणाली चिव चिव मी रंगीत चिमणी. आकाशात उडते.
ओहो कित्ती छान चिमणे! तू पण सांग ना मला दूरदूरच्या गोष्टी.
मग चिमणीने थेंबाला नदीची , धबधब्याची गोष्ट सांगितली.
असे काही दिवस गेले चिमणी आणि झाड रोज थेंबाला छान छान नवनवीन गोष्टी सांगायचे. मग थेंबाला वाटायचे आपण कधी जाणार हे सगळ बघायला. त्याला डोहात रहायचा अगदी कंटाळा आला.

तेवढ्यात परत एक गम्मत झाली तो डोह भरला पाण्याने आणि पाणी बाहेर वाहायला लागले. पुन्हा एकदा सगळे थेंब बाहेर आधी वाहून जायला मस्ती करायला लागले.

या थेंबटला झाडाला आणि चिमणीला म्हणाला मी पण जरा जाऊन बघतो, पण परत येईन हं मी , आणि मग तुम्हाला गम्मत जम्मत सांगेन. टाटा करून थेंब निघाला आणी त्याला थोडावेळ सोबत करायला चिमणीपण उडू लागली.

खळखळ आवाज करत नदी वाहायला लागली. थेंबालापण प्रवाहाबरोबर खडकांवरून उड्या मारायला, मस्ती करायला मस्त वाटत होत.नदीच्या आवाजात आवाज मिसळून गाण म्हणायला सुद्धा मज्जा वाटत होती.
इतक्यात चिमणी सांगत आली अरे थेम्बा पुढे ना धबधबा आहे. आता काय करणार रे तू?
थेंब म्हणाला असुदे ग,तू घाबरू नकोस . मी पण वाहत जाऊन बघेन काय होत ते.
तेवढ्यात आलाच धबधबा. थेंब मात्र त्याच्या मित्रांबरोबर तसाच वाहात पुढे गेला आणी पाण्याने धबधब्याच्या कड्यावरून जोरात खाली उडी घेतली. प्रचंड जोरात आवाज करत पाणी खालच्या डोहात पडले आणी त्याबरोबर तो थेंब सुद्धा.
खूप वेळा पाण्यात वर खाली झाल्यावर एकदाचा तो परत पोहायला लागला.
चिमणी काळजीने वाट पहातच होती खाली.
बाप रे कित्ती मोठठा होता नाही हा धबधबा!
आधी जराशी भीतीच वाटली ग चिमणे , पण नंतर बाहेर आल्यावर छान वाटलं.
थेंब प्रवाहात आलेला बघून चिमणीला हायस वाटलं.
मग रात्र व्हायला लागली तशी चिमणी म्हणाली आता परत जायला पाहिजे मला. नाहीतर अंधारात रस्ता सापडणार नाही.
थेंबाला टाटा करून चिमणी परत गेली आणी थेंब तसाच पुढे पुढे जात राहिला.

नवनवीन जंगल , नवनवीन प्राणी बघून अगदी हरखून गेला.
आता त्याला मोठ मोठे मासे भेटले पाण्यातच. मासे म्हणाले आम्ही समुद्रपण पाहिलाय. खुपच मोठ्ठा असतो तो. ही आपली नदी समुद्रातच जाणारे बर वाहत वाहत.
हे ऐकून थेंबाला कधी एकदा समुद्रात जातो अस झालं.

हळू हळू नदीच पाणी खारट झालं , थेंब सुद्धा खारट झाला आणी मग अचानक प्रचंड मोठ्या समुद्रात थेंबाने प्रवेश केला.
एवढ्या मोठ्ठ्या समुद्रातले रंगीत , मोठमोठाले मासे पाहून , शिंपले आणी रंगीत वनस्पती पाहून पुन्हा एकदा तो अगदी हरखून गेला. अगदी किती पाहू आणी किती नको अस झालं त्याला.
वरच्या लाटांमध्ये खेळताना , मोठी मोठी जहाज पण दिसायची त्याला. तो विचार करायचा काय बर असेल तिथे जहाजावर ? काय बर करत असतील माणसे ?

अचानक एके दिवशी खूप म्हणजे अगदी खुपच गरम झालं. आणी आश्चर्यच झालं, थेंबाची झाली वाफ आणी आकाशात उडायला लागली. थेंबटला काय, खुपच खुश झाला. आकाशात उडता उडता त्याला खूप पक्षी दिसले , विमानं दिसली, मऊमऊ कापसासारखे ढग दिसले. आकाशातून उडताना जमीनसुद्धा दिसली. काय सुंदर देखावा आहे हा अस म्हणत थेंब वाफ होऊन उंच उंच उडत होता. तिथे मात्र जरा थंड वाटायला लागल होत. आणी त्याला जरा दमायला पण झालं होत. म्हणून तो एका काळ्या राखाडी ढगावर बसला . बघतो तर काय तिथे त्याच्यासारखे बरेच थेंब आधीच थांबले होते. वाऱ्याने तो ढग सुद्धा पुढे पुढे जायला लागला आणी थेंबांना अगदी विमानात बसल्या सारख वाटायला लागलं.

बघता बघता असे खूप काळे राखाडी ढग एकत्र जमले आणी अजून वर वर उडायला लागले. वर वर गेल्यावर मात्र खुपच थंडी वाढली. थेंबांच परत पाणीच झालं आणी जमिनीवर पडायला लागलं. अरेच्च्या आपण पाउस झालो कि काय? सगळे थेंब आश्चर्याने म्हणायला लागले आणी आनंदाने परत जमिनीवर टपटप पडायला लागले.
जमिनीवर पाण्याचे खूप खूप ओघळ खळखळा वाहायला लागले. हा थेंब सुद्धा त्यातल्या एका ओघळातून खळखळा उड्या मारत डोंगर उतरायला लागला.

परत एकदा त्याला तोच पाण्याचा डोह दिसला जिथून त्याने सुरुवात केली होती. त्या डोहात आनंदाने उडी घेऊन वाहात वहात परत आपला वडाच्या झाडाकडे आला.
त्याला पाहून झाड आणि चिमणी दोघेही खूप आनंदले.
आता मात्र थेंबच त्यांना समुद्राच्या , आकाशाच्या , ढगांच्या गोष्टी सांगत परत एकदा प्रवास करायची वाट बघतोय.
Posted by Swapnali Mathkar at 7:33 PM 0 comments
Labels: छान गोष्टी, ढग, थेंबाचा प्रवास, पाऊस, पाणी, विज्ञान गोष्टी

Tuesday, November 9, 2010

२०१०च्या दिवाळी अंकातले माझे लेख आणि फोटो

मायबोली.कॉम या वेबसाईटचा २०१०चा ऑनलाईन दिवाळी अंक नुकताच प्रकाशित  झाला.
या दिवाळी अंकात माझा शरद, हेमंत ऋतूवर (ऑटम् सिझन) लिहिलेला "रंगवूनी आसमंत" हा फोटो फिचर असलेला लेख प्रकाशित झाला आहे.
इथे लिंक आहे http://vishesh.maayboli.com/node/766

याच दिवाळी अंकामध्ये "थेंबाचा प्रवास" ही मी लिहिलेली बालकथा सुद्धा प्रकाशित झाली आहे.
इथे लिंक आहे http://vishesh.maayboli.com/node/761

मोगरा फुलला चा २०१०चा दिवाळी अंकही नुकताच प्रकाशित झाला आहे. या अंकामधल्या एका कवितेसाठी मी काढलेला फोटो पूर्व परवानगीने वापरण्यात आला आहे. (कविता माझी नाही.)
कविता आणि फोटो इथे बघता येतील.
http://mfdiwaliank.blogspot.com/2010/09/shashwat.html


वाचून प्रतिसाद द्यायला विसरू नका.
Posted by Swapnali Mathkar at 5:46 PM 0 comments
Labels: २०१० दिवाळी अंक

Monday, September 27, 2010

रंगीत लहानपण

मायबोली वरच्या कथाबीज साठी लिहिलेली ही कथा.

मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, आईस्क्रीम
****************************

"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.


"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."

भैरू बाजाराच्या दिवशी आपलं गाठोडं घेऊन जायचा कापडाचं दुकान लावायला.एरवी अशीच इकडची तिकडची, जमलच तर कुणाच्या शेताची कामं करायचा. पोराला बुकं शिकवून लई मोटा करायचं स्वप्न त्याचं. सम्या आता पारावरच्या शाळेत ३रीच्या वर्गात जायचा, पण सुट्टीच्या दिवशी बाबाबरोबर बाजाराला जायला लागायचंच त्याला. मग त्या दिवशी खेळायला मिळायचं नाही म्हणून त्याला अज्जिबात आवडायचं नाही. भैरुलाही ते माहीत होतं पण इलाज नव्हता. तेवढीच मदत होती हाताशी. आणि आजतर तालुक्याचा मोठा बाजार होता.

भराभरा चालत दोघे बाजाराच्या ठिकाणी पोचले तर चांगल्या जागा आधीच सगळ्या ठेल्यावाल्यांनी पटकावल्या होत्या. आता उरलेल्या जागेतली बऱ्यापैकी जागा निवडून भैरूने चादर पसरून कापडं नीट मांडून ठेवायला सुरुवात केली. अजून गिऱ्हाईकं यायला वेळ होता म्हणून सम्या इकडे तिकडे बघत बसला. आजची जागा नेहेमीची नसल्याने समोर सगळे नवीन गाठोडीवाले होते. त्यामुळे सम्याला लई मजा वाटत होती. तेवढ्यात सम्याच्या समोरची जागा एका मोठ्या हातगाडीवाल्याने घेतली. हातगाडीवरची आईसक्रीमची रंगीत चित्र बघून आणि 'थंडगार गारे गार' अशी पाटी वाचून सम्या मनातल्या मनात तो पदार्थ कसा लागतं असेल याचा विचार करायला लागला.


हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली आणि भैरुने सम्याला कामाला लावलं, सम्याचं काम म्हणजे ओरडून ओरडून बाबाच्या दुकानाची जाहिरात करायची. "कापडं घ्या, कापडं! लई भारी कापडं!!" सम्याने आपलं काम चालू केलं तरी त्याचा एक डोळा त्या हातगाडीवरच होता. आजूबाजूची पोरं आईबापा बरोबर येऊन आईसक्रिम खाताना बघून हे लहान मुलांनी खायचं काहीतरी छान आहे हे त्याला कळायला लागलं होतं. येणारा नवीन पोरगा कोणत्या रंगाचं आईसक्रीम खाणार याचा अंदाजही त्याच्या मनाने लावायला सुरुवात केली. "गार म्हंजी कसं आसल? झाडाच्या सावलीवाणी आसल का हिरीच्या पान्यावानी?" सम्याच्या नकळतच त्याचे मन तिथे जात होतं. मध्येच "कापडं घ्या, कापडं! गारे गार कापडं!!" अस ऐकल्यावर भैरुने झापलाच सम्याला.
"काय रं? काय इकतोयास? गारेगार कापडं आणली व्हय तुज्या बान?"
चमकून आपली चूक दुरुस्त करून सम्या परत एकदा ओरडायला लागला. दुपारी आयने बांधून दिलेली भाजीभाकर खातानाही त्याला ते "आईस्क्रीम भाकरीवानी थंड आसल का?" असा प्रश्न पडला होता जो भैरू पर्यंत पोचलाचं नाही.

संध्याकाळ व्हायला लागली तसं जत्रेतली लोकं कमी झाली आणि आपापली गाठोडी बांधून दुकानदारही घरच्या वाटेला लागायला लागले होते. भैरुनेपण आपली कापडं नीट घड्या घालुन गाठोडं बांधायला सुरुवात केली. आज फारसा धंदा झाला नव्हता. आता दुसऱ्या गावातला पुढचा मोठा बाजार महिन्याभराने होता आणि आजची कमाई जेमतेम वीस दिवस जातील एवढीचं होती म्हणून तो जरा चिंतेतच होता. आणि सम्या अजूनही त्या आईसक्रीमच्या गाडीकडेच बघत होता.

गाठोडं डोक्यावर घेऊन मागन भैरू आला तरी त्याला कळलंच नव्हत.
"काय रे सम्या, काय बगतोयास तिथं?"
लहान असला तरी 'आपल्याला असलं काही घेता येणार नाही' हे सम्या ला माहीत होतं म्हणून तो काहीच उत्तर न देता घराच्या दिशेन निघाला.
तसा भैरू खाली बसला आणि म्हणाला "ते थंडगार खायचं नव्हं तुला? सकाळधरनं बगून रायलोय म्या."
सम्या मात्र काहीच न बोलता जमिनीकडे बघत गुमान राहिला.
"चाल, इकडं ये" अस म्हणत भैरुने त्याचा हात धरून त्याला गाडीकडे आणले.
आता दोन रुपयाचं ते थंडगार विकत घेणाऱ्या आपल्या बाबा कडे सम्या अविश्वासाने आणि अभिमानाने बघतच राहिला.

तो छोटासा काडीला लावलेला थंडगार रंगीत गोळा बाबाच्या हातातून घेताना सम्या हरखून गेला होता.आणि तो थंड थंड गोळा चाटणारया आपल्या पोराच्या डोळ्यातला निरागस आनंद भैरूही भान हरपून बघत राहिला.
तेवढ्यात "बाबा तू बी खा कि थोडं. लई गार वाटतं बघ." अस म्हणत सम्याने तो थंडगार गोळा भैरूपुढे धरला.
आणि पुढच्या महिन्याभराच्या चिंता सोडून भैरूसुद्धा सम्या एवढा तिसरीतला पोरगा होऊन पुन्हा एकदा रंगीत लहानपण जगायला लागला.
Posted by Swapnali Mathkar at 6:40 PM 0 comments
Labels: कथा, छान गोष्टी

Thursday, September 23, 2010

ओरिगामी गणेश

हा लेख मायबोली (http://www.maayboli.com/) वर गणेशोत्सवासाठी प्रकाशित झाला होता.
*****
ओरिगामी हि एक जपानी कला. कागदापासून वेगवेगळे आकार तायार करणारी. अगदी साध्या बोटी पासून अगदी कठीण अशा ड्रेगन पर्यंत सगळेच आकार बनवता येतात यात.   जपानी मुलांना अगदी दोन वर्षापासूनच कागद कसा नीट दुमडायचा याची ओळख करून दिली जाते. शाळेतही ओरिगामी हा विषय शिकवला जातो. कधी कधी मला वाटत जपान्यांच्या नीटनेटकेपणामागे, आणि नियम काटेकोर पाळण्यामध्ये या ओरिगामी शिक्षणाचा फार सहभाग असावा.   ओरिगामी मध्ये प्रत्येक घडी अगदी काटेकोर असली तरच शेवटचा आकार आपल्या मनाजोगता येतो.  आणि असेही म्हटले जाते कि  ओरिगामी मुळे गणिती संकल्पना खूप पक्क्या डोक्यात बसतात. अर्थात हि ऐकीव माहिती आहे. 
एवढ असूनही मी कधी ओरिगामी शिकायच्या फंदात पडले नव्हते. नाही म्हणायला दोन तीन पुस्तके आणून सुरुवातीची फुलं , बोट अस काहीबाही करून बघितलं पण तेवढच. अलीकडे अचानक मला वाटलं कि ओरिगामी मध्ये गणपती करता येत असेल का? आंतरजालावर शोधून बघितलं पण फारस काही सापडलं नाही. भारताच्या ओरिगामी मित्र वेबसाईटवर गणपती केला आहे अस कळलं पण तो कसा करायचा ते मात्र मिळाल नाही.  मग हिरमुसले होऊन ती गोष्ट तशीच राहिली. आपणच प्रयत्न करून बघू असाही वाटलं पण कसा जमणार म्हणून सोडून दिलं. तरी बहुधा मनाने सोडलं नसावा हा विचार. कारण फावल्या वेळात ओरीगामिच्या वेगवेगळ्या घड्या पहात होते कधी मधी. त्यानंतर परत एकदा असच कागद हातात घेऊन , बघू या जमतय का काही असा विचार करत करून बघायला लागले आणि काय आश्चर्य चक्क गणपतीचा आकार जमतोय असा वाटलं. मग थोडं अजून शोध घेऊन कागदाला वळण कस द्यायचं ते शोधाल आणि त्यामुळे गणपतीची सोंडहि छान झाली. मग बरेच कागद वापरून पुन्हा पुन्हा करून एक पद्धत नक्की केली. आता तयार झालेला गणपती बघून आनंद अगदी गगनात मावत नव्हता. अगदी कुणाला सांगू आणि कुणाला नको अस झालं. तुम्हा सगळ्यांसमोर   ओरिगामी गणपती करायची पद्धत  दाखवायला गणेशोत्सवासापेक्षा योग्य संधी कुठली असणार ना. बहुधा म्हणूनच गणपती बाप्पा अगदी योग्य वेळी  कागदातून अवतरले असावेत.    
चला तर मग एक कागद , कात्री  आणि  गोंद घेऊन बसा माझ्या बरोबर.
१. लागणारे साहित्य

२. तुमचं काम करायला एक चांगली जागा , टेबल ठरवा.  कागद मार्बल पेपर (घोटीव कागद ) किंवा त्याप्रकारचा घ्या. फक्त फार जाड नको, आणि अगदी पातळ सहज फाटणारा नको. 

३. कागदाची दोन टोके अशा प्रकारे जुळवा

४. आणि मध्ये कर्णावर (digonal) एक घडी घालून घ्या.

५. आता कागद परत उघडा

६.  मग एक बाजू कर्णावर जोडली जाईल अशी दुमडा.

७. दिसरी बाजूही तशीच दुमडा.

८  मग परत एकदा नवीन तयां झालेली बाजू कर्णावर दुमडा.

९. दुसरी बाजू पण याच पद्धतीने दुमडा.

१०. तुम्हाला अशाप्रकारचा कोनाकृती आकार झालेला दिसला पाहिजे.

११.  त्या कोनच टोक घेऊन विरुद्ध बाजुला टेकवा.

१२. आणि दाबून नीट घडी पाडून घ्या.

१३.  त्यानंतर या अर्ध्या भागाला परत एकदा दाखवल्याप्रमाणे दुमडा. 

१४. आणि हा वर आलेला छोटा भाग उलट्या बाजूने परत एकदा दुमडा.

१५.   या घड्या उलगडल्यावर असा दिसले पाहिजे.

१६. मग हि जी पहिली घडी  अशी दिसली पाहिजे. 

१७. हि पहिली घडी तिथे कात्रीने दाखवल्याप्रमाणे कापा. दोन्ही बाजूला असे कापून घ्या.

१८. कापलेला भाग उघडून एक छोटीशी घडी घालून दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या.

१९. दोन्ही बाजूला सारखेच दुमडून घ्या. हा होईल गणपतीच्या कानाचा भाग.

२०. या कानाचे खालचे कोपरे किंचितसे दुमडा म्हणजे मग समोरून छान कानाचा  आकार येईल.

२१. आता समोरून बघितल्यावर गणपती सारखा दिसायला लागलाय ना?

२२. परत एकदा मागच्या बाजूने सोंडेचा भाग असा घडी करा.

२३ व २४. त्यावर उरलेला सोंडेचा भागहि तश्याच पद्धतीने घडी घालत रहा.

२५. शेवटी अस झिगझाग सारख दिसलं पाहिजे.

२६.  हे अस स्प्रिंग सारख वाटला पाहिजे मग हा सोंडेचा भाग छान दिसतो. 

२७. हे झिगझाग आघाडा. पण सगळ्यात पहिली घडी (२२ मध्ये घातलेली ) मात्र उघडू नका हं.  उघडल्यावर असा दिसत. पुढच्या पायऱ्या करायच्या नसतील तर इथेच थांबून सुद्धा चालेल. हाही आकार गणपतीसारखा दिसतोच आहे. डोळे काढल्यावर आणि दात लावल्यावर अगदी छान गणपती दिसतो. पण वक्रतुंड गणेश हवा असेल तर मात्र पुढच्या पायऱ्या कडे वळाच.

२८. या पुढच्या घड्या थोड्या कठीण आहेत. कागद अशाप्रकारे मध्यावर दुमडून घ्या.

२९. सोंडेसाठी  आपण आधीच पाडलेल्या आडव्या  घड्या परत एकदा दाबून नीट दिसतील अशा करून घ्या.

३०. आता दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आडव्या घडीसाठी एक तिरकी घडी करा. हि तिरकी घडी करताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जितकी जास्त तिरकी तितकी जास्त वळलेली सोंड. म्हणून कमी तिरक्या करा. घडी करताना त्रिकोणाचे शीर कागदाच्या उघड्या बाजूकडे ठेवा. हे उलटे केलेत तर सोंड बाहेर वळण्या ऐवजी आतल्या बाजूला वळेल. 

३१. उघडल्यावर अस दिसलं पाहिजे. हि खूपच महत्वाची पायरी आहे.

३२. त्या घड्या अशा त्रिकोणाकार दिसल्या तरच पुढच्या घड्या   घालता येतील.

३३. आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आडव्या आणि तिरप्या रेघेवर असं दुमडा. त्यामुळे तिरकी घडी वर येऊन  आडवी घडी त्या तिरक्या घडीच्या खाली झाकली जाईल.

३४. वरची पायरी अजून तीन आडव्या घड्यांसाठी करा.

३५. शेवटच्या घडीत मात्र अगदी टोक दिसू नये म्हणून थोडं टोक मागच्या बाजूला दुमडून घ्या. आणि शेवटची घडी अशी त्या मध्यकर्णावरच  आतल्या बाजूला वळवा. 

३६. आता तुमच्या घड्या अशा दिसू लागल्या असतील.

३७. मधली कर्णावरची घडी उघडल्यावर छानसा गणेशाकार दिसू लागला असेल नाही?  त्याचा वरचा डोक्याचा टोकदार भाग मागच्या बाजूला दुमडून टाका आणि मग गणपतीचा चेहेरा बघा किती छान दिसतोय ते. 

३८. त्याला सुंदरसे डोळे काढा. गंध काढा. आणि अरे हो दात राहिलाय ना अजून.

३९. आता एक पांढरा २ सेमी x २ सेमीचा तुकडा घ्या.   
४०. त्याचा परत ३ ते ७  पायऱ्या वापरून एक कोन करा. 

४१. तो मध्यावर दुमडून टाका  आणि मग हा चिमुकला कोन दाताच्या जागी गोंदाने चिकटवून टाका. 

४२ व ४३ . आता या गणपतीचे काय करणार बर? बघा तुम्हाला याचं पॉपअप ग्रीटिंग कार्ड करता येईल. 
 

४४. मी हा गणेश असा सोनेरी कागदावर चिकटवून भिंतीवरच लावलाय. 

   
  काय मग आता शिकवणारना हा गणपती आपल्या मित्र मैत्रीणीना आणि आजुबाजूच्या बच्चे कंपनीला? तुम्हाला आणि इतरांनाही आवडला तर मला येऊन सांगायला विसरू मात्र नका. 


या इथे तुमच्यासाठी सगळ्या पायऱ्या एकत्र. 


       

Posted by Swapnali Mathkar at 7:24 PM 0 comments
Labels: ganapati, Origami, Origami ganesh, ओरिगामी, ओरिगामी गणेश, कागदाचा गणपती, कागदी, गणपती, हस्तकला

Thursday, September 16, 2010

कापसाची म्हातारी

त्यादिवशी एक कापसाची म्हातारी मला आणि लेकीला दिसली. ती पकडे पर्यंत उडत उडत दुर गेली. आणि ती गेली म्हणुन लेकीने भोकाड पसरलं. ते आवरायला हि गोष्ट इंस्टंट्ली सुचली आणि तीला सांगितली. त्यानंतर परत संध्याकाळी एक म्हातारी दिसली तर तीने तीला उडून दुर जाउ दिलं !

---------------------
कापसाची म्हातारी

खूप खूप उन पडलं होतं. अंगणातली जमीन नुसती भाजून निघत होती. झाडांचा पक्षांचा जीव उन्हाने तल्लख होत होता. तेवेढ्यात कुठूनतरी वाऱ्याची एक गरम झुळूक आली आणि तिच्याबरोबर उडत आली एक कापसाची म्हातारी. म्हातारी कुठून उडत आली होती कोणास ठाऊक ? पण एवढ्या उन्हात सुद्धा ती अगदी मजेत उडत होती.
उडता उडता तिला भेटली एक चिमणी. चिमणीला म्हातारी बघून गंमतच वाटली. तिने विचारलं "अरे हां कुठला नवीनच बिनपंखाचा पक्षी?"
म्हातारी म्हणाली "अगं चिमणे, मी तर कापसाची म्हातारी."
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"

मग म्हातारी निघाली पुढे उडत उडत. उडता उडता म्हातारी एका बागेत पोचली. तिथल्या फुलांना वाटलं फुलपाखरूंच आलं. फुलं म्हणाली
"कित्ती छान फुलपाखरू आहेस रे तू! येरे ये फुलपाखरा मध पी , आराम कर आणि मग पुढे जा."
म्हातारी म्हणाली. "सुंदरशा फुलांनो धन्यवाद. पण मी काही फुलपाखरू नाही.मी आहे कापसाची म्हातारी. "
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"
फुलं म्हणाली "अरे वा छान छान. दूरच्या फुलांना पण आमचा थोडा वास दे."

म्हातारी परत आपली उडायला लागली. आता वाटेत दिसलं एक फुलपाखरू. ते त्याच फुलांवर बसायला चाललं होतं. म्हातारीला पाहून त्याला सुध्दा आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं "अरे तू चतुर आहेस कि काय?"
म्हातारी म्हाणाली "नाही रे बाबा. .मी तर कापसाची म्हातारी."
 "वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"

एवढ बोलून म्हातारी उडतेय तोच बागेत मुलं आली संध्याकाळची खेळायला. उडणारी म्हातारी मुलांना दिसली आणि मुलं तिच्या मागून तिला पकडायला धावायला लागली. जोरजोरात पळताना एका चिमुकल्या मुलीने पकडलंच शेवटी म्हातारीला.
म्हातारी कळवळून तिला म्हणाली " अगं अगं मुली. सोडना मला. मी आहे कापसाची म्हातारी"
 "वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर,  झाडं येतील खूपखूप"

चिमुकल्या मुलीला म्हातारीची दया आली आणि तिने म्हातारीला सोडून दिलं. म्हातारी मग आनंदाने उडत उडत दूर गेली. रात्र झाल्यावर वारा बंद झाला तशी म्हातारी जमिनीवर बसली. तिथे तिने बी जमिनीवर टाकून दिलं.
खूप दिवसांनी जेव्हा पावसाळा आला तेव्हा ते बी रुजलं आणि तिथे एक छान सावरीच रोप उगवलं.


----------------------------

हि गोष्ट सांगताना मुलांना, ते बी हवेत कसं उडतं आणि नविन रोपांची रुजवण कशी होते त्याबद्दल सांगता येईल.
Posted by Swapnali Mathkar at 12:48 AM 0 comments
Labels: छान गोष्टी

Friday, September 10, 2010

गणपती बाप्पा मोरया!!

गणपती बाप्पा मोरया!!  



Posted by Swapnali Mathkar at 10:54 PM 0 comments

Thursday, August 5, 2010

धनुकल्याचा रुसवा

५/८/२०१०


आज सकाळी कावळा उड सारखा खेळ खेळताना मुलीने इंद्रधनुष्य पण उडालं अस म्हटलं. त्या नंतर तिलाच गंमत वाटून ती विचारायला लागली कि इंद्रधनुष्याला पंख असते तर आणि ते उडालं असता तर कित्ती छान दिसलं असतं वगैरे. या बोलण्यावरून सुचलेली हि गोष्ट.


*****

छानशी संध्याकाळ झाली होती. सूर्यबाबा अगदी मावळतीला चालले होते. आकाशात जमलेले काळे राखाडी ढग आणि मध्ये मध्ये भुरभूरणारा पाउस यामुळे मावळतीचे रंग अजूनच सुंदर झाले होते. त्यात भर म्हणून क्षितिजावर सुंदर अगदी अर्धगोलाकार इंद्रधनुहि दिसत होते. या सुंदर इंद्रधनुला बघुन मुलामुली आनंदाने नाचत खेळत होती. आणि मुलांना बघून इंद्रधनु अजूनच हसत होते. तेवढ्यात सूर्यबाबांनी आज्ञा केली
“चल धनुकल्या आता घरी जाऊ. घरी जायची वेळ झाली. उद्या संध्याकाळी हव तर परत येऊ इथे.”
“अहं मी नाही येणार घरी इतक्यात,अजून सगळी मुलं खेळताहेत ना खाली.” इंद्रधनुने आपली नाराजी व्यक्त केली.
“पण आपण घरी गेलो कि ते जाणारच घरी. आपणच नाही गेलो तर त्यांची आईपण रागावेल ना त्यांना. चल चल. पटकन, निघू आता.”
“नको ना हो बाबा..तुम्ही नेहेमी अस करता. मला उशिरा आणता आकाशात फिरायला आणि लवकर चल म्हणता.” अस म्हणून इंद्रधनुने गाल फुगवले. त्याचे ते फुगलेले गाल बघुन सूर्यबाबांना अजूनच हसु आलं.
“तुम्ही हसु नका हो बाबा, मला रुसायचंय आता. मग तुम्ही हसलात कि मी कसा रुसणार?”

इंद्रधनुची हि असली मागणी ऐकून बाबांना अजूनच हसु आले. आणि ते हसु लपवायला ते ढगांच्या मागे लपले. बाबा बघत नाहीयेत असे बघून इंद्रधनु आपले पांढऱ्या ढगांचे पंख पसरून हळूच तिथून पळून गेला. इथे सूर्यबाबानी इंद्रधनु काय करतोय हे पहाण्यासाठी ढगातून डोक बाहेर काढल तर काय! ‘इंद्रधनु नाहीच!!’. बाबांना एकदम काळजी वाटायला लागली. पण आता करायच काय? आणि नेहेमीची वेळ झाली म्हणजे मावळायलाच पाहिजे. नाहीतर पृथ्वीवरचे पशून, पक्षी, लोक सगळे घाबरतील. सुर्यबाबा काळजी करत करतच घरी गेले.

इथे इंद्रधनु मात्र ‘आता बाबा सारखे सारखे रागावणार नाहीत , घरी चल म्हणणार नाहीत’ अस वाटून तो एकदम खुश झाला होता. ‘हव तिथे हव तेव्हा जायला मिळेल आता. कित्ती मज्जा.’ अस म्हणत लपलेल्या ढगातून बाहेर येत सगळी कडे बघू लागला.

तेवढ्यात त्याला एक पांढऱ्याशुभ्र बगळ्यांची रांगच रांग दिसली, ते सगळे अगदी धावपळीने घरी जात होते. इंद्रधनु त्यांना म्हणाला, “थांबा ना जरा माझ्याशी खेळा तरी. नेहेमी कसे माझ्या भोवती उडता तसे उडाना. मज्जा येईल.”
त्यातला एक बगळा म्हणाला “नकोरे बाबा. आता सूर्य देव गेलेत घरी म्हणजे आम्ही जायलाच पाहिजे. आणि नंतर काहीसुद्धा दिसणार नाही अंधारात. अरे हो, आणि तू अजून कसा नाही गेलास बाबांबरोबर घरी?”

हे ऐकून इंद्रधनु घाबरला, त्याला वाटलं आता बगळे सूर्यबाबांना सांगतील कि काय. म्हणून तो न थांबता तसाच पुढे गेला. आता खाली खेळणारी मुल सुद्धा घरी गेली होती. आणि इंद्रधनु आकाशात असून सुद्धा कोणीच बघत नव्हत त्याच्याकडे. आता धनुकल्याला जरा जरा कंटाळा यायला लागला होता. पण तरी हट्टाने तो तसाच चंद्र आणि चांदण्यांची वाट बघायला लागला.

हळूचकन एक चांदणी आकाशात आली. चमचम करत इंद्रधनु कडे बघताच राहिली.
“अरेच्च्या, अजून दिवस मावळला नाही कि काय? अशी कशी मी आधीच आले आकाशात?”
इंद्रधनु म्हणाला “नाही नाही तू बरोबर वेळेवर आलीयेस ग पण मीच बाबांवर रागावून घरी गेलो नाहीये आज. तू खेळशील ना माझ्याशी?”
चांदणी म्हणाली “पण तुझ्याशी खेळायचं तरी काय? आम्हीतर कधीच तुझ्याशी खेळलो नाही आहोत.”
“पकडापकडी खेळुयात?”
“नकोरे तुला तर पंख आहेत. मला तुझ्या मागून एवढ्या जोरात धावता येणार नाही.”
“बर मग लपाछपी?”
“छे! रात्रीच कस खेळणार लपाछपी? आम्ही तर चमचमतो, आणि तू दिसणार सुद्धा नाहीस. मग तुला कोण पकडणार?”
“हं... जाउदे मी चांदोबाशी खेळेन, येईलच तो एवढ्यात.”
“वेडाच आहेस आज अमावास्या आहे ते माहीत नाही होय? आज चांदोबा येत नाही खेळायला, घरीच रहातो.” तेवढ्यात आलेल्या चांदणीच्या मैत्रिणी म्हणाल्या. आणि मग त्यांचे नेहेमीचे दुसरे खेळ आणि गप्पा चालू झाल्यावर इंद्रधनुकडे कुणाच लक्षच राहील नाही.

आता इंद्रधनुला काय करावे सुचेना. इंद्रधनु अंधारामुळे आकाशात आता दिसतच नव्हता कोणाला. त्यालाहि अंधाराची भीती वाटायला लागली होती. ‘पण आता करायचं काय? घराचा रस्ताही माहीत नाही. चांदोबा आला असता तर त्याला रस्ता तरी विचारता आला असता.’ अस म्हणून धनुकल्याला रडू यायला लागलं.रडता रडता केव्हातरी तो तसाच क्षितिजावर झोपून गेला.

इकडे सुर्यबाबाना चैनच पडत नव्हती.इंद्रधनु काय करत असेल, कसा असेल अस वाटून अगदी रडूच येत होत. कधी एकदा परत उगवायची वेळ होते आणि मी इंद्रधनुला शोधतो अस झालं होत बाबांना.

झालं! सकाळी नेहेमी पेक्षा जरा लवकरच सुर्यबाबा निघाले उगवायला. उगवायाच्या आधीच एक चांदणी दिसली वाटेत. ती घरी निघाली होती.

“काय ग तुला धनुकला दिसला का कुठे?” लग्गेच बाबांनी तिला विचारलं.
“हो तर. रात्री आला होता खेळायला पण अंधारात तो दिसत नव्हता म्हणून आम्ही खेळलोच नाही त्याच्याशी.”

बाबांना अजूनच चिंता वाटली.
मग क्षितिजावर उगवता उगवताच त्यांना आकाशात उडणारी पांढऱ्याशुभ्र बगळ्यांची रांगच रांग दिसली . परत बाबांनी त्यांना विचारलं

“तुम्हाला माझा धनुकला दिसला काहो कुठे?”
बगळे म्हणाले “हो तर. काल संध्याकाळी तुमच्या वर रागावून निघाला होता. पण आम्ही नंतर घरी गेल्याने काहीच माहीत नाही.”

सूर्यबाबांना अजून काळजी वाटली.
तेवढ्यात एक घुबड त्याच्या ढोलीत जाताना त्यांना दिसलं. त्यालाही सूर्यबाबांनी विचारलं

“तुला धनुकला दिसला का रे कुठे”?
घुबड रात्री भरपूर फिरून आलं होतं आणि त्याने पश्चिम क्षितिजावर झोपलेल्या इंद्रधनुला पाहिलं होत.
ते ऐकताच सुर्यबाबांना अगदी हायस वाटलं. पश्चिम क्षितिजा आपली किरण पाठवून त्यांनी इंद्रधनुला हळूच उठवलं. बाबांना बघून धनुकला एकदम खुश झाला. बाबांच्या कुशीत येऊन रडत रडत म्हणाला “मी आता तुमच्यावर कधीच रागावणार नाही. तुम्ही सांगाल ते नक्की ऐकेन.”

“शहाणा रे माझा धनुकला” अस म्हणत बाबांनी पण धनुकल्याला जवळ घेऊन त्याची एक छानशी पापी घेतली.
Posted by Swapnali Mathkar at 6:50 PM 0 comments
Labels: छान गोष्टी
Newer Posts Older Posts Home

Copyright Protected

All content is copyright protected. You are not authorized to use, copy any content in any way without written permission from the Auther, Swapnali Mathkar. ब्लॉग कॉपीराईट अधिकार सुरक्षित
कॉपीराईट: स्वप्नाली मठकर
Copyright: Swapnali Mathkar
MyFreeCopyright.com Registered & Protected

Labels

  • २०१० दिवाळी अंक (1)
  • ganapati (1)
  • Origami (2)
  • Origami ganesh (1)
  • poem (1)
  • potato (1)
  • world (1)
  • उराशिमा तारो (1)
  • ऐका (4)
  • ऑडियो (4)
  • ऑडियो कथा (4)
  • ऑडियो बुक (1)
  • ऑलिम्पिक (1)
  • ओरिगामी (2)
  • ओरिगामी गणेश (1)
  • कथा (2)
  • कथाकथन (4)
  • कथाकथी (4)
  • कागदाचा गणपती (1)
  • कागदी (1)
  • कुनीदेशातल्या कथा (2)
  • गणपती (1)
  • छान गोष्टी (12)
  • जपानी (1)
  • ढग (1)
  • थेंबाचा प्रवास (1)
  • निसर्गकथा (2)
  • पंचफलम् समर्पयामी (1)
  • पाऊस (2)
  • पाणी (1)
  • प्राणीकथा (1)
  • फळे (1)
  • फुलपाखरी आकाशकंदील (1)
  • फुलांच्या गोष्टी (2)
  • बटाटे (1)
  • बडबड कविता (4)
  • बालकथा (1)
  • भाषांतर (3)
  • मज्जाखेळ (1)
  • मराठी दिवस (1)
  • विज्ञान गोष्टी (4)
  • साकुरा (1)
  • सायुच्या गोष्टी (3)
  • हस्तकला (1)
  • हातमोजे (1)

About Me

Swapnali Mathkar
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2020 (5)
    • ▼  April (3)
      • कथाकथी - प्राणीकथा : चिंगु आणि पिंगू ची स्कूटर वा...
      • सायुच्या गोष्टी : सुट्टीतले स्केटींग
      • कथाकथी - चिमण्या आणि डोंगर (Marathi Audio Book)
    • ►  March (2)
  • ►  2014 (2)
    • ►  July (1)
    • ►  February (1)
  • ►  2013 (3)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
  • ►  2012 (4)
    • ►  September (1)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
  • ►  2011 (2)
    • ►  June (2)
  • ►  2010 (19)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  September (4)
    • ►  August (1)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (1)
  • ►  2009 (1)
    • ►  February (1)

Followers

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments

Search This Blog

 
Copyright 2009 गंमत गोष्टी. Powered by Blogger.
Blogger Templates created by Deluxe Templates
WP Themes by Wpthemesfree