लोकसत्ता बालाविभागात १२-सप्टेम्बर-२०१० रोजी प्रकाशित
------------------------
सायुरीच्या सोसायटीमध्ये नुसती धावपळ चालू होती. का म्हणून काय विचारता अहो गणपती येणार म्हणजे तयारी नको का करायला? सोसायटीमध्ये असलेल्या गणेश मंदिरासमोरच मोठा मंडप घातला होता. सगळे ताई आणि दादा गणपतीची आरास , मखर यात गुंतले होते. गणपतीची गाणी लावण्यासाठी स्पीकर , म्युझिक सिस्टीम आणून ठेवली. कुठली गाणी कधी लावायची यावरही जोरदार चर्चा व्हायला लागली होती.
पण या सगळ्यात सायुच्या बच्चेकंपनी ग्रुपला मात्र कोणी मध्ये घेत नव्हते फारसे. त्यामुळे ते आपले उगीचच इथेतिथे लुडबुड करायचे आणि कधीकधी एखाद्या दादा कडून रागावूनसुद्धा घायचे.
दुपारी असच खेळता खेळता सायु गणपतीच्या देवळात गेली. हात जोडून नमस्कार करतेय तितक्यात तिला गाभाऱ्याजवळ असलेल्या मागच्या दरवाज्याजवळ जरा हालचाल दिसली. कोण असेल तिथे अस म्हणून ती दबक्या पावलांनी दरवाज्याजवळ गेली. तर कुणीतरी अजूनच लगबगीने पुढे गेलं. तशी सायु पुन्हा एकदा पुढे गेली आणि तिने जोरात विचारलं "कोण आहे तिकडे?" ती व्यक्ती दचकून थांबली आणि वळून सायुकडे बघायला लागली.
आता मात्र आश्चर्याचा धक्का बसायची पाळी सायुची होती.काय गणपतीबाप्पा? चक्क इथे आपल्यासमोर ? तिला काही बोलायला सुचेचना. तेवढ्यात बाप्पाच म्हणाला "हळू बोल ना ग. कोणीतरी पाहिलं म्हणजे." आता सायुला गम्मतचं वाटली गणपती बाप्पा अस म्हणतोय म्हणजे काय!
तिनेही मग खुसुखुसू हसत त्याला हळूच विचारलं. "बाप्पा तू इथे काय रे करतोयस? देवळात छान नैवेद्य घेऊन येतील काकू आता. तिथेच थांबना."
"मी पुढच्या दहा दिवसांसाठी पळून जातोय, जंगलात." बाप्पाने सांगितले?
"तू पळून जाणारेसं? आणि उद्या संध्याकाळी आम्ही मूर्ती आणणार त्याचं काय? तुझी पूजा करणार त्याचं काय? सगळे छान छान प्रोग्राम करतील, गाणी लावतील , छान छान खाऊ देतील तुला आणि तू म्हणतोयस मी पळून जाणार?"
"मग करणार तरी काय ग? तू बघितल नाहीस का ते मोठमोठे स्पीकर आणून ठेवलेत सकाळीच. माझे कान इतके मोठे मोठे कारण सगळ्या भक्तांनी केलेली प्रार्थना ऐकू जायला हवी मला. मग मला सांग, ही मोठ्ठ्याने ढणाढणा लावलेली गाणी मला किती जोरात ऐकायला येत असतील बरं? कान दुखून जातात माझे अगदी. फुलं घालून बंद केले तरी सुध्दा गाणी ऐकू यायची थांबत नाहीत.आजकाल मात्र मी पळूनच जातो या दहा दिवसात. छान पैकी जंगलात शांतपणे राहतो. आणि मोदक काय एरवी संकष्टीला सुद्धा मिळतात."
गणपतीबाप्पाचं दुख्ख ऐकून सायुला पण खूप वाईट वाटलं. पण तरीही बाप्पा पळून जावे हे काही तिला आवडलं नाही. तिने बाप्पाला खूप विनवणी केली. "प्लीज ना बाप्पा तू नको ना रे जाउस. तू सांगत का नाहीस या लोकांना मग सरळ सरळ?"
"अग माझीच पूजा , मग मी कस सांगणार कशी करा आणि काय करू नका ते? अस चालत नाही मी सांगितलेलं. आई रागावेल मग मला."
"हम्म, मग अस करूयात. मीच सांगते सगळ्यांना गाणी बंद करायला. मग थांबशील का तू?"
"अग सायु पण तुझ कोणी ऐकल नाही तर?"
"बाप्पा मी प्रयत्न तरी करते ना. त्यानंतरही गाणी लावली तर तू जा मग जंगलात. चालेल?"
हा प्रस्ताव बाप्पाला पटला. आणि गणपतीबाप्पा परत देवळात जाऊन बसला.
सायु लगेच घरी आली. ती बाप्प्पाला म्हणाली होती खर कि गाणी बंद करायचं सांगून बघते पण तिला हेही माहीत होतं कि अस काही सांगितलं तर सगळे किती हसतील आणि वर्षभर चिडवत रहातील ते वेगेळेच. घरी जाऊन ती विचार करत बसली. तेवढ्यात सायुची मावसबहीण सानिका कॉलेजमधून घरी आली. ती कॉलेज जवळ पडतं म्हणून इथेचं मावशीकडेच राहायची. आणि ती इथे रहायला आल्यापासून सायुला घरात जरा जास्तच मस्ती करता यायची.
सानिताई आल्या आल्या सायु तिच्या मागेच लागली. आणि तिला घाईघाईत गणपती बाप्पाची गोष्ट सांगून टाकली. हे ऐकून ताई जोरजोरात हसायला लागली.
"काय ग ए सायटले! दिवसा पण स्वप्न बघतेस कि काय?"
"ए ताई मी खरच सांगतेय ग. जा तू. तुला बघ गणपती बाप्पा स्वप्नात येऊन सांगेल कि नाही ते."
मनोमन सायुने गणपतीची प्रार्थना करून त्याला ताईच्या स्वप्नात जायची विनवणी केली.
संध्याकाळभर ताईने सायुला खूप चिडवलं. आणि सायु नुसतीच फुरंगुटून बसली.
दुसऱ्या दिवशी सक्काळीच पहाटेचं ताई उठली ती द्चकुनच. तिला खरच स्वप्नात गणपती आला होता. आणि त्याने सायुने जे सांगितलं तेच परत सांगितलं. ताईने गदागदा हलवून सायुला उठवलं आणि स्वप्नाबद्दल सांगितलं.
आता मात्र एकदम विजयी मुद्रा करून सायु म्हणाली "बघ मी सांगितलं होतं कि नाही?"
"हो हो बाई. तूच खरी कि नाही. पण आता काय करायचं ते सांग." ताईने लगेच माघार घेतली.
"तू जाऊन सांग ना तुझ्या मित्र मैत्रिणींना."
"बरी आहेस कि. मला हसतील नाही का सगळे."
"ह्म्म् मग आता? गाणी लावली कि बिचारा गणूल्या जाईल ग पळून." हिरमुसली होऊन सायु म्हणाली.
ताई विचारात पडली आणि अचानक तिला काहीतरी सुचलं
"चल, चलं सायु,जास्त वेळ नाही आपल्याकडे. अजून सूर्य उगवला नाही तोवर जाऊन येऊया गुपचूप."
सायुला कुठे जायचं असा प्रश्न विचारायालाही वेळ न देता ताईने ड्रॉवर मधला एका स्क्र्यू ड्रायव्हर आणि कटर घेतलं आणि चप्पल घालून निघाली. तिच्या मागे सायुही धावत निघाली.
मग ताई हळूच स्पीकर ठेवलेल्या जागेकडे आली. अजून सूर्य न उगवल्याने निळसर अंधार होता सगळीकडे. इकडे तिकडे बघत तिने स्क्र्यू ड्रायव्हरने अलगद स्पीकरचा मागचा भाग उघडला. आतल्या वायर कापून टाकल्या आणि परत बंद करून ठेवला. सगळे स्पीकर असे बिघडवून ती सायुचा हात धरून धावत घरी परत आली.
"तू आता मला सांगणार आहेस का काय केलस ते? ते स्पीकर बंद करून काय उपयोग? तो दुकानदार लग्गेच दुरुस्त करेल."
"सायु, अग आता गणपतीच्या दिवसात दुकानदाराला खूप काम असणार, इथले स्पीकर दुरुस्त करायला नक्कीच लवकर येणार नाही तो. बघच तू."
सायु आपल्या ताईकडे अभिमानाने बघत राहिली. आणि तेवढ्यात आत आलेल्या आईला आज या दोघी इतक्या लवकर कशा काय उठल्या याचच आश्चर्य वाटलं.
संध्याकाळी दरवर्षीप्रमाणे सगळेजण गणपतीची मूर्ती आणायला गेले.टाळ, झांज वाजवत गाजत मूर्ती येऊन गेट मध्ये आल्यावर मस्त पैकी जोरदार गाणे लावायचा बेत होता मुलांचा.
त्याप्रमाणे गाणे वचालू केले पण आवाज येईच ना. सगळ्या वायरी कनेक्शन नीट बघितलं तरी आवाज काही येईना. इकडे गणपतीवाले गेट मध्ये ताटकळत उभे. शेवटी ते असेच धमाकेबाज गाणी न लावता आत आले.
बाकीच्या पोरांनी त्या स्पीकर वाल्याला फोन केला तर त्याने ताईच्या अंदाजाप्रमाणे "इतक्यात यायला वेळ नाही, खूप काम आहे" असच सांगितलं. एकंदर दादा लोकांचा जरा मुड गेलाच पण इलाजचं नव्हता.
गणेश पूजनाची आदली रात्र एवढी शांततापूर्ण असल्याने सोसायटीमध्ये सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. बाजूच्या सोसायटीमधली दोन चार मुल तर विचारायला सुद्धा आली कि काय तुमच्या गणपतीला यंदा काहीच धमाका नाही. आता त्यांना घाईत काय उत्तर द्यावे हेचं कुणाला कळेना. खर सांगितलं तर टिंगल होणार हे ठरलेलंचं. तेवढ्यात सानिका म्हणाली "हो हो आमचा गणपती यावर्षी ध्वनीप्रदूषण मुक्त करण्याचे ठरवले होते आम्ही". तिच्या या उत्तरावर सगळे अगदी अवाकच झाले. पण एकदम झ्याक उत्तर दिल म्हणून लगेच ग्रुपमध्ये कौतुकही झालं.
दुसऱ्या दिवशीची पूजा सुद्धा अशीच शांततेने झाली आणि शेवटी सगळ्यांनी मस्तपैकी टाळ वाजवत आरत्या म्हटल्या.
आजोबांच्या ग्रुपने तर येऊन मुलांचे स्पेशल आभार मानले. म्हणाले "एवढा शांततापूर्ण कार्यक्रम बघून छान वाटलं बघा मुलांनो. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ठ गणपतीसाठी तुमच नाव नक्की सुचवणार बर आम्ही."
हे ऐकून तर मुलांचा आनंद अगदी गगनात मावेना. इकडे सायु आपल्या सानीताईला डोळा मारून कशी गंमत झाली अस खुणावत होती.
रात्री स्पीकरवाला स्पीकर दुरुस्त करायला आल्यावर तर सगळ्या मुलांनी अगदी एकमताने स्पीकर परत देऊन टाकले. हे बघून तर सायु एकदमच खुश झाली.
त्यादिवशी रात्री जेवायच्या वेळेला अचानक सायु धावत बाहेर गेली. आई हाक मारतेय पण ऐकेल तर ती सायु कसली! तशीच धावत ती गणपतीच्या देवळात गेली. तिथे बाप्पा तिची वाटच बघत होता. सायु आल्या आल्या बाप्पाने तिला छानपैकी थॅन्क्यु म्हटलं आणि आपल्या सोंडेने समोरच्या ताटातले दोन मोदक तिच्या हातात ठेवले.
Thursday, December 2, 2010
Wednesday, December 1, 2010
सायुच्या गोष्टी: घरातलं इंद्रधनुष्य
सायुच्या गोष्टी: घरातलं इंद्रधनुष्य
"बाबा इंद्रधनुष्य करून दाखवा ना. प्लीज. मी कधी बघितलंच नाहीये. प्लीज ना बाबा." सायु सकाळपासून बाबांच्या मागेच लागली होती.
"अगं, इंद्रधनुष्य असं घरी कसं करणार?" आज्जीने मुद्दामून हसतच विचारलं.
"अग आज्जी काल आई धनुकल्याची गोष्ट सांगत होती ना, तेव्हा बाबा म्हणाले मी दाखवीन तुला इंद्रधनुष्य. आणि आत्ता दाखवायला सांगतेय तर बाबा लक्षच देत नाहीयेत." सायुने आज्जी कडे तक्रार केली.
इतक्यात बाबा आलेच आंघोळ करून बाहेर. "काय गं पिल्लू कशाला गाल फुगवून बसलीयेस?"
"हं तुम्ही लक्षच देत नाही बाबा. मला इंद्रधनुष्य करून दाखवा ना."
"हो गं नक्की दाखवणार आहे. पण आत्ता नाही तीन दिवसांनी शनिवार आहेना? तेव्हा मला सुट्टी असते त्या दिवशी दाखवतो. चालेल ना?"
आनंदाने सायु एकदम उड्याच मारायला लागली. "नक्की बरं का बाबा. मी श्रीया आणि सुरभीला पण बोलावणार आहे बघायला."
"बरं, बरं संध्याकाळी बोलाव त्यांना ५ वाजता."
श्रीया आणि सुरभी या सायुच्या बालवाडीतल्या मैत्रिणी . या दोघी बरोबर आणखीनही दोनचार जण येणार हे बाबा आणि आई दोघांनाही ठाऊक होतं.
त्यानंतर रोज सकाळी उठल्यावर सायुचा पहिला प्रश्न "आज कुठला वार?" आज शनिवार नाही अजून शनिवार यायला वेळ आहे अस ऐकलं कि जरा हिरमुसली होऊनच उठायची ती. खरतरं उठायचच नसायचं तिला. पण आई ऑफिसला जायच्या आधी तयारी करून आईबरोबर शाळेत जायला लागायचं. त्यामुळे लवकर न उठून चालायचं नाही.
शेवटी एकदाचा शनिवार आला. "आज शनिवार आहे हो" अस आज्जीने सांगितल्यावर सायु अगदी टुणकन उडी मारून उठली. आणि धावत बाबांच्या समोर जाऊन "आज शनिवार आज शनिवार" अस म्हणत नाचायला लागली.
आता कधी एकदा संध्याकाळ होते अस झालं होत तिला. दुपारचं जेवणखाण अगदी शहाण्यासारख करून एक झोप सुद्धा काढली चक्क तिने.
चार वाजता श्रीया, सुरभी आल्याच पण बरोबर तन्मय निखिल आणि निरंजनीहि आले. आल्या आल्या सुरभी ने धावत घरात जाऊन कुठे इंद्रधनुष्य दिसतंय का ते बघून घेतलं. आईने मस्तपैकी इडल्या केल्या होत्या सगळ्यांसाठी. त्या भराभरा खाऊन मुलं सायुच्या बाबांची वाट बघत होती.
पण बाबा मात्र अजून तसेच सगळ्यांबरोबर गप्पा मारत बसले होते.
"बाबा इंद्रधनुष्य?" सायुने आपली नाराजी दाखवलीच थोड्यावेळाने.
"हो गं सायु. ५ वाजता दाखवणार मी. त्या आधी दिसणार नाही ते."
आता मात्र मुलांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली. आई, आज्जी, आजोबा मात्र खुसुखुसू हसतच होते.
५ वाजायला आले तसे बाबा उठले आणि गाडीच्या गॅरेजजवळ गेले. सायुच घर म्हणजे सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्याच्या कॉलनीमधला एक बंगला होता, त्यामुळे त्यांच स्वतंत्र गॅरेज होतं. तिथे संध्याकाळच्या सोनेरी उन्हात सगळ्यांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या होत्या. त्या सावल्यात खेळण्याचा खेळ मुलांनी सुरु केला. इतक्यात बाबांनी गाडी धुवायचा पाईप काढून गाडी धुवायची तयारी सुरु केली.
अजूनही मुलांना काहीच कळत नव्हतं. सायुने नळ चालू केल्यावर मग पाईप मधून जोरात पाण्याचा फवारा उडायला लागला. आणि बघतात तर काय? त्या फवारयाच्या एकाबाजूला सुंदर सात रंगांची एक कमान दिसायला लागली होती.
"बाबा इंद्रधनुष्य!!!" अस म्हणून सायु नाचायलाच लागली. बाकीचे मित्र मैत्रिणी सुद्धा तिच्याबरोबर नाचत , मधेच सात रंगाच्या कमानीत हात घालून धमाल करायला लागले.
तेवढ्यात बाबा म्हणाले कळलं का तुम्हाला कस आलं इंद्रधनुष्य ते?
"पाण्यातून उन गेल्यामुळे ना काका?" निरंजनीने विचारले.
बरोब्बर! पाण्याच्या थेंबातून प्रकाश गेला कि पांढरा प्रकाश सात रंगात त्याचे डीफ्रॅक्शन होते आणि मग इंद्रधनुष्य दिसते. कुठले कुठले रंग आहेत पहा बरं.
तेवढ्यात सायुच्या आईने ता ना पि हि नी पा जा अशी रंगाच्या नावाची गम्मतसुद्धा सांगितली. आता मुलांनी पण वेगवेगळया प्रकारे पाईपमधून पाणी उडवून कसे रंग दिसतात ते पाहिले, आणि सूर्यास्त होईपर्यंत तिथेच मस्त खेळत राहिले.
आणि दुसऱ्या दिवशी शाळेतल्या इतर मित्र मैत्रीणीना हि गम्मत कधी एकदा सांगतो असे सगळ्यांना झाले होते.
त्यादिवशी रात्री झोपायच्या वेळी जेव्हा बाबा सायुला थोपटत होते तेव्हा मात्र सायुने बाबांना एक गोड पापी दिली आणि थॅंक्यू म्हटले. मग झोपण्यासाठी डोळे मिटले तर तिला सारखे इंद्रधनुष्यच दिसत होते.
न रहावून डोळे उघडून तिने बाबांना विचारले "बाबा इंद्र धनुष्य विमानातून कसं दिसतं हो?"

Labels:
छान गोष्टी,
विज्ञान गोष्टी,
सायुच्या गोष्टी
Saturday, November 20, 2010
थेंबाचा प्रवास
सगळ्या गोष्टीमध्ये असत ना तसच एक जंगल होत. पण हे जंगल मात्र अगदी खर खर होत बर का. छान छान उंच डोंगर , दाट हिरवी झाडे, झाडांवरेच पक्षी असा सगळ सगळ खर.
अशा डोंगरात होती एक गुहा. मोठ्ठी अंधारलेली दगडाची गुहा. आणि गुहेत अगदी काळामीटट अंधार होता आणि जमिनीखालच्या झऱ्यातून येणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांनी गुहेतले खड्डे सगळे पाण्याने भरून गेले होते. अचानक एक पिटुकला थेंब आला जमिनीतून वरती.आधी गुहेतला अंधार पाहून घाबरुनच गेला. गुहेतल्या थंडीने कुडकुडायला लागला. पण थोड्या वेळाने त्याला आजूबाजूला नीट दिसायला लागलं आणि त्याच्यासारखेच अजुन अनेक पाण्याचे थेंब सुद्धा दिसायला लागले. असे बरेच मित्र पाहून त्याला जरा हायस वाटलं.
असा खूप वेळ गेला आणि त्या थेंबटल्याला कंटाळा आला. कितीवेळ अस शांत बसून राहायचं ? मला खेळायचं , फिरायचं ना! थेंब जोरात ओरडला पण त्याचा आवाज कुणाला ऐकूच गेला नाही. पण हळू हळू थेंब असलेल्या खड्ड्यात पाणी वाढत होते. ते पाहूनही त्याला बारा वाटत होते. तेवढेच जास्त मित्र जवळपास.
इतक्यात तो खड्डा पूर्ण भरला आणि पाणी वाहायला लागले सगळे थेंब बाहेर आधी वाहून जायला मस्ती करायला लागले. हा थेंबटला पण लग्गेच बाहेर पडला. आणि पाण्याबरोबर वाहायला लागला. वॉव काय मजा येतेय ना खेळायला अस म्हणत मस्त इकडे तिकडे हुंदडायला लागला. वाहातं पाणी गुहेच्या बाहेर आलं आणि बाहेरच्या प्रकाशाने थेंबाचे डोळेच दिपले. केवढा हा प्रकाश! पण काय छान वाटतंय ना, कित्ती उबदार आहे इथे अस आपल्या मित्रांशी बोलत अजून मस्ती करायला लागला.
पण अरेच्च्या हे काय? आता गुहेतून बाहेर आलेल पाणी बाहेरच्या मोठ्ठ्या डोहात थांबले. थेंब जरासा हिरमुसला पण म्हणाला जाउदे इथे निदान प्रकाश आहे छान उबदार वाटतंय आणि बाहेर बघायला तर कित्ती काय काय आहे.
त्या डोहात पाय घालून बसल होत एक झाड. थेंब म्हणाला अरेच्या तुम्ही कोण बर? मी पाण्याचा थेंब, आत्ताच त्या गुहेतून बाहेर आलो. तुम्ही माझ्याशी गप्पा माराल का?
झाड म्हणाल हो तर. मला पण आवडेल गप्पा मारायला. आणि हो मला म्हणतात झाड , वडाच झाड.
थेंब एकदम खुशीत येऊन म्हणाला मी इथे डोहात आहेना त्यामुळे दूरच काही दिसत नाहीये . तुम्ही कित्ती वर आहात, मला छान छान गोष्टी सांगा ना.
झाडाने मग थेंबाला आकाशाच्या , डोंगराच्या गोष्टी सांगितल्या.
इतक्यात झाडावरून चिमुकलं रंगीत कोणीतरी उडालं. थेंब म्हणाला,कोण आहे ते छोटछोट? रंगीत?
चिमुकली चिमणी म्हणाली चिव चिव मी रंगीत चिमणी. आकाशात उडते.
ओहो कित्ती छान चिमणे! तू पण सांग ना मला दूरदूरच्या गोष्टी.
मग चिमणीने थेंबाला नदीची , धबधब्याची गोष्ट सांगितली.
असे काही दिवस गेले चिमणी आणि झाड रोज थेंबाला छान छान नवनवीन गोष्टी सांगायचे. मग थेंबाला वाटायचे आपण कधी जाणार हे सगळ बघायला. त्याला डोहात रहायचा अगदी कंटाळा आला.
तेवढ्यात परत एक गम्मत झाली तो डोह भरला पाण्याने आणि पाणी बाहेर वाहायला लागले. पुन्हा एकदा सगळे थेंब बाहेर आधी वाहून जायला मस्ती करायला लागले.
या थेंबटला झाडाला आणि चिमणीला म्हणाला मी पण जरा जाऊन बघतो, पण परत येईन हं मी , आणि मग तुम्हाला गम्मत जम्मत सांगेन. टाटा करून थेंब निघाला आणी त्याला थोडावेळ सोबत करायला चिमणीपण उडू लागली.
खळखळ आवाज करत नदी वाहायला लागली. थेंबालापण प्रवाहाबरोबर खडकांवरून उड्या मारायला, मस्ती करायला मस्त वाटत होत.नदीच्या आवाजात आवाज मिसळून गाण म्हणायला सुद्धा मज्जा वाटत होती.
इतक्यात चिमणी सांगत आली अरे थेम्बा पुढे ना धबधबा आहे. आता काय करणार रे तू?
थेंब म्हणाला असुदे ग,तू घाबरू नकोस . मी पण वाहत जाऊन बघेन काय होत ते.
तेवढ्यात आलाच धबधबा. थेंब मात्र त्याच्या मित्रांबरोबर तसाच वाहात पुढे गेला आणी पाण्याने धबधब्याच्या कड्यावरून जोरात खाली उडी घेतली. प्रचंड जोरात आवाज करत पाणी खालच्या डोहात पडले आणी त्याबरोबर तो थेंब सुद्धा.
खूप वेळा पाण्यात वर खाली झाल्यावर एकदाचा तो परत पोहायला लागला.
चिमणी काळजीने वाट पहातच होती खाली.
बाप रे कित्ती मोठठा होता नाही हा धबधबा!
आधी जराशी भीतीच वाटली ग चिमणे , पण नंतर बाहेर आल्यावर छान वाटलं.
थेंब प्रवाहात आलेला बघून चिमणीला हायस वाटलं.
मग रात्र व्हायला लागली तशी चिमणी म्हणाली आता परत जायला पाहिजे मला. नाहीतर अंधारात रस्ता सापडणार नाही.
थेंबाला टाटा करून चिमणी परत गेली आणी थेंब तसाच पुढे पुढे जात राहिला.
नवनवीन जंगल , नवनवीन प्राणी बघून अगदी हरखून गेला.
आता त्याला मोठ मोठे मासे भेटले पाण्यातच. मासे म्हणाले आम्ही समुद्रपण पाहिलाय. खुपच मोठ्ठा असतो तो. ही आपली नदी समुद्रातच जाणारे बर वाहत वाहत.
हे ऐकून थेंबाला कधी एकदा समुद्रात जातो अस झालं.
हळू हळू नदीच पाणी खारट झालं , थेंब सुद्धा खारट झाला आणी मग अचानक प्रचंड मोठ्या समुद्रात थेंबाने प्रवेश केला.
एवढ्या मोठ्ठ्या समुद्रातले रंगीत , मोठमोठाले मासे पाहून , शिंपले आणी रंगीत वनस्पती पाहून पुन्हा एकदा तो अगदी हरखून गेला. अगदी किती पाहू आणी किती नको अस झालं त्याला.
वरच्या लाटांमध्ये खेळताना , मोठी मोठी जहाज पण दिसायची त्याला. तो विचार करायचा काय बर असेल तिथे जहाजावर ? काय बर करत असतील माणसे ?
अचानक एके दिवशी खूप म्हणजे अगदी खुपच गरम झालं. आणी आश्चर्यच झालं, थेंबाची झाली वाफ आणी आकाशात उडायला लागली. थेंबटला काय, खुपच खुश झाला. आकाशात उडता उडता त्याला खूप पक्षी दिसले , विमानं दिसली, मऊमऊ कापसासारखे ढग दिसले. आकाशातून उडताना जमीनसुद्धा दिसली. काय सुंदर देखावा आहे हा अस म्हणत थेंब वाफ होऊन उंच उंच उडत होता. तिथे मात्र जरा थंड वाटायला लागल होत. आणी त्याला जरा दमायला पण झालं होत. म्हणून तो एका काळ्या राखाडी ढगावर बसला . बघतो तर काय तिथे त्याच्यासारखे बरेच थेंब आधीच थांबले होते. वाऱ्याने तो ढग सुद्धा पुढे पुढे जायला लागला आणी थेंबांना अगदी विमानात बसल्या सारख वाटायला लागलं.
बघता बघता असे खूप काळे राखाडी ढग एकत्र जमले आणी अजून वर वर उडायला लागले. वर वर गेल्यावर मात्र खुपच थंडी वाढली. थेंबांच परत पाणीच झालं आणी जमिनीवर पडायला लागलं. अरेच्च्या आपण पाउस झालो कि काय? सगळे थेंब आश्चर्याने म्हणायला लागले आणी आनंदाने परत जमिनीवर टपटप पडायला लागले.
जमिनीवर पाण्याचे खूप खूप ओघळ खळखळा वाहायला लागले. हा थेंब सुद्धा त्यातल्या एका ओघळातून खळखळा उड्या मारत डोंगर उतरायला लागला.
परत एकदा त्याला तोच पाण्याचा डोह दिसला जिथून त्याने सुरुवात केली होती. त्या डोहात आनंदाने उडी घेऊन वाहात वहात परत आपला वडाच्या झाडाकडे आला.
त्याला पाहून झाड आणि चिमणी दोघेही खूप आनंदले.
आता मात्र थेंबच त्यांना समुद्राच्या , आकाशाच्या , ढगांच्या गोष्टी सांगत परत एकदा प्रवास करायची वाट बघतोय.

ढग,
थेंबाचा प्रवास,
पाऊस,
पाणी,
विज्ञान गोष्टी
Tuesday, November 9, 2010
२०१०च्या दिवाळी अंकातले माझे लेख आणि फोटो
मायबोली.कॉम या वेबसाईटचा २०१०चा ऑनलाईन दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला.
या दिवाळी अंकात माझा शरद, हेमंत ऋतूवर (ऑटम् सिझन) लिहिलेला "रंगवूनी आसमंत" हा फोटो फिचर असलेला लेख प्रकाशित झाला आहे.
इथे लिंक आहे http://vishesh.maayboli.com/node/766
याच दिवाळी अंकामध्ये "थेंबाचा प्रवास" ही मी लिहिलेली बालकथा सुद्धा प्रकाशित झाली आहे.
इथे लिंक आहे http://vishesh.maayboli.com/node/761
मोगरा फुलला चा २०१०चा दिवाळी अंकही नुकताच प्रकाशित झाला आहे. या अंकामधल्या एका कवितेसाठी मी काढलेला फोटो पूर्व परवानगीने वापरण्यात आला आहे. (कविता माझी नाही.)
कविता आणि फोटो इथे बघता येतील.
http://mfdiwaliank.blogspot.com/2010/09/shashwat.html
वाचून प्रतिसाद द्यायला विसरू नका.

२०१० दिवाळी अंक
Monday, September 27, 2010
रंगीत लहानपण
मायबोली वरच्या कथाबीज साठी लिहिलेली ही कथा.
मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, आईस्क्रीम
****************************
"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.
"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."
भैरू बाजाराच्या दिवशी आपलं गाठोडं घेऊन जायचा कापडाचं दुकान लावायला.एरवी अशीच इकडची तिकडची, जमलच तर कुणाच्या शेताची कामं करायचा. पोराला बुकं शिकवून लई मोटा करायचं स्वप्न त्याचं. सम्या आता पारावरच्या शाळेत ३रीच्या वर्गात जायचा, पण सुट्टीच्या दिवशी बाबाबरोबर बाजाराला जायला लागायचंच त्याला. मग त्या दिवशी खेळायला मिळायचं नाही म्हणून त्याला अज्जिबात आवडायचं नाही. भैरुलाही ते माहीत होतं पण इलाज नव्हता. तेवढीच मदत होती हाताशी. आणि आजतर तालुक्याचा मोठा बाजार होता.
भराभरा चालत दोघे बाजाराच्या ठिकाणी पोचले तर चांगल्या जागा आधीच सगळ्या ठेल्यावाल्यांनी पटकावल्या होत्या. आता उरलेल्या जागेतली बऱ्यापैकी जागा निवडून भैरूने चादर पसरून कापडं नीट मांडून ठेवायला सुरुवात केली. अजून गिऱ्हाईकं यायला वेळ होता म्हणून सम्या इकडे तिकडे बघत बसला. आजची जागा नेहेमीची नसल्याने समोर सगळे नवीन गाठोडीवाले होते. त्यामुळे सम्याला लई मजा वाटत होती. तेवढ्यात सम्याच्या समोरची जागा एका मोठ्या हातगाडीवाल्याने घेतली. हातगाडीवरची आईसक्रीमची रंगीत चित्र बघून आणि 'थंडगार गारे गार' अशी पाटी वाचून सम्या मनातल्या मनात तो पदार्थ कसा लागतं असेल याचा विचार करायला लागला.
हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली आणि भैरुने सम्याला कामाला लावलं, सम्याचं काम म्हणजे ओरडून ओरडून बाबाच्या दुकानाची जाहिरात करायची. "कापडं घ्या, कापडं! लई भारी कापडं!!" सम्याने आपलं काम चालू केलं तरी त्याचा एक डोळा त्या हातगाडीवरच होता. आजूबाजूची पोरं आईबापा बरोबर येऊन आईसक्रिम खाताना बघून हे लहान मुलांनी खायचं काहीतरी छान आहे हे त्याला कळायला लागलं होतं. येणारा नवीन पोरगा कोणत्या रंगाचं आईसक्रीम खाणार याचा अंदाजही त्याच्या मनाने लावायला सुरुवात केली. "गार म्हंजी कसं आसल? झाडाच्या सावलीवाणी आसल का हिरीच्या पान्यावानी?" सम्याच्या नकळतच त्याचे मन तिथे जात होतं. मध्येच "कापडं घ्या, कापडं! गारे गार कापडं!!" अस ऐकल्यावर भैरुने झापलाच सम्याला.
"काय रं? काय इकतोयास? गारेगार कापडं आणली व्हय तुज्या बान?"
चमकून आपली चूक दुरुस्त करून सम्या परत एकदा ओरडायला लागला. दुपारी आयने बांधून दिलेली भाजीभाकर खातानाही त्याला ते "आईस्क्रीम भाकरीवानी थंड आसल का?" असा प्रश्न पडला होता जो भैरू पर्यंत पोचलाचं नाही.
संध्याकाळ व्हायला लागली तसं जत्रेतली लोकं कमी झाली आणि आपापली गाठोडी बांधून दुकानदारही घरच्या वाटेला लागायला लागले होते. भैरुनेपण आपली कापडं नीट घड्या घालुन गाठोडं बांधायला सुरुवात केली. आज फारसा धंदा झाला नव्हता. आता दुसऱ्या गावातला पुढचा मोठा बाजार महिन्याभराने होता आणि आजची कमाई जेमतेम वीस दिवस जातील एवढीचं होती म्हणून तो जरा चिंतेतच होता. आणि सम्या अजूनही त्या आईसक्रीमच्या गाडीकडेच बघत होता.
गाठोडं डोक्यावर घेऊन मागन भैरू आला तरी त्याला कळलंच नव्हत.
"काय रे सम्या, काय बगतोयास तिथं?"
लहान असला तरी 'आपल्याला असलं काही घेता येणार नाही' हे सम्या ला माहीत होतं म्हणून तो काहीच उत्तर न देता घराच्या दिशेन निघाला.
तसा भैरू खाली बसला आणि म्हणाला "ते थंडगार खायचं नव्हं तुला? सकाळधरनं बगून रायलोय म्या."
सम्या मात्र काहीच न बोलता जमिनीकडे बघत गुमान राहिला.
"चाल, इकडं ये" अस म्हणत भैरुने त्याचा हात धरून त्याला गाडीकडे आणले.
आता दोन रुपयाचं ते थंडगार विकत घेणाऱ्या आपल्या बाबा कडे सम्या अविश्वासाने आणि अभिमानाने बघतच राहिला.
तो छोटासा काडीला लावलेला थंडगार रंगीत गोळा बाबाच्या हातातून घेताना सम्या हरखून गेला होता.आणि तो थंड थंड गोळा चाटणारया आपल्या पोराच्या डोळ्यातला निरागस आनंद भैरूही भान हरपून बघत राहिला.
तेवढ्यात "बाबा तू बी खा कि थोडं. लई गार वाटतं बघ." अस म्हणत सम्याने तो थंडगार गोळा भैरूपुढे धरला.
आणि पुढच्या महिन्याभराच्या चिंता सोडून भैरूसुद्धा सम्या एवढा तिसरीतला पोरगा होऊन पुन्हा एकदा रंगीत लहानपण जगायला लागला.

कथा,
छान गोष्टी
Thursday, September 23, 2010
ओरिगामी गणेश
हा लेख मायबोली (http://www.maayboli.com/) वर गणेशोत्सवासाठी प्रकाशित झाला होता.
*****
ओरिगामी हि एक जपानी कला. कागदापासून वेगवेगळे आकार तायार करणारी. अगदी साध्या बोटी पासून अगदी कठीण अशा ड्रेगन पर्यंत सगळेच आकार बनवता येतात यात. जपानी मुलांना अगदी दोन वर्षापासूनच कागद कसा नीट दुमडायचा याची ओळख करून दिली जाते. शाळेतही ओरिगामी हा विषय शिकवला जातो. कधी कधी मला वाटत जपान्यांच्या नीटनेटकेपणामागे, आणि नियम काटेकोर पाळण्यामध्ये या ओरिगामी शिक्षणाचा फार सहभाग असावा. ओरिगामी मध्ये प्रत्येक घडी अगदी काटेकोर असली तरच शेवटचा आकार आपल्या मनाजोगता येतो. आणि असेही म्हटले जाते कि ओरिगामी मुळे गणिती संकल्पना खूप पक्क्या डोक्यात बसतात. अर्थात हि ऐकीव माहिती आहे.

एवढ असूनही मी कधी ओरिगामी शिकायच्या फंदात पडले नव्हते. नाही म्हणायला दोन तीन पुस्तके आणून सुरुवातीची फुलं , बोट अस काहीबाही करून बघितलं पण तेवढच. अलीकडे अचानक मला वाटलं कि ओरिगामी मध्ये गणपती करता येत असेल का? आंतरजालावर शोधून बघितलं पण फारस काही सापडलं नाही. भारताच्या ओरिगामी मित्र वेबसाईटवर गणपती केला आहे अस कळलं पण तो कसा करायचा ते मात्र मिळाल नाही. मग हिरमुसले होऊन ती गोष्ट तशीच राहिली. आपणच प्रयत्न करून बघू असाही वाटलं पण कसा जमणार म्हणून सोडून दिलं. तरी बहुधा मनाने सोडलं नसावा हा विचार. कारण फावल्या वेळात ओरीगामिच्या वेगवेगळ्या घड्या पहात होते कधी मधी. त्यानंतर परत एकदा असच कागद हातात घेऊन , बघू या जमतय का काही असा विचार करत करून बघायला लागले आणि काय आश्चर्य चक्क गणपतीचा आकार जमतोय असा वाटलं. मग थोडं अजून शोध घेऊन कागदाला वळण कस द्यायचं ते शोधाल आणि त्यामुळे गणपतीची सोंडहि छान झाली. मग बरेच कागद वापरून पुन्हा पुन्हा करून एक पद्धत नक्की केली. आता तयार झालेला गणपती बघून आनंद अगदी गगनात मावत नव्हता. अगदी कुणाला सांगू आणि कुणाला नको अस झालं. तुम्हा सगळ्यांसमोर ओरिगामी गणपती करायची पद्धत दाखवायला गणेशोत्सवासापेक्षा योग्य संधी कुठली असणार ना. बहुधा म्हणूनच गणपती बाप्पा अगदी योग्य वेळी कागदातून अवतरले असावेत.
चला तर मग एक कागद , कात्री आणि गोंद घेऊन बसा माझ्या बरोबर.
१. लागणारे साहित्य
२. तुमचं काम करायला एक चांगली जागा , टेबल ठरवा. कागद मार्बल पेपर (घोटीव कागद ) किंवा त्याप्रकारचा घ्या. फक्त फार जाड नको, आणि अगदी पातळ सहज फाटणारा नको.
३. कागदाची दोन टोके अशा प्रकारे जुळवा
४. आणि मध्ये कर्णावर (digonal) एक घडी घालून घ्या.
५. आता कागद परत उघडा
६. मग एक बाजू कर्णावर जोडली जाईल अशी दुमडा.
७. दिसरी बाजूही तशीच दुमडा.
८ मग परत एकदा नवीन तयां झालेली बाजू कर्णावर दुमडा.
९. दुसरी बाजू पण याच पद्धतीने दुमडा.
१०. तुम्हाला अशाप्रकारचा कोनाकृती आकार झालेला दिसला पाहिजे.
११. त्या कोनच टोक घेऊन विरुद्ध बाजुला टेकवा.
१२. आणि दाबून नीट घडी पाडून घ्या.
१३. त्यानंतर या अर्ध्या भागाला परत एकदा दाखवल्याप्रमाणे दुमडा.
१४. आणि हा वर आलेला छोटा भाग उलट्या बाजूने परत एकदा दुमडा.
१५. या घड्या उलगडल्यावर असा दिसले पाहिजे.
१६. मग हि जी पहिली घडी अशी दिसली पाहिजे.
१७. हि पहिली घडी तिथे कात्रीने दाखवल्याप्रमाणे कापा. दोन्ही बाजूला असे कापून घ्या.
१८. कापलेला भाग उघडून एक छोटीशी घडी घालून दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या.
१९. दोन्ही बाजूला सारखेच दुमडून घ्या. हा होईल गणपतीच्या कानाचा भाग.
२०. या कानाचे खालचे कोपरे किंचितसे दुमडा म्हणजे मग समोरून छान कानाचा आकार येईल.
२१. आता समोरून बघितल्यावर गणपती सारखा दिसायला लागलाय ना?
२२. परत एकदा मागच्या बाजूने सोंडेचा भाग असा घडी करा.
२३ व २४. त्यावर उरलेला सोंडेचा भागहि तश्याच पद्धतीने घडी घालत रहा.
२५. शेवटी अस झिगझाग सारख दिसलं पाहिजे.
२६. हे अस स्प्रिंग सारख वाटला पाहिजे मग हा सोंडेचा भाग छान दिसतो.
२७. हे झिगझाग आघाडा. पण सगळ्यात पहिली घडी (२२ मध्ये घातलेली ) मात्र उघडू नका हं. उघडल्यावर असा दिसत. पुढच्या पायऱ्या करायच्या नसतील तर इथेच थांबून सुद्धा चालेल. हाही आकार गणपतीसारखा दिसतोच आहे. डोळे काढल्यावर आणि दात लावल्यावर अगदी छान गणपती दिसतो. पण वक्रतुंड गणेश हवा असेल तर मात्र पुढच्या पायऱ्या कडे वळाच.
२८. या पुढच्या घड्या थोड्या कठीण आहेत. कागद अशाप्रकारे मध्यावर दुमडून घ्या.
२९. सोंडेसाठी आपण आधीच पाडलेल्या आडव्या घड्या परत एकदा दाबून नीट दिसतील अशा करून घ्या.
३०. आता दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आडव्या घडीसाठी एक तिरकी घडी करा. हि तिरकी घडी करताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जितकी जास्त तिरकी तितकी जास्त वळलेली सोंड. म्हणून कमी तिरक्या करा. घडी करताना त्रिकोणाचे शीर कागदाच्या उघड्या बाजूकडे ठेवा. हे उलटे केलेत तर सोंड बाहेर वळण्या ऐवजी आतल्या बाजूला वळेल.
३१. उघडल्यावर अस दिसलं पाहिजे. हि खूपच महत्वाची पायरी आहे.
३२. त्या घड्या अशा त्रिकोणाकार दिसल्या तरच पुढच्या घड्या घालता येतील.
३३. आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आडव्या आणि तिरप्या रेघेवर असं दुमडा. त्यामुळे तिरकी घडी वर येऊन आडवी घडी त्या तिरक्या घडीच्या खाली झाकली जाईल.
३४. वरची पायरी अजून तीन आडव्या घड्यांसाठी करा.
३५. शेवटच्या घडीत मात्र अगदी टोक दिसू नये म्हणून थोडं टोक मागच्या बाजूला दुमडून घ्या. आणि शेवटची घडी अशी त्या मध्यकर्णावरच आतल्या बाजूला वळवा.
३६. आता तुमच्या घड्या अशा दिसू लागल्या असतील.
३७. मधली कर्णावरची घडी उघडल्यावर छानसा गणेशाकार दिसू लागला असेल नाही? त्याचा वरचा डोक्याचा टोकदार भाग मागच्या बाजूला दुमडून टाका आणि मग गणपतीचा चेहेरा बघा किती छान दिसतोय ते.
३८. त्याला सुंदरसे डोळे काढा. गंध काढा. आणि अरे हो दात राहिलाय ना अजून.
३९. आता एक पांढरा २ सेमी x २ सेमीचा तुकडा घ्या.
४०. त्याचा परत ३ ते ७ पायऱ्या वापरून एक कोन करा.
४१. तो मध्यावर दुमडून टाका आणि मग हा चिमुकला कोन दाताच्या जागी गोंदाने चिकटवून टाका.
४२ व ४३ . आता या गणपतीचे काय करणार बर? बघा तुम्हाला याचं पॉपअप ग्रीटिंग कार्ड करता येईल.
४४. मी हा गणेश असा सोनेरी कागदावर चिकटवून भिंतीवरच लावलाय.
काय मग आता शिकवणारना हा गणपती आपल्या मित्र मैत्रीणीना आणि आजुबाजूच्या बच्चे कंपनीला? तुम्हाला आणि इतरांनाही आवडला तर मला येऊन सांगायला विसरू मात्र नका.
Labels:
ganapati,
Origami,
Origami ganesh,
ओरिगामी,
ओरिगामी गणेश,
कागदाचा गणपती,
कागदी,
गणपती,
हस्तकला
Thursday, September 16, 2010
कापसाची म्हातारी
त्यादिवशी एक कापसाची म्हातारी मला आणि लेकीला दिसली. ती पकडे पर्यंत उडत उडत दुर गेली. आणि ती गेली म्हणुन लेकीने भोकाड पसरलं. ते आवरायला हि गोष्ट इंस्टंट्ली सुचली आणि तीला सांगितली. त्यानंतर परत संध्याकाळी एक म्हातारी दिसली तर तीने तीला उडून दुर जाउ दिलं !
---------------------
कापसाची म्हातारी
खूप खूप उन पडलं होतं. अंगणातली जमीन नुसती भाजून निघत होती. झाडांचा पक्षांचा जीव उन्हाने तल्लख होत होता. तेवेढ्यात कुठूनतरी वाऱ्याची एक गरम झुळूक आली आणि तिच्याबरोबर उडत आली एक कापसाची म्हातारी. म्हातारी कुठून उडत आली होती कोणास ठाऊक ? पण एवढ्या उन्हात सुद्धा ती अगदी मजेत उडत होती.
उडता उडता तिला भेटली एक चिमणी. चिमणीला म्हातारी बघून गंमतच वाटली. तिने विचारलं "अरे हां कुठला नवीनच बिनपंखाचा पक्षी?"
म्हातारी म्हणाली "अगं चिमणे, मी तर कापसाची म्हातारी."
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील खूपखूप"
मग म्हातारी निघाली पुढे उडत उडत. उडता उडता म्हातारी एका बागेत पोचली. तिथल्या फुलांना वाटलं फुलपाखरूंच आलं. फुलं म्हणाली
"कित्ती छान फुलपाखरू आहेस रे तू! येरे ये फुलपाखरा मध पी , आराम कर आणि मग पुढे जा."
म्हातारी म्हणाली. "सुंदरशा फुलांनो धन्यवाद. पण मी काही फुलपाखरू नाही.मी आहे कापसाची म्हातारी. "
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील खूपखूप"
फुलं म्हणाली "अरे वा छान छान. दूरच्या फुलांना पण आमचा थोडा वास दे."
म्हातारी परत आपली उडायला लागली. आता वाटेत दिसलं एक फुलपाखरू. ते त्याच फुलांवर बसायला चाललं होतं. म्हातारीला पाहून त्याला सुध्दा आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं "अरे तू चतुर आहेस कि काय?"
म्हातारी म्हाणाली "नाही रे बाबा. .मी तर कापसाची म्हातारी."
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील खूपखूप"
एवढ बोलून म्हातारी उडतेय तोच बागेत मुलं आली संध्याकाळची खेळायला. उडणारी म्हातारी मुलांना दिसली आणि मुलं तिच्या मागून तिला पकडायला धावायला लागली. जोरजोरात पळताना एका चिमुकल्या मुलीने पकडलंच शेवटी म्हातारीला.
म्हातारी कळवळून तिला म्हणाली " अगं अगं मुली. सोडना मला. मी आहे कापसाची म्हातारी"
"वाऱ्यावर उडते, बी घेऊन फिरते.
बी जाईल दूरदूर, झाडं येतील खूपखूप"
चिमुकल्या मुलीला म्हातारीची दया आली आणि तिने म्हातारीला सोडून दिलं. म्हातारी मग आनंदाने उडत उडत दूर गेली. रात्र झाल्यावर वारा बंद झाला तशी म्हातारी जमिनीवर बसली. तिथे तिने बी जमिनीवर टाकून दिलं.
खूप दिवसांनी जेव्हा पावसाळा आला तेव्हा ते बी रुजलं आणि तिथे एक छान सावरीच रोप उगवलं.
----------------------------
हि गोष्ट सांगताना मुलांना, ते बी हवेत कसं उडतं आणि नविन रोपांची रुजवण कशी होते त्याबद्दल सांगता येईल.